संत भगवान बाबाचे छेद कोणामुळे? क्रमशा.6

संत भगवान बाबाचे छेद कोणामुळे? क्रमशा.6
डाव साधला. आवई उठविली, तुझ्यावर आपवाद घेतला. मी तर थकलेला. माझ्याजवळ जीवाला जीव देणारं कोणीच नाही.”
भगवानबाबांवर घेतलेला आळ माणिकबाबांच्या जिव्हारी लागला होता. मनाची तळमळ झाली होती. भगवानबाबांचे ऐश्वर्य खूप पाहायचे होते पण चांडाळ ब्रह्मचर्यावर घाव घालीत होते. बदनाम करीत होते. थकल्यामुळे माणिकबाबा क्षीण झाले होते. आपल्या लाडक्या भगवानाचा छळ सोसवत नव्हता. स्वतःबद्दलही बरेच काही बोलले. स्वतःला होणारा चांडाळांचा त्रास आज बोलून दाखविला होता.
भगवानबाबांनी आधार दिला. “काही काळजी करू नका, मी तुमची अखंड सेवा करीन, काहीही कमी पडू देणार नाही. तुमची कीर्ती वाढवीन.”
माणिकबाबा म्हणाले, “चल गडावर.”
“आज नाही, उद्या येतो. एक महत्त्वाचं काम उरकतो आणि उद्या नक्की येतो !” असं म्हणून बापू भिल्लाला सोबतीला देऊन सायंकाळी माणिकबाबांना पाठवून दिले.
पौर्णिमेची रात्र. गावातील आणि बाहेरगावची बरीच मंडळी आली होती. भजन केलं. मोकळ्या मनाने गप्पा छप्पा झाल्या. लोकांना वाटले, बाबांचे मन मोकळे झाले, आलेला अपवाद बाबा विसरून गेले.
सकाळ झाली. सूर्य चांगला वर आला होता. बाबा उठले. प्रातर्विधीसाठी निघाले. बापू मागे मागे चालू लागला. थोडे अंतर गेल्यानंतर कारभारीबुवा सावकाराचा गोठा आला. सावकार गोठ्यात झाडलोट, शेणपाणी करवून घेत होते. बाबाला पाहून बाहेर आले.
“काय सावकार, काय चाललं आहे?” बाबांनी विचारले.
“आमचं शेतकऱ्याचं काय असतं! शेण पाणी, दिवसभराची कामाची आखणी सांगत होतो गड्यांना. बरं, आज इकडं कुणीकडं ? सावकार बोलले.
• दुःखे भरला परवालडोह :- बाबा म्हणाले, “दोन तीन दिवस झाले; पखाल डोहाचं दर्शन नाही, म्हणून म्हटलं स्नानाला जायचंच आहे. काही कामही नाही. तेवढेच पाय मोकळे होतील म्हणून निघालो.”
“बरं, बरं. पखाल डोहाच्या बाजूला सर्व शिंदीची झाडे, निरगुडीची झुडपे
आहेत. जरा जपून. स्नान करून या. मी काम उरकतो, मग जाऊ बरोबर गावात.” असं म्हणून कारभारीबुवा आत वळले. पुन्हा बाबांनी हाक मारून जवळ बोलवलं म्हणाले, “आडकित्ता आहे का ? मळमळ करतेय तोंडात जरा सुपारी खाईन म्हणतो.” सावकारांनी कमरेची संबळी काढली. सुपारी कातरू लागले पण बाबा म्हणाले. “अजून तोंड धुतलं नाही, द्या माझ्याकडं, नदीवर चूळ भरतो आणि मीच कातरून घेतो.” आडकित्ता, सुपारी घेतली. खिशात ठेवली. बापूला येथेच बस म्हणाले. एकटेच नदीच्या काठाने गेले.
घंटा, दीड घंटा झाला. कारभारी सावकाराचे सर्व काम संपले. दिवसभराच्या कामाची गड्यांना कल्पना दिली. गावाकडे जाण्यासाठी बाबांची वाट पाहू लागले. बापू गोठ्याच्या दारात बसून होता. दोघे वाट पाहून कंटालले. पौडुळच्या वाटेने आलेल्या वाटसरूकडे चौकशी केली; पण पखालडोहाजवळ कोठेही बाबा दिसले नाहीत. वाटेलाही भेटले नाहीत, असे कळले.
बापू भिल्ल आणि कारभारी सावकार बाबांना शोधायला नदीच्या दोन्ही बाजूने निघाले, बाबा ऽऽ बाबा ऽऽ हाका मारू लागले. पखाल डोहाजवळ शिदीची झाडे आणि निरगुडीच्या दाट झुडपातून वाट काढीत आत घुसले. पळसाचे एक मोठे उंच झाड होते. चढून आजूबाजूला सर्वत्र पाहाता येईल, कारभारीने विचार करून, तिकडे निघाले. पळसा जवळच्या मोकळ्या जागेत जमिनीवर पडलेल्या अवस्थेत बाबा दिसले.
लंगोट एका बाजूला पडलेला होता. चौपदरी घडी करून गुंडाळलेले धोतर रक्ताने माखलेले होते. बाजूला शिंदीच्या झाडाचा बुडखा रक्ताने लाल झालेला असून मांसाचा गोळा आणि आडकित्ता पडलेला होता.
कारभारी सावकार वयस्कर जाणता माणूस होता. बाबांनी लिंग कापलं ! त्यांनी ओळखले. मोठ-मोठ्याने बोंब ठोकली. बोंबलण्याचा आवाज ऐकून पैलतीराचा बापू भिल्ल पळत आला. चित्र पाहून बेशुद्ध होऊन खाली पडला. बापूला सावरावं की बाबाला ? काहीच समजेना. “धावा ऽऽ ! धावा ऽऽ ! पळा ऽऽ पळाऽऽ” मोठ्यानं आरोळी मारली.
कारभारी सावकाराची आरोळी आणि बोंबलण्याच्या आवाज गावापर्यंत गेला. खांबा, लिंबा, पौंडूळचे लोक धावत पळत पखाल डोहाकडे आले.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




