सत्यशोधक विवाह

शुभारंभ
प्रिय,
सत्यशोधक हो !
सत्यशोधक विवाह :
आज आपण माझ्या लहान मुलीच्या आंतरजातीय विवाहास उपस्थित आहात, याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. हा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न होत आहे, हे या विवाहाचे वेगळे वैशिष्ट्य ! अलीकडे तरुणी व तरुणांची पिढी सत्यशोधक विवाहासाठी तयार होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु अशा तरुणी-तरुणांच्या आई-वडिलांची किंवा त्यांच्या घरातील सदस्यांची समजूत घालणे महाकठीण काम होऊन बसते. अनेक तरुण मला या कामासाठी गळ घालतात.
सत्यशोधक पद्धतीने विवाह करताना कुवतीनुसार खर्च करावा, ही बाब महत्त्वाची आहेच. उगाच बडेजाव करून कर्जबाजारी होणे योग्य नाही किंवा काटकसरीच्या व साधेपणाच्या नावाखाली फक्त ‘नोंदणी विवाह’ करणेही योग्य नाही. अर्थात लग्न कोणत्याही पद्धतीने करा, तो शासकीय कार्यालयात जाऊन नोंदणी करावीच लागते.
मानव प्राणी हा उत्सवप्रिय आहे. तो जसा आनंद साजरा करतो, तसे दुःखही. तो वाढदिवसाचा गाजावाजा जसा करतो, तसा मृत्युनंतर ‘आगारी’ टाकण्याचा पितृपक्षही उत्साहात साजरा करतो. बळीराजा व बटू वामनाच्या पहिल्या महाभारतीय युद्धात कामी आलेल्या हुताम्यांचे बलिदान साजरे करण्यासाठी ‘वीर’ बनून मिरवणुका काढल्या जातात. जन्मल्यानंतर बारसे साजरे करणारे लोक मृत्युनंतर पुण्यतिथीही साजरी करतात. थोडक्यात सांगायचे तर माणूस हा उत्सवप्रिय असून ‘साजरा’ करणे हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळेच मानव प्राणी हा इतर जंगली प्राण्यांपेक्षा वेगळा सिद्ध झाला आहे.
सत्यशोधक विधी ७

