सोशल

!!! कवियत्री बहिणाबाई !!!

!!! कवियत्री बहिणाबाई !!!

भाग – ४.
गत जिवनातील दुखःद आठवणी आल्या की, ही भूमिकन्या कळवळून भूमातेला विचारते…
” सांग सांग धर्ती माता।
अशी कशी जादू झाली।
झाड गेलं निंघीसनी।
मांघे सावली उरली।”
या ओळीतून अपार कारुण्य झिरपतांना दिसते. रडून रडून क्लांत झालेल्या आपल्या जीवाची त्या स्वतः समजूत घालत, सावरताना म्हणतात, भरले डोळे रिते होता होता अश्रू ही संपले. पण अंतःकरणातले दुःख मात्र तसेच राहिले. स्वगतच म्हणायच्या, माझ्या देवाने ( पतीने) आपला ठेवा ( मुलं) ठेवून देवा घरी गेला. तरी आपले दुःख आवरून मुलांच्या संगोपणासाठी कर्तव्याला समोरे जाणे भाग आहे….,
” रडू नको माझ्या जीवा।
तुले रड्याची रे सव।
रडू हासव रे जरा।
त्यात संसाराची चव।।”
अशा मनाला पिळवटून टाकणाऱ्या ओव्या म्हणत, आपल्याच मनाला उपदेश करत, समजावत. नशिबाचा फेरा, कर्मगती कुठे कुणाला चुकली आहे?
” अरे नशीब नशीब।
लागे चक्कर पायाले।
नशिबाचे नऊ गिर्‍हे।
ते भी फिरत राह्यले।।”
मंगळसूत्र तुटले तरी, पतीला दिलेल्या वचनाचे, कर्तव्याची जाण, आणि कुंकू पुसल्या गेले तरी गोंदणाच्या बळावर नशिबाला आव्हान देण्यास त्या सिद्ध झाल्या. बांगड्या फुटल्या तरी मनगटावरील कर्तृत्वावर असलेल्या विश्वासाच्या बळावर त्यांनी लोकांची फुकट मिळणारी सहानुभूती नाकारली. ज्योतिषासाठी दरवाजे बंद केले. त्यांच्या दुःखाला कारुण्याची किनार जरूर होती. त्यात आकांत आक्रस्तळेपणाचा लवलेशही नव्हता. संकट समयी मनाचा तोल ढळू न देता, आपले कर्तव्य बजावणे हे बहिणाबाईचे फार मोठे सामर्थ्य होते. त्या स्वतःचेच अश्रू स्वतःच पुसून कर्तव्याला सामोरे गेल्या. आपल्या जीवनात संकटाच्या काट्याकुट्यांनी भरलेली वाट आहे हे त्या जाणून होत्या. नातलग, सगे सोयरे सारे मतलबी. त्यांच्याकडून आशा करणे व्यर्थ आहे. म्हणून त्या स्वतःलाच बजावतात, स्वतःला धीर देत म्हणतात….
” तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव ।।”
वाऱ्याच वहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट
दोन्ही बाजूंन दर्‍या
धर झुडुप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती ।।”
त्यांच्या अनुभवातून उमटलेले हे बोल, मन हेलावल्या खेरीज राहत नाही. बहिणाबाईच्या या मूक दुःखातच पीळ आणि सामर्थ्य सामावलेले आहे.
गावात महामारी आली. महामारीच्या निवारणार्थ महारवाड्यातील एका महाराला अनवाणी पायाने पाण्याने भरलेली घागर घेऊन त्यातील पाणी सांडवत सांडवत गावाला फेरी मारावी लागत असे. त्यावेळी गावचे लोक त्याला दगड, धोंडे, शेणाचे गोळे फेकून मारीत. वाट तर काट्याकुट्यांनी भरलेली. त्यातून अनवाणी चालणे म्हणजे एक दिव्यच असे. गावाच्या भल्यासाठी त्याला हे करावंच लागे.
त्या महाराचे ते अग्नीदिव्य पाहता पाहता आपल्या जीवनातील रस्ता बहिणाबाईच्या नजरेसमोर उभा राहिला. “लावनी पार आता, तुझी तुलाच नाव। हे संदर्भ त्यांच्या जीवनाशी निगडित वाटतात.
प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचा कणखरपणा विपरीत काळातही मनाचा तोल ढळू न देण्याचे सामर्थ्य, मदतीसाठी लाचार न होण्याचा ताठरपणा आणि नशिबाला हरवण्याची जिद्द या बहिणाबाईच्या स्वभावातील गुणांचे दर्शन घडून येते. त्यांच्या याच गुणामुळे त्यांना स्वभावतः कविता स्फुरू लागल्या.
त्यांच्या कवितेमधून बहिणाबाईच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी पैलू आपल्याला दिसतात. कर्मनिष्ठेलाच ईश्वरनिष्ठ मानणाऱ्या बहिणाबाई संसाराचे आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, त्यातही विनोद बुद्धी जागवणाऱ्या बहिणाबाई, निसर्गाशी एकरूप होणाऱ्या बहिणाबाई, माहेरच्या आठवणीने हरकून जाणाऱ्या बहिणाबाई अशा कितीतरी रूपात त्या आपल्या कविता मधून साकार झाल्यात. वैधव्याची कुर्‍हाड कोसळली तरी नशिबाला दोष देऊन स्वतःच्या दुःखात चूर झाल्या नाहीत किंवा आत्मकेंद्रीत झाल्या नाहीत. केवळ मानव जातीलाच नव्हे तर, उभ्या चराचराला त्यांनी आपल्या कवेत घेतले. त्यांच्या दृष्टीची कक्षा विस्तारली. आणि त्यातूनच त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान जन्माला आले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
९४२१००८३९९. *
शिव क्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78* 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button