संभाजीनगर पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन; दर तीन महिन्यांनी स्वतः घेणार आढावा बैठक

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीतील नाराजी आणि अंतर्गत वाद समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आता दर तीन महिन्यांनी स्वतः बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत येथील राजकीय परिस्थिती बदलली. 2022 मधील शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसू लागले.
विधान परिषद निवडणुकीत संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेनेत नाराजी निर्माण झाली होती. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीत तणाव वाढला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील महापौर निवासस्थानी संभाजीनगरमधील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली होती.
या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनीही महायुतीचा धर्म पाळण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या मुलाची उमेदवारी मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात कमी झाला.
मात्र केवळ निवडणूक वाद मिटवून न थांबता शिंदे यांनी आता संभाजीनगरमध्ये पक्षबांधणीसाठी दीर्घकालीन योजना तयार केली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील पक्षाची जबाबदारी खासदार संदिपान भुमरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते दर महिन्याला सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत.
याशिवाय, दर तीन महिन्यांनी मुंबईत स्वतः एकनाथ शिंदे संभाजीनगर जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. संघटन वाढ, स्थानिक निवडणुकांची तयारी, गटबाजी कमी करणे आणि पक्षाची ताकद वाढवणे यावर या बैठकींमध्ये विशेष भर दिला जाणार आहे.
संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, राजेंद्र जंजाळ आणि इतर नेत्यांमधील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. या गटबाजीचा फटका शिवसेनेला काही निवडणुकांमध्ये बसल्याचे मानले जाते. त्यामुळे संघटनेत समन्वय निर्माण करणे हे शिंदेंसमोरील मोठे आव्हान आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक आणि भविष्यातील राजकीय लढाया लक्षात घेता संभाजीनगरमध्ये पुन्हा शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार शिंदे यांनी केला आहे. भाजपच्या प्रभावाखाली गेलेला हा राजकीय किल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी त्यांनी आता थेट मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.




