भुजबळ निवास: आठवणी, नाती आणि कृतज्ञतेचा एक साक्षीदार

भुजबळ निवास: आठवणी, नाती आणि कृतज्ञतेचा एक साक्षीदार
जीवनाच्या प्रवासात काही जागा आणि काही माणसं आपल्या हृदयाच्या अगदी जवळची होतात. भुजबळ निवास आणि भुजबळ मळा हे केवळ वास्तू नसून, आमच्या कुटुंबाच्या जडणघडणीचा एक अविभाज्य भाग राहिले आहेत. इथे आम्ही नाती जपली, संघर्ष केला, शिकण्याचा प्रवास पूर्ण केला आणि शेवटी या घराच्या उंबरठ्यावरूनच नव्या नात्यांच्या बंधनात बांधलो.
भुजबळ निवासाशी जडलेलं नातं
माझ्या वडिलांची बदली पुनवळे येथे झाली, तेव्हा आम्ही भुजबळ चाळीत राहायला गेलो. वडील शेती खात्यात नोकरीला होते, त्यामुळे त्यांचा पुनवळ्यातील प्रतिष्ठित आणि प्रगतशील शेतकरी असलेल्या भुजबळ कुटुंबाशी विशेष स्नेह जडला. या कुटुंबाने गावाच्या विकासात मोठे योगदान दिले होते आणि त्यांच्याशी आमच्या कुटुंबाचा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला.
भुजबळ मळ्यामधील गिरणी आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग होती. तिथे आम्ही दळण-दळण्यासाठी जात असू. गावात फक्त एकच विहीर होती आणि तिथून भुजबळ निवासात पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत असे. मी रोज आईला मदतीसाठी तिथून पाणी आणत असे. पावसाळ्यात लाईट नसल्यावर भुजबळ मळ्यातील विहिरीतून पाणी शेंदून आणत असे.
भुजबळ कुटुंबाचा सहवास आणि आधार
श्री किसन आप्पा भुजबळ हे विशेष कार्यकारी अधिकारी होते. आम्ही त्यांच्याकडे कागदपत्र ट्रू कॉपी करून घेण्यासाठी जात असू. ते नेहमी प्रेमाने विचारपूस करत— “बाळा, शिक्षण कसं चाललं आहे?” त्यांची आत्मीयता आम्हाला नेहमीच उभारी देत असे.
भुजबळ निवासाचे आधारस्तंभ कै.श्री गेनबा नारायण भुजबळ “बाबा”, यांनी गावाच्या सामाजिक आणि धार्मिक प्रगतीसाठी मोठे योगदान दिले. मंदिर बांधणी, वीजपुरवठा सुरू करणे आणि गरजूंसाठी नेहमी मदतीचा हात देणे—या त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्याप्रती ऋणी आहे. त्यांचा दूरदृष्टिकोन आणि समाजहिताची बांधिलकी गावाच्या विकासाचा भक्कम पाया होती.
आईचा संघर्ष आणि भुजबळ मळ्यातील दिवस
आमच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आई भुजबळ मळ्यात शेतावर काम करण्यासाठी जात असे. वडिलांच्या मर्यादित पगारात तिघांचे शिक्षण आणि गावातील जबाबदाऱ्या सांभाळणे सोपे नव्हते. पण त्यांच्या कष्टांमुळे आम्ही शिकू शकलो.आणि आज मी सीए म्हणून प्रॅक्टिस करत आहे.
क्रिकेट मॅचेस पाहण्याचा एक वेगळाच आनंद होता. भारत-ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडच्या मॅचेस त्यांच्या देशात असल्या कि पहाटे टीव्हीला लागत. आम्ही त्या पाहण्यासाठी भुजबळ मळ्यातील गिरणीवर चढून पहिल्या मजल्यावर आप्पांच्या घरात ठेवलेल्या टीव्हीवर मॅच पाहत असू. त्या आठवणी आजही मनात जिवंत आहेत.
पेरूच्या बागा, आंब्याच्या झाडाखाली अभ्यास आणि लाल्या कुत्रा
माझ्या अभ्यासाचा सर्वांत सुंदर काळ मी भुजबळ मळ्यातील पेरूच्या बागेत, आंब्याच्या झाडाखाली घालवला. तिथल्या शांततेत बसून मी अभ्यास करायचो. वाऱ्यावर हलणारी झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मळ्यातील मृदगंध यात माझ्या अभ्यासाला वेगळीच ऊर्जा मिळत असे. उन्हाळ्यात त्या झाडाच्या सावलीत बसून अभ्यास करणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
मळ्यात “लाल्या” नावाचा कुत्रा होता, जो कोणालाही सहज आत येऊ देत नसे. लाल्या फारच रागीट होता आणि त्याच्या अचानक समोर येण्याने आम्ही अनेकदा घाबरायचो. पाण्याला जाताना किंवा शेतात जाताना आम्ही आधी लाल्या कुठे आहे हे पाहूनच पुढे जात असू, अन्यथा त्याच्या भीतीने पाय थांबत असत.
नातेसंबंध अधिक दृढ झाले
हळूहळू आमच्या कुटुंबाचा भुजबळ कुटुंबाशी असलेला स्नेह अधिक दृढ होत गेला. मोठे दादा, मोठी आई यांचा वावर आमच्या कुटुंबाशी होता. माझ्या शिक्षणाबद्दल आणि आमच्या कुटुंबाचेअसणारे आचार विचार आणि स्वभाव त्यांना आवडत असे.हा जिव्हाळा नातेसंबंधात परिवर्तित झाला, जेव्हा श्री नाना भुजबळ यांची कन्या, पूनम उर्फ नीता, माझी धर्मपत्नी झाली.
आज आम्हीही भुजबळ कुटुंबाचे एक अविभाज्य घटक बनलो आहोत. या कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभागी होणं ही आमची जबाबदारी आणि सन्मान दोन्ही आहे. भुजबळ निवास हा केवळ वास्तू नसून, संस्कार, माणुसकी आणि प्रेमाचा एक अविनाशी ठेवा आहे.
काळ बदलला, जीवन पुढे सरकलं, पण भुजबळ निवास हा केवळ एक वास्तू नव्हे, तर आमच्या संघर्षाचा, यशाचा आणि नात्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे.
आज या वास्तूला निरोप देताना मन भरून येतं. एक निर्जीव इमारतही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कशी बनते, याचा प्रत्यय आता अधिकच गहिरा वाटतो. भुजबळ निवासाच्या भिंतींमध्ये आमच्या आठवणी गुंफलेल्या आहेत—बालपणीच्या खेळाच्या, संघर्षाच्या, शिकण्याच्या आणि शेवटी, नात्यांच्या बंधांच्या.
कै श्री गेनबा नारायण भुजबळ “बाबा” यांनी उभं केलेलं हे भक्कम वास्तुशिल्प केवळ दगड-मातीचं नव्हतं, तर प्रेम, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचं प्रतीक होतं. गावाच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारांमध्ये ही वास्तू साक्षीदार होती—मंदिर बांधणं, वीजपुरवठा सुरू करणं, आणि प्रत्येक गरजूला मदतीचा हात देणं, या त्यांच्या कार्याची ही एक निशाणी होती.आज या घरात चार पिढ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत.
श्री. मुरलीधर तात्या आणि आमच्या कुटुंबातील नाते
श्री. मुरलीधर तात्या आणि आमच्या वडिलांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ नाते होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे विचार जुळले . आमचे वडील शेती खात्यात नोकरी करत असल्याने त्यांचा शेतीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क होता. श्री. मुरलीधर तात्यांची मोठी शेती असल्याने, दोघांमध्ये शेतीविषयक चर्चा होत असत. हळूहळू हा परिचय स्नेहामध्ये बदलला आणि दोघांमध्ये निस्वार्थ मैत्री निर्माण झाली.
श्री. मुरलीधर तात्यांची धर्मपत्नी, ज्यांना सर्वजण “ताई”या टोपण नावाने ओळखत, त्या देखील आमच्या कुटुंबाशी अत्यंत आपुलकीने वागत. त्यांच्या घरातील स्नेहभाव आम्हाला नेहमीच जाणवला.
याच घट्ट नात्याचा पुढे पिढीपर्यंत विस्तार झाला. श्री. मुरलीधर तात्यांचे सुपुत्र श्री. राजेश काका हे माझे जवळचे मित्र आणि स्नेही आहेत. आमचे परस्पर सौहार्द तसेच आपुलकी यामुळे आमच्या कुटुंबांतील नाते अजूनही टिकून आहे.
या नातेसंबंधामुळे आम्हाला विश्वास, आदर आणि एकमेकांच्या सहकार्याची शिकवण मिळाली आहे. श्री. मुरलीधर तात्या आणि आमच्या वडिलांची मैत्री केवळ व्यक्तिगत नव्हती, तर कुटुंबांमधील आपुलकीचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे.
या कुटुंबातील तात्या, काकू,नाना, हुशार अण्णा, कैलास भाऊ, बाळा काका, राजेश काका, चेतन, प्रशांत, योगेश,रुपेश,शिवम आणि देवांग, ही सर्व आपल्या वडीलधाऱ्यांनी घालून दिलेल्या आदर्शचे पालन करत आहेत.
आज आम्ही या वास्तूला निरोप देत असलो, तरी आमच्या हृदयात तिचं स्थान अढळ राहील. ही वास्तू आमच्या यशाचा, संघर्षाचा आणि नात्यांच्या घट्ट बंधाचा एक जिवंत पुरावा आहे आणि कायम राहील.
भुजबळ निवास, तुझ्या आठवणींप्रती आणि तुझ्या साक्षीभावाला आमची कृतज्ञता!
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

