फुले विचारांच्या बालेकिल्ल्यात महासंघाचा निर्णायक शंखनाद! कामगार क्रांती, शेतकरी क्रांती आणि सामाजिक न्यायाची नवी लढाई; मा. नारायण कारभारी डोके यांच्यावर उत्तर-पश्चिम पुण्याची ऐतिहासिक धुरा!

🔥 फुले विचारांच्या बालेकिल्ल्यात महासंघाचा निर्णायक शंखनाद! कामगार क्रांती, शेतकरी क्रांती आणि सामाजिक न्यायाची नवी लढाई; मा. नारायण कारभारी डोके यांच्यावर उत्तर-पश्चिम पुण्याची ऐतिहासिक धुरा!
पुणे, दि. — अखिल भारतीय माळी महासंघाने उत्तर-पश्चिम पुणे विभागात सामाजिक परिवर्तन, ओबीसी हक्क, जातनिहाय जनगणना आणि फुले विचारांच्या व्यापक प्रसारासाठी निर्णायक पाऊल उचलत मा. नारायण कारभारी डोके (रा. खडकवाडी लोणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यांचे संघटक म्हणून नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती मा. अमर बोराटे, मा. विठ्ठलजी सातव, मा. भिमराव कोथिंबीरे आणि मा. दामोदर गाडगे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे यांच्यासह महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
महासंघाचे कार्य आतापर्यंत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे पूर्व विभागात प्रभावीपणे सुरू होते. आता आंबेगाव, जुन्नर, खेड आणि मावळ या पुरोगामी पट्ट्यात संघटन विस्तार, नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, युवक-महिला संघटनांची उभारणी, जातनिहाय जनगणनेसाठी जनआंदोलन, ओबीसी हक्कांसाठी लढा आणि गावागावांत सामाजिक प्रबोधनाची व्यापक मोहीम उभारण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतातील कामगार चळवळीचे जनक क्रांतिवीर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याने प्रेरित झालेला ऐतिहासिक प्रदेश आहे. हा भाग नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीशी निगडित असल्यामुळे भारतीय कामगार चळवळीचा प्रेरणादायी वारसा जपणारा प्रदेश मानला जातो. त्यामुळे औद्योगिक कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजामध्ये परिवर्तनवादी विचारांची मजबूत परंपरा येथे आजही जिवंत आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ हा भाग केवळ सामाजिक चळवळींचाच नव्हे, तर मोठ्या औद्योगिक वसाहती, समृद्ध बागायती शेती, आधुनिक कृषी उत्पादन आणि सहकार क्षेत्रामुळे राज्याच्या विकासातील महत्त्वाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेले शेतकरी हित, जलसंधारण, “पाणी अडवा – पाणी जिरवा”, सिंचन, पीक नियोजन, वैज्ञानिक शेती आणि सामाजिक समतेचे विचार या भागात प्रत्यक्ष कृतीत उतरलेले दिसतात. त्यामुळे हा परिसर फुले विचारांचा जिवंत प्रयोग मानला जातो.
यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त गावागावांत महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या विचारांचा व्यापक प्रचार-प्रसार, व्याख्याने, जाहीर सभा, युवक मेळावे, महिला संवाद, शेतकरी परिषद, कामगार मेळावे आणि सामाजिक प्रबोधन अभियान राबविण्यात येणार असल्याचे मा. नारायण कारभारी डोके यांनी जाहीर केले.
त्याचबरोबर जातनिहाय जनगणनेसाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव मंजूर करणे, ओबीसींच्या घटनात्मक हक्कांसाठी लोकचळवळ उभारणे, अन्याय-अत्याचाराविरोधात संघटित लढा उभारणे आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
मा. नारायण कारभारी डोके यांचा व्यापक जनसंपर्क, संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि या भागाच्या इतिहासाची सखोल जाण लक्षात घेता ही निवड केवळ पदाची नसून परिवर्तनवादी विचारांच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. फुले विचारांचा वारसा, कामगार चळवळीची प्रेरणा आणि शेतकरी-कष्टकरी समाजाची ताकद असलेल्या या भूमीत त्यांना कार्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध असून, उत्तर-पश्चिम पुण्यात महासंघाची चळवळ अधिक वेगाने विस्तारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
🖋️ संपादकीय संदेश
फुले विचार, कामगार चळवळ, शेतकरी स्वाभिमान आणि ओबीसींचे घटनात्मक हक्क यांची सांगड घालून सामाजिक परिवर्तनाची नवी लाट उभी करण्याची वेळ आली आहे. उत्तर-पश्चिम पुणे हा इतिहास घडवणारा प्रदेश आहे; आता तोच प्रदेश सामाजिक न्यायाच्या नव्या संघर्षाचे नेतृत्व करेल, हीच अपेक्षा.
— संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
दिनबंधू शिवक्रांती टीव्ही
📲 आपल्या WhatsApp व सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा क्रमांक जरूर जोडा : 7387377801
👍 बातमी लाईक करा | 🔄 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📤 फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!




