मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आजपासून उतरती कळा

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आजपासून उतरती कळा
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे आज मराठा आरक्षण आंदोलनाचे मारेकरी ठरले. महाराष्ट्रात निघालेल्या 56 मराठा मोर्चासह गेल्या पाच महिन्यापासून चालवलेल्या या आंदोलनाची पुण्याई जरांगे यांनी आज मातीमोल केली.
गेल्या काही महिन्यांपासूनची त्यांची असंसदीय आणि शिवराळ भाषा देखील या महाराष्ट्राने खपवून घेतली . गावाकडच्या सामाजिक परिस्थितीमध्ये हीच ‘ बोलीभाषा ‘ असल्याचे समर्थन करीत मराठा समाजासह अनेकांनी जरांगे यांच्या शिवराळ भाषेला एक प्रकारे ‘ लोकमान्यता ‘ दिली .
परंतु आज त्यांनी फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख करत त्यांना दुषणे देत ‘ सलाईन मधून विषबाधा ‘ करणार असल्याचा बालिश आरोप करत आपल्या द्वेष भावनेचे प्रतिबिंब दाखविले. आक्रस्ताळेणा करत दिशाहीन योध्यासारखे ते वागले आणि आंदोलन भारकटत मुंबईला निघाले .
सरकार वरील नैतिक दबाव संपला
मनोज जरांगे यांच्या जीवनातील आणि ऐतिहासिक मराठा आंदोलनातील ही सर्वात मोठी ऐतिहासिक चूक ठरली. त्यामुळे घाबरून असलेले , दबून असलेले आणि त्यामुळेच संयमांमध्ये असलेले महाराष्ट्र सरकार देखील आज आक्रमक झाले . मुख्यमंत्र्यांनी प्रथमच मनोज जरांगे यांना उघड उघड दोष देत त्यांच्या मागे राजकीय शक्ती असल्याचा ठळक उल्लेख केला
आणि येथेच हे ‘ सामाजिक आंदोलन ‘ संपले. *जोपर्यंत आंदोलनातील प्रामाणिकपणा , शुचिर्भूतता आणि एक प्रकारचा आंतरिक संयम जिवंत होता , तोपर्यंत त्याची भीती सरकारच्या आणि प्रशासनाच्या मनामध्ये होती . आज जरांगे यांचा तोल सुटला आणि त्यांच्या आक्रस्ताळी वागण्यामुळे या आंदोलनाची उतरती कळा सुरू झाली हे निश्चित.* मनोज जरांगे यांनी गेल्या पाच महिन्यापासून अक्षरशः सरकारच्या मनामध्ये धडकी भरवली होती.
जरांगे यांच्या बद्दल ही भीती नव्हती तर त्यांच्या पाठीमागे एकमुखाने उभ्या राहिलेल्या मराठा जनतेच्या व्यापक जनमताची ही भीती होती. भीतीला घाबरून इच्छाशक्ती नसताना देखील सरकारने मराठा आंदोलनाबाबत गतीने पावले उचलली ,हे नाकारता येणार नाही .
कायद्यामध्ये टिकणारे आरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्यामुळे आरक्षणाचे गणित केवळ दहा टक्क्यावर थांबवले गेले . काही करून हे आरक्षण टिकवायचे म्हणून ती संख्या कमी केली. त्याला मागासवर्ग आयोगाचा अहवालाची जोड दिली. हा अहवाल देखील खरा नाही ,
तो देखील दबावातून आला आहे अशीही टीका ओबीसी नेत्यांनी केली. परंतु त्याला न जुमानता हा अहवाल स्वीकारला. येथे सरकारच्या प्रामाणिकपणाची पहिली पावती मिळते. सर्वेक्षणासाठी चार लाख लोकांची फौज राबली . रात्रंदिवस ते काम पूर्ण करत विक्रमी वेळेमध्ये त्या नोंदी घेतल्या गेल्या . *या सर्व कवायती केवळ मनोज जरांगे पाटील यांना घाबरून आणि त्यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊनच केले हे नाकारता येणार नाही .*
दरम्यान जरांगे यांनी अनेकदा आपल्या मागण्यावरून कोलाड उड्या मारल्या , विस्तारित मागण्या केल्या तरी देखील सरकारने ते लाड पुरविण्याचा प्रयत्न केला . स्वतः मुख्यमंत्री म्हणून अंतरवाली सराटी येथे एकनाथ शिंदे गेले त्यानंतर नवी मुंबई येथील देखील आंदोलनाला ते सामोरे गेले.
कारण जरांगे पाटील यांच्या पाठीमागे व्यापक समाजाची शक्ती होती.
ट्रॅप असेल तर यशस्वी झाला
परंतु गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे यांच्या या सामर्थ्याची जागा अहंकाराने घेतली. त्यांना ग पणाची बाधा झाली. त्यांना भेटायला येणारे मोठे लोक , राज्यभरात मिळणारा पाठिंबा यामुळे कुठेतरी अहंकाराची भावना लागलेल्या जरांगे यांना काहीही विरोधी वक्तव्य सहन होईना .त्यातच त्या आंदोलनाचे भाग असलेल्या महाराज बारसकर यांचा विरोध त्यांना अक्षरशः वर्मी लागला आणि त्यातूनच त्यांचा तोल सुटू लागला . जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे , हा आरोप तर त्यांना कालपासून सहनच होईना आणि तिथूनच त्यांचा तीळपापड झाला . ते रडले . आक्रोशले . संतापून बोलले . कारण त्यांना हा आरोप सहनच होत नव्हता.
सुरुवातीला हा राजकीय ट्रॅप आहे ,याकडे लक्ष देऊ नका अशी परिपक्वपणाची भूमिका जरंग यांनी घेतली . पण केवळ दोन दिवसानंतरच त्यांना ते सहन होईना . जर हा खरोखरच ट्रॅप होता तर तो यशस्वी झाला असे म्हणावे लागेल. केवळ आरोपांमुळेच विचलित झाले आणि दिशाहीन झाले . सातत्याने बारसकर यांनी हा आरोप केला. त्याला अनेकांनी साथ दिली आणि या आंदोलनाला राजकीय वळण लागले . केवळ 48 तासात जरांगे यांचा तोल सुटला.
पोटातले ओठावर …
त्यांनी आज फडणवीस यांची जात काढली. ‘ बामणी कावा ‘ म्हणून त्यांना हिणवले . सलाईन मधून औषध देऊन किंवा एन्काऊंटर करून मला मारण्याचा प्रयत्न होतोय …. हे अत्यंत बालिश उदगार त्यांनी काढले . *जरी एखाद्याला मनोज जरांगे यांना संपवायचे असेल , तरी ते सलाईनच्या औषधांमधून किंवा गोळ्या घालून संपविण्याचा मूर्खपणा कोणी करणार नाही . हीच सामान्य जनतेची प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे आता हा माणूस काही बरळतोय असेच प्रत्येकाला वाटले .फडणवीस यांच्यावरील हे आरोप मूर्खपणाचे होते .* कदाचित स्वतः जरांगे यांना देखील ते पटले नसावेत . त्यामुळे जरांगे यांच्या मुखातून कोणीतरी अन्य बोलत आहे याची खात्री पटू लागली . कदाचित त्यांच्यामागे कोणी नसेल परंतु केवळ आत्मभान सुटल्याने आणि अतितिरस्कार आणि एका जातीय द्वेषापोटी त्यांनी हे विधान केले गोष्ट होते .
तडकाफडकी उठायचं , लगेच सागर बंगल्यावर जातो म्हणून आक्रमताळेपणा करायचा . गाडीत बसायचं . निघायचं …ही आंदोलन भरकटल्याची पहिली चिन्ह होती. या आंदोलनाला डाग लागला . आता या आंदोलनाची नियोजनबद्धता संपली . टप्प्यात आंदोलन होणार , शिस्तीत होणार असे म्हणणारे जरांगे सर्वच समाजाला एक शिस्तबद्ध सैनिक वाटत होते . एक व्यूहरचनाकार वाटत होते .सरकारला नमवणारे चाणक्य वाटत होते .ते एकदम बिघडले आणि स्वतःच अत्यंतिक रागापोटी विचित्र वागू लागले . जातीचे नाव घेऊन आरोप करू लागले . याला पूर्णपणे राजकीय रंग आला . त्यापेक्षा सरकारने त्याला राजकीय रंग देण्याचे योग्य संधी साधली .
असेही म्हणावे लागेल . परंतु आता हे आंदोलन राजकीय मोड वरती गेले . कधीही विरोधात न बोलणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज उघडपणाने जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली . त्यामुळे सरकार नावाची शक्ती आता त्यांच्या विरोधात ठामपणे उभी राहणार हे स्पष्ट झाले . ‘ सरकार विरुद्ध एकाच जातीचे ‘ हे आंदोलन हा संघर्ष जर आपण बारकाईने पाहिला तर यामध्ये सरकारच वरचढ असते . कारण अशावेळी सरकारच्या बाजूने अन्य जाती धर्माचा देखील नैतिक सामर्थ्याचा रेटा उभा राहतो . सामाजिक ताणबाणे जपत असताना एकमेकांच्या विरोधात आपण व्यावहारिक जगात वागू शकत नाही , हे सर्वांना चांगले माहित आहे . आरक्षण वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत . आजचा जीवन संघर्ष करण्यासाठी एकोप्याने नांदावे लागते . पोटात काही असले तरी ओठांमध्ये चांगलेपणानेच बोलावे लागते. पोटातली मळमळ ओठावर आणून चालत नाही. म्हणून जातीय सलोखा शाबूत राहतो . जरांगेने आज ही मर्यादा ओलांडली . त्यामुळे आजपासून जरांगे यांच्या आंदोलनाला उतरती कळा लागली .
आंदोलन अत्युच्च पातळीवर गेले होते . आजचे त्याचे शिखर हे अखेरचे . आता उद्यापासून ते उतरणीला लागेल . दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा




