सोशल

मंडलनामा क्रमशः 45.वातावरणच बदलले

मंडलनामा क्रमशः

45.वातावरणच बदलले

चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांचे पाठबळ मिळाल्याने वातावरणच
बदलले. आतापर्यंत कुत्सितपणे पाहणाऱ्याच्या नजरेत आमच्याबद्दल, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कार्याबद्दल, कार्यकत्यांबद्दल विश्वासाची भावना दिसू लागली. त्यांच्या भावना का नाही बदललणार?
आतापर्यंत मी एकटा होतो. माझ्यामागे ओबीसी चळवळीचे बळ होते.परंतु, मुस्लिमांचा विश्वास एवढ्याच भांडवलावर मिळवता आला नव्हता.
दिलीपकुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जणू पितामहच. त्यांच्याबद्दल समस्त भारतीयांत आदराची भावना व आकर्षण. संघटनेच्या मंचावर येऊन दिलीपकुमार मुसलमान कष्टकऱ्यांनी ओबीसींचे लाभ घेणे आवश्यक असल्याचे सांगू लागले.

त्यांच्या उपस्थितीत मुंबईत अनेक लहान लहान सभा, बैठका झाल्या. त्यातून वातावरण निर्मिती होऊ लागली. मुस्लिमांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे ते परोपरीने सांगू लागले.
मीच दिलीपकुमारांना ओबीसींसाठी सक्रिय होण्याची गळ घातली होती. मलाच माझ्या या कर्तृत्वावर विश्वास बसत नव्हता. मी एकदा त्यांना विचारले, ‘माझ्यासारखे अनेकजण तुमच्याकडे येतात पण तुम्ही हे कार्य मनावर कसे घेतले?’

त्यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या दोन घटना सांगितल्या. ते म्हणाले, ‘मलाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. ते दलितांसाठी करत असलेल्या कामाबद्दल अत्यंत आदराची भावना होती. त्यामुळे मी तरुण असताना त्यांची दोन वेळा भेट घेतली. त्यावेळी डॉ. आंबेडकर
औरंगाबाद येथे कॉलेजचे बांधकाम करत होते. ‘तू मोठा अभिनेता आहेत. तुझ्याबद्दल मुस्लिम समाजात आकर्षण आहे. तू बुद्धिमानही आहेस. त्यामुळे तू समाजासाठी काम केले पाहिजे, असे डॉ. आंबेडकरांनी मला सांगितले होते. पण तेव्हा अल्पसमज व चित्रपट व्यवसायात व्यस्त असल्याने सक्रिय समाजकार्य करण्यास नकार दिला होता. ही खंत माझ्या मनात कायमची आहे. डॉ. आंबेडकरांनी आवाहन करूनही आपण समाजासाठी काहीच केले नव्हते. तुझ्यामुळे मला उतरत्या वयात का होईना समाजासाठी काही करता येत आहे. हीच माझी डॉ. आंबेडकरांना आदरांजली आहे. त्यामुळे मी मुस्लिम ओबीसींच्या

कार्यात सामील झालो’, असे त्यांनी अत्यंत गद्गद् स्वरात सांगितले होते.

दिलीपकुमारांनी सांगितलेली दुसरी घटना अशी. ‘शालेय फुटबॉल संघात असताना कॅप्टनपदी पगारे नावाच्या एका दलित विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामुळे तो खूप आनंदात होता. त्याने संघातील सर्व सहकाऱ्यांना मेजवानीसाठी घरी बोलावले. रात्री ठरल्यावेळी दिलीपकुमार त्याच्या घरी पोहोचले. खूप उशीर झाला तरी दिलीपकुमार यांच्याशिवाय दुसरा खेळाडू मेजवानीसाठी आला नाही. त्या दोघा मित्रांनी इतरांची खूप वाट पाहिली. पगारे याला त्यामागील कारण समजले होते पण दिलीपकुमार यांना समजले नव्हते. त्यांनी याबद्दल पगारेला विचारले. पगारे अत्यंत खिन्न स्वरात म्हणाला, मी दलित असल्याने माझ्या घरी जेवावे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला असेल. या उत्तरानंतर शाळकरी वयातील दिलीपकुमार यांनी त्या मागचे कारण विचारले असता, अस्पृशतेबद्दल माहिती मिळाली. हा अनुभव दिलीपकुमार यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. यातून मुक्ती मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गाने जाणे हाच पर्याय होता. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे हा मार्ग अधिक प्रशस्त झाला’, असे दिलीपकुमार यांनी सांगितले होते.

दिलीपकुमार यांच्यासोबत चळवळीतील प्रवास प्रदीर्घ काळ राहिला. अगदी सुरुवातीच्या काळात ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगेल तेथे येऊन जनतेशी संवाद साधत. त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. मुंबईतील पायधुनी भागातील एका अरूंद गल्लीत त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता. सभेची वेळ रात्रीची होती. तेथे बोलताना दिलीपकुमारांनी जणू माझ्या व्यथेलाच वाचा फोडली. ते म्हणाले, ‘ओबीसी चळवळीत काम करणे खूप कष्टाचे आहे. शब्बीर अन्सारी कसे करतात तेच जाणो! मी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही. पण ओबीसी चळवळीत आल्यापासून अनेकवेळा उपाशी राहावे लागत आहे. पठाण कभी भुखा नहीं रह सकता, मगर अब ये हो रहा है ! शब्बीरने मलाही ओबीसी करून टाकले. त्याने मला आमच्या कुटुंबाचा पेशा बागवानी असल्याचे लक्षात आणून दिले आणि पटवूनही दिले.’ ही माझ्यासाठी प्रशस्ती होती.

त्या काळात दिलीपकुमार यांनी अत्यंत भारावून व झपाटून संघटनेच्या कार्यात सहभाग घेतला. आम्ही सांगेल त्या सभा व बैठकीला ते येत असत.
सभेत इतरांची भाषणे मन लावून ऐकत. त्याची टिपणं काढत. त्याचा वापर भाषणात करत. त्यांनी मंडल आयोगाची पार्श्वभूमी, त्यासाठी झालेली आंदोलने, संसदेतील भाषणे, इतर राज्यातील स्थिती, आयोगाचे निकष. सर्वकाही माहीत करून घेतले. ते एक बुद्धिमान महान व्यक्ती होते. आपण जे बोलू त्याची संपूर्ण माहिती असायलाच पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असायचा. सभांमधील भाषणांत, भारतीय संविधानाने दिलेले हक्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पीडित व शोषितांबद्दलची तळमळ यावर भर देत असत. पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशाण-ए-पाकिस्तान’ स्वीकारण्यासाठी गेले असता घडलेला एक किस्सा त्यांनी मला सांगितला होता. ते म्हणाले होते, ‘मी विमानतळावर उतरल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व

पंतप्रधान माझा हात हातात घेऊन भावुक झाले होते. मला वाटले त्यांच्या डोळ्यातून कोणत्याही क्षणी अश्रू येतील. विमानतळावर राजकारणी व भांडवलदारांची गर्दी झालेली. ते सर्व माझ्या मागे धावत होते. पण मी कोण होतो ? खरं तर मी एक नकलाकार. त्याला तुम्ही अॅक्टर म्हणता. दुसऱ्याने लिहून दिलेले संवाद म्हणत आम्ही सिनेमात कोणाची तरी नक्कल करतो. तरीही ते लोक माझ्यामागे वेड्यासारखे पळत होते. तुम्ही तर समाजासाठी रात्रंदिवस राबत आहात, त्यामुळे मी मुस्लिम ओबीसी चळवळीत सामील झालो.’

दिलीपकुमार यांच्यामुळे एकीकडे लोकांची मते बदलत होती तर दुसरीकडे मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सरकार दरबारी जाण्याची वाटही सोपी झाली. पुढे चालून आम्ही त्यांच्यासोबत हज हाऊसमध्ये राज्यस्तरीय परिषद घेतली. या परिषदेमुळे मुस्लिमांना ओबीसी प्रमाणपत्र काढण्यात येणाऱ्या अडचणीला वाचा फुटली. विशेषतः विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात
मंत्रालयात विविध समस्यांवर बैठका आयोजित करण्यात दिलीपकुमार यांच्या सहभागाचा लाभ झाला. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमुळे काही जीआर निघाले. त्यामुळे मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले. या आघाडीवर दिलीपकुमार यांचे चळवळीत मोठे योगदान आहे. पण माझ्या समाजबांधवांना त्यांच्या योगदानाची फार माहिती नाही, याची खंत वाटते.

दिलीपकुमार यांच्याप्रमाणेच चित्रपट गीतकार, कवी, लेखक व संपादक हसन कमाल आणि सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी वॉकर उर्फ काझी बदुद्दीन यांचीही मुस्लिम ओबीसी चळवळीला मोठी मदत झाली. दिलीपकुमार यांच्यामुळे जॉनी वॉकर मुस्लिम ओबीसी चळवळीत सक्रिय झाले. ते दिलीपकुमार यांच्यासोबत प्रत्येक सभेला येत. या शिवाय आम्ही बोलावल्यास इतर ठिकाणीही येत. जॉनी वॉकर ओबीसी प्रवर्गातील होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्कराची होती. त्यामुळे त्यांचे वागणे लष्करी शिस्तीतच असे. रात्री दहाच्या ठोक्याला ते झोपायला जात. रात्री दहानंतर कोठेही येत नसत. प्रत्येक

कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाचा संघटनेला मोठा उपयोग झाला.

शायर हसन कमाल वांद्र्याला राहत असत. मुस्लिम ओबीसी चळवळीत दिलीपकुमार सामील होण्याच्या आधीपासून ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनसोबत जोडले गेले होते. ज्येष्ठ समाजसेवक असगर अली इंजिनीअर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल बिडवई व दिवाकर रावते यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘इकॉनॉमिक टाइम्स’ मध्ये लिहलेले लेख वाचून त्यांनी मला संपर्क केला. हे ‘मुस्लिम ओबीसी’ काय आहे?, अशी विचारणा केली. मी त्यांना भारताचे संविधान, त्यातील कलम ३४०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, मंडल आयोग इत्यादी माहिती दिली. शिवाय मूळ शब्द ‘कास्ट’ नसून ‘क्लास’ असल्याचे सांगितले. यानंतर हसन कमाल यांनी ‘पेशा जात कबसे बन गया’ हा लेख लिहला. यानंतर ते संघटनेसोबत जोडले गेले. त्यांनी १९९५ मध्ये एकदा मला घरी बोलावले असताना मी त्यांना दिलीपकुमार यांना भेटायचे आहे, असे सांगितले. हसन कमाल यांनी दिलीपकुमार यांची वेळ घेऊन दिली व पुढील घटना घडल्या. हसन कमाल हे बुद्धिजीवी होते व सुशिक्षित मुस्लिमांमध्ये त्यांच्या प्रभाव होता. चित्रपट गीतकार असल्याने त्यांची गाणी सर्वसामान्यांच्या तोंडी होती व ते लोकप्रिय होते. त्यांनी चळवळीच्या मांडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विशेषतः मुस्लिम ओबीसी चळवळीबद्दल ते सतत लेखन करत. त्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीची बाजू भक्कमपणे मांडली जात असे.

दिलीपकुमार यांच्या सूचनेवरून मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर झहीर काझी हे त्यावेळी मुस्लिम ओबीसी चळवळीत सामील झाले. डॉ. काझी यांचे सासरे रिझवान हारीस हे आमदार होते. डॉ. काझी यांचा मुंबईतील सामाजिक चळवळीत वावर असल्याने दिलीपकुमार यांनी मुस्लिम ओबीसी चळवळीला मदत करण्याची सूचना केली होती. डॉ. काझी यांनी मुंबईत छोट्या-छोट्या सभा, बैठका आयोजित करण्यात संघटनेला खूप मदत केली. ते स्वतः अनेक ठिकाणी येत व ओबीसींचे हक्क घेण्यात भले असल्याचे मुंबईतील मुस्लिमांना सांगत. डॉ. काझी हे मुंबईतील अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी आहेत. मुस्लिम समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आधुनिक व धर्मनिरपेक्ष शिक्षण देण्यात या संस्थेचे मोठे योगदान आहे. ही ऐतिहासिक शिक्षण संस्था अलिगढ मुस्लिम विद्यापीठापेक्षा जुनी आहे. या संस्थेचे पदाधिकारी असलेल्या डॉ. काझी यांच्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीला मुस्लिम बुद्धिवाद्यांचा पाठिंबा वाढला.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button