सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.17

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.17
जाधव गोविंदराव विठोजीराव (जन्म १७ जानेवारी १८८१)
सत्यशोधक गोविंदराव विठोजीराव जाधव हे बिनीचे सत्यशोधक नामदार भास्करराव विठोजीराव जाधव यांचे धाकटे बंधू असून त्यांचा जन्म १७ जानेवारी १८८१ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. गोविंदराव जाधव १८९६ साली राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथून मॅट्रिक झाले. १९०१ साली ते बी.ए. झाले. १९०७ साली ते एलएल. बी. झाले. एलएल. बी. झाल्यावर कोल्हापुरात वकिलीही सुरू केली. ज्येष्ठ सत्यशोधक प्रा. अण्णासाहेब लड्ढे यांच्या सहकार्याने अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या ठिकाणी पुढे राजर्षी शाहूंनी मिस क्लार्क वसतिगृहाची स्थापना केली.
दापोली व वरखेड येथे विद्याप्रसारक शिक्षण संस्था उभी केली. इ. स. १९१४ साली नाशिक येथे सत्यशोधकांनी स्थापन केलेल्या श्री उदोजी महाराज पवार वसतिगृहास त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. कोल्हापूर येथील वास्तव्यात कोल्हापूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या सत्यशोधक ‘मराठा दीनबंधु’ पत्रात त्यांचे अनेक सत्यशोधक मताचे लेख प्रसिद्ध झाले. बेळगावहून प्रसिद्ध होणाऱ्या सत्यशोधक ‘प्रगति’ पत्रासही गोविंदराव जाधवांचे विपुल लेखन लाभले. पुढे गोविंदराव जाधव सुरत येथे सबजज्ज म्हणून रुजू झाले. सुमारे १९४१ साली ते सेवानिवृत्त झाले.
दरम्यान, ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूर येथे श्रीमंत परशरामराव घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील सत्यशोधकांची एक बैठक होऊन कोल्हापूर सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली. ना. भास्करराव जाधव या शाखेचे अध्यक्ष होते, तर उपाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब लड्डे हे होते. हरिभाऊ चव्हाण हे सचिवपदी होते. अशा या दिग्गजांच्या कार्यकारिणीत गोविंदराव जाधव हे सन्माननीय सदस्य होते. याच समवेत पुणे येथील ‘डेक्कन मराठा एज्युकेशन’ या नावाजलेल्या संस्थेचेही ते सदस्य होते.
पुढे दिनांक २६ जून १९५१ रोजी, ना. भास्करराव जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचा ‘रामायणावर नवा प्रकाश’ ग्रंथ प्रसिद्ध झाला. या वाङ्मयीन प्रकल्पासाठी गोविंदराव जाधव यांनी परिश्रम घेतले
.शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




