सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.7

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.7

(तेवीस)

मिशनऱ्यांनी आणि उदारमतवादी युटिलिटेरियन व्हिग इंग्रज प्रशासकांनी मातृभाषेचे महत्त्व वाढवले आणि विवेकनिष्ठ ज्ञानशाखांचा विकास करायचे ठरवले. ह्या बरोबरच भोंगळ आर्या व श्लोक लिहिण्याची भरमसाट पद्यपरंपरा मेली. महाराष्ट्रात स. का. छत्रे, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, बाबा पदमनजी, विष्णुशास्त्री पंडित, दादोबा पांडुरंग तर्खडकर, रा. भि. गुंजीकर अशी विविध जातिजमातींमधील शहाण्या विचारवंतांची गद्य परंपरा वाढू लागली. इ. स. १८५५ मध्ये ह्याच विविध जातीय मराठी परंपरेत जोतीराव फुले, ‘तृतीय रत्न’ नामक गद्य नाटक लिहून दाखल झाले. मराठी भाषा सबंध मराठी समाजाला एकत्र बांधणारी शक्ती आहे हे मराठीपणाचे भान फुल्यांना जबरदस्त होते. एके ठिकाणी ते लिहितात, “महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणांपर्यंत लोक आहेत त्या सर्वासच मराठे म्हणतात. “२

परंतु फुल्यांचे दुहेरी दुर्दैव असे की नेमके ते लिहू लागले तेव्हा मराठी संस्कृतीचे केंद्र मुंबईसारख्या बहुजातीय उदार शहराकडून पुण्यासारख्या चित्पावनी एकजातीय बुरसट पेशवाईच्या अवशेषाकडे सरकले. पुन्हा अशाच उर्मट ब्राह्मणी शहरात त्यांनी आपली महत्त्वाची वर्षे वाया घालवली. त्यामुळे त्यांच्या लेखनाला पुण्यातल्या इंग्रजी विद्या हस्तगत करून अधिक “अट्टल जात्याभिमानी” झालेल्या स्वार्थी आर्यब्राह्मणी संस्कृतीचे “वेड” लागले. एकोणिसाव्या शतकातल्या हिंदुस्थानातल्या आर्यब्राह्मणी संस्कृतीचा अर्क असलेल्या शहरात राहून फुले आपले सत्यशोधकत्व ब्राह्मणकेंद्रित व विनाकारण संतप्त करीत असताना दिसतात. पुण्यात राहणारे, ब्राह्मणांच्या सुधारणेची चिंता करणारे, ब्राह्मणांच्या विधवांसाठी व मुलींसाठी शिक्षणासाठी देह झिजवणारे आणि तुरुंगातून सुटून आलेल्या टिळक-आगरकर यांचा सत्कार करणारे फुले खऱ्या अर्थाने ब्राह्मणद्वेष्टे वाटत नाहीत.

फुल्यांच्या एकूण जगण्याची शैली, पंडिती परंपरेच्या विरोधात आविष्कार करण्याची, प्रत्यक्ष कृती करून हिंदुस्थानातल्या पहिल्या लोकचळवळीचा पाया घालणाऱ्या द्रष्टेपणाची आणि समाजकार्य करण्याची शैली त्यांच्या गद्याच्या संदर्भात नेहमी समोर ठेवली पाहिजे. फुल्यांचा काळ व त्या काळातला मराठी समाज, फुल्यांची कष्टकरी जात, शिक्षण, वाङ्मयीन परिणाम आणि कार्यक्षेत्र या सर्वांचा त्यांच्या गद्याशी मेळ घातला पाहिजे. फार काय त्यांचा पोषाखही ह्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. आपल्या पुढाऱ्यांचे पोषाख आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा अत्यंत जवळचा संबंध वाटतो आणि शैलीच्या दृष्टीने हा संबंध अभ्यसनीय ठरतो,

२. महात्मा फुले : समग्र वाङ्मय-संपादक: धनंजय कीर व स. गं. मालशे, पृ. २६६

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button