अन्नपदार्थात भेसळ आढळल्यास आता थेट तक्रार करा; एका फोनवर कारवाई, तुकाराम मुंढेंची नागरिकांना मोठी सुविधा

राज्यात अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम हाती घेतली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी थेट तक्रार नोंदवण्याची विशेष सुविधा सुरू केली आहे. आता कोणत्याही खाद्यपदार्थात भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न, बनावट दूध, पनीर, मिठाई, खवा, गुटखा किंवा पानमसाल्याची विक्री आढळल्यास नागरिक एका फोनवर तक्रार करू शकणार आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “Safe Food, Safe Drugs, Safe Maharashtra” या संकल्पनेअंतर्गत विभागाचे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली. अनेक दुकानांवर, हॉटेल्सवर आणि उत्पादन केंद्रांवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला आहे.
नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी FDA कडून टोल-फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला आहे. भेसळीचा संशय असल्यास संबंधित दुकानाचे नाव, पत्ता, फोटो, बिल किंवा उपलब्ध पुरावे जोडून तक्रार करता येणार आहे. तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास करून आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, अन्नभेसळीविरोधातील मोहिमेला अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांच्या सहभागावर भर दिला जात आहे. लोकांनी पुढे येऊन माहिती दिल्यास भेसळखोरांविरोधातील कारवाई अधिक वेगाने होऊ शकते, असे प्रशासनाचे मत आहे.
धुळे जिल्ह्यात नुकतीच करण्यात आलेली कारवाई याचे उदाहरण ठरली. मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर अन्नभेसळ, बनावट खाद्यपदार्थ आणि प्रतिबंधित उत्पादनांविरोधातील कारवाईचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरातील भेसळखोरांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे.
अन्नातील किंवा औषधांतील भेसळीबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी खालील माध्यमांचा वापर करावा:
टोल फ्री क्रमांक: 1800222365
ई-मेल: jc-foodhq@gov.in




