मंडलनामा क्रमशः 3. शिक्षणाचा कोंबडा आरवला

मंडलनामा क्रमशः
3.शिक्षणाचा कोंबडा आरवला
तीन मोठ्या भावांना शिकवता आले नाही किंवा ते शिकले नाहीत याचे आईला वाईट वाटायचे. माझा नंबर पाचवा. पहिल्या तीन भावांवर कोवळ्या वयातच कामाचा बोजा पडल्याचे आईला वाईट वाटायचे. दुसरा पर्यायही नव्हता. त्याकाळी शाळेत न जाणारी सर्वच मुले काही ना काही कामधंदा करत असत. त्यांचे आई-वडील त्यांना उनाडक्या करू देत नसत. इतर शेजारी-पाजारीही उनाडक्या करणाऱ्यांचे कान पिळत असत. मोठ्या कष्टाने संसार चालवताना धाकट्या दोन मुलांनी खूप शिकावे, असे आईला वाटायचे. आमच्या गल्लीतील व गावातील मुले घरासमोरून शाळेत जात असत. त्यांच्याकडे बघून मला शाळेत जावे वाटायचे. आई व माझे विचार जुळले. वडील या फंद्यात पडत नसत. पण मोठे तिघे भाऊ मी जास्त शिकण्याच्या विरोधात होते. अक्षर ओळख करून घेऊन शाळा सोडावी, असे त्यांना वाटायचे. शिकून काय होणार? घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी मी सुद्धा काम करणे गरजेचे आहे, असे त्या तिघांना वाटायचे. मी शाळा, कॉलेजाला जाणार म्हणजे याला कोण पोसणार?, असा त्यांचा रोकडा सवाल होता. त्या परिस्थितीत त्यांचा विचार त्यांच्या मते योग्य असला तरी मला शिकायचे व आईला मला शिकवायचे होते.
माझी रवानगी कदीम जालन्यातील सरकारी ज्युनिअर उर्दू शाळेत झाली. मी दररोज मोठ्या उत्साहाने शाळेला जात असे. शाळेतून आल्यानंतर अभ्यास मात्र करता येत नव्हता. कारण शाळेला जाण्याआधी व शाळेतून आल्यानंतर माझी कामे ठरलेली होती. ठरलेली कामे केल्यानंतर उरलेल्या वेळेत मी शाळेला जात होतो, असे म्हटलेले योग्य ठरेल. वडील अबोल, तर मी फार शिक्षण घेऊ नये या मताचे मोठे भाऊ. मला फक्त आईचा पाठिंबा होता. त्यामुळे मी शाळेत नियमित जाऊ लागलो.
शाळा सकाळी दहा वाजता भरायची. माझा दिवस मात्र पहाटेची नमाज होण्यापासून सुरू होत असे. आई मला पहाटे पाचच्या आधी झोपेतून उठवायची. तोंड धुवून मी डबलरोटीच्या (पाव) कारखान्यात जायचो. तेथून किश्ती व डबलरोटी घेऊन त्या विकण्यासाठी निघायचो. ते ओझे घेऊन मोठ्याने ओरडत रेल्वे स्टेशन परिसर व इतर वस्त्यांत दारोदार डबलरोटी विकायचो. हे काम झाल्यानंतर घरी येऊन असेल ती शिळी भाकर खाऊन मी व माझ्याहून मोठी बहीण शेण गोळा करण्यासाठी यायचो. आम्ही दोघे रोज दोन टोपले शेण आणायचो. यात खाडा करता यायचा नाही. कारण आई त्या शेणाच्या गोवऱ्या थापायची. त्या चुलीला जळण म्हणून फार गरजेच्या होत्या. गोवऱ्या कमी पडल्या तर सरपण खरेदी करण्याची आमची ऐपत नव्हती. त्यामुळे शेण गोळा करण्याचे काम न चुकता करावेच लागायचे. त्यानंतर आई-वडिलांना विणकामात मदत म्हणून सुताच्या कांड्या तयार कराव्या लागत. या कांड्या हातमागावर लावून कापड विणत असत. विणकामासाठी पुरेशा कांड्या तयार झाल्यानंतर दप्तर उचलून शाळेकडे चालू लागायचो. शाळा सायंकाळी चार वाजेपर्यंत होती. चार वाजता घरी परत आल्यानंतर मोठ्या भावाने शिवलेल्या कपड्यांची तुरपई, काच-बटण करावे लागे. काही वेळा तो इतर ठिकाणचेही काम घेऊन यायचा. यामुळे जास्त कमाई होत असे. पण अनेकदा हे नाजूक
काम रात्री जागून करावे लागे. शाळेत जाता यावे म्हणून मी ही चारही कामे न चुकता व वेळेत पूर्ण करत असे. दररोजची ठरलेली ही कामे नीट व वेळेत झाली नाहीत तर शाळेला जाता येणार नाही, अशी अटच होती. त्यामुळे मी नेहमी ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, असा प्रयत्न करत असे. याचे दोन तोटे झाले. पहाटेपासून रात्रीपर्यंत कामाचा भार व मधल्या वेळेत शाळा, यामुळे मला स्वतःसाठी वेळच नव्हता. परिणामी, मला आमच्या गल्लीत व शाळेतही जीवाभावाचे मित्र झाले नाहीत. मित्रांसोबत खेळण्या बागडण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. दुसरा तोटा म्हणजे, शाळेचा अभ्यास नियमित करता येत नव्हता. परिक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रमाची उजळणी करून परीक्षा द्यायचो. मी शाळेत कायम पहिल्याच रांगेत बसायचो. शिक्षकाने सांगितलेले मला चटकन समजायचे. स्मरणशक्ती तल्लख असल्याने ते लक्षात राहायचे. गणित व विज्ञान हे माझे आवडते विषय. कितीही अवघड गणित न चुकता सहज सोडवायचो. त्यामुळे शिक्षकांचा लाडका. वर्गातील माझी पहिली रांग कधी चुकली नाही. अभ्यासात गती होती, शाळेत नियमित जायचो व खोड्या करण्यासाठी वेळ नसायचा. त्यामुळे मला शाळेत कधीच शिक्षा झाली नाही. उलट काही शिक्षकांचा लाडका झालो, पण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मला शिक्षण विनाअडथळा पूर्ण करता आले नाही.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




