!!! कवियत्री बहिणाबाई !!!

!!! कवियत्री बहिणाबाई !!!
भाग – ५.
बहिणाबाईच्या पाठी गरिबी, वैधव्य, चिंता, दुःख सतत असे. पण त्याबाबत त्या कधी खंत करीत नसत. माणूस रडता रडता जन्माला येतो तेव्हा त्याने हसत हसत जगावे असे त्यांचे मत होते. परिस्थिती आणि दुःख, त्यांच्या काव्य रचनेच्या आड कधीच आले नाही.
” माझं दुःख, माझं दुःख
जशी अंधारातील रात
माझं दुःख माझं सुख
हातातली काडवात।”
या काडवातीच्या प्रकाशातच त्यांचा अंधारलेला रस्ता उजळून गेला. आणि अखंड वाटचाल सुरू ठेवली.
” माझं दुःख माझं दुःख
तय घरात कोंडले
माझं सुख माझं दुःख
हांड्या झुंबर टांगले।”
या हांड्या झुंबराच्या लोलकातूनच त्यांना बहुरंगी, बहुरढंगी जीवनाचा आस्वाद मनमुराद घेता आला. बहिणाबाईच्या जिवन तत्वज्ञानाला देव, निसर्ग, आणि माणूस हा त्रिसूत्रीचा पाया आहे. आणि या त्रिसूत्रात त्यांना अभेद्य किंवा विविधतेच्या मुळाशी एकच तत्त्वज्ञान असल्याची जाणीव हाच त्याचा गाभा आहे हे त्यांनी जाणले.
बहिणाबाईचे निसर्गावर अतिशय प्रेम होते. आपल्यात आणि निसर्गात एकच तत्व असल्याचा त्यांना साक्षात्कार घडे. या अतूट नात्याच्या बळावर त्या वाऱ्यालाही साद घालून खोळंबलेली उपपणी आटपावी म्हणून त्या बजावत….
” चाल ये रे ये रे वाऱ्या
ये रे मारुतीच्या बापा
नको देऊ रे गुंगारा
पुऱ्या झाल्या तुझ्या थापा।।”
याच वाऱ्याने कुठे दडी मारली की, त्या म्हणत…
” भिनभिन आला वारा
कोण कोनाशी बोलली?
मन माझं हरखलं
पान झाडाची हालली।।”
या ओळीतून त्यांची निसर्गाशी असलेली तद्रुपता दृष्टीपथास येते. हाच वारा त्यांचा दूत बनून माहेरचा निरोपही घेऊन येतो…..
” माहेरून ये निरोप
सांगे कानामध्ये वारा
माझ्या माहेरच्या खेपा
‘ लौकी ‘ नदीले इचारा।।”
आणि त्या निरोपासरशी अतूट ओढीने धावणाऱ्या या माहेरवाशिनला वाटेवर असणाऱ्या दगडाला ठेचकाळते. मग त्या दगडालाही प्रेमाचा उमाळा येऊन त्याला म्हणते…..
” नीट जाय मायबाई
नको करू धडपड
तुझ्याच मी माहेरच्या
वाटावरला दगड।।”
तेवढ्यात तिच्या वाटेवर भिरभिरणारी सायंकी तिच्या आगमनाची वार्ता तिच्या आईला देत म्हणते…
” उठ उठ भीमामाय
काय घराव बसली
कर गुरमय रोट्या
लेक बहिनाई आली।।”
चराचर सृष्टीतील सजीव- निर्जीव वस्तूमात्रांविषयी बहिणाबाईच्या या भावना म्हणजे मानवी भावभावनांचे अधिक प्रगल्भ विशाल स्वरूप होय! ” मोट हाकलतो ” ही कविता अशाच भावनेतून निर्माण झाली…..
. “येहेरीत दोन मोटा । दोन्हीमध्ये पाणी एक
आडोयाले कना,चाक। दोन्हीमधी गती एक
दोन्ही नाडा- समदूर। दोन्हीमधी झीज एक
दोन्ही बैलांचं ओढणं। दोन्हीमधी ओढ एक
उतरनी-चढणीचे। नाव दोन घाव एक
मोट हाकलतो एक। जीव पोसतो कीतीक?
या गाण्यातून संसार, शेती किंवा कृतीच्या व मनाच्या एकात्मतेच्या हजारो तर्हा फळणारी निर्मिती घटित होते. मानवी जीवनातील चिरंतर मूल्याचा साक्षात्कार निसर्ग घडवीत असतो. माणसाने डोळे उघडे ठेवून पाहायला मात्र हवे.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
९४२१००८३९९.
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01


