वैयक्तिक पातळीवर मात्र मी अण्णासाहेब डांगे यांच्या राजकीय प्रयोगाला मदत केली होती.

वैयक्तिक पातळीवर मात्र मी अण्णासाहेब डांगे यांच्या राजकीय प्रयोगाला मदत केली होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डांगे यांनी भारतीय जनता पक्ष सोडला व ओबसी प्रवर्ग डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष स्थापन करणार होते. आपण डांगे यांना मदत केली पाहिजे, असे कपिल पाटीलही मला म्हणाले होते. पण डांगे हे भाजप व जनसंघाचे नेते असल्याने कपिल पाटील बाजूला झाले. या दोघांनी आपापले राजकीय पक्ष स्थापन केले.
डांगे यांच्या पक्षाचे नाव होते लोकराज्य पक्ष. मी पक्षात प्रत्यक्ष नव्हतो पण धनगर समाजातील एक नेता स्वतंत्रपणे राजकीय खटपट करत असल्याने त्यांना मदत केली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबत युती व्हावी यासाठी डांगे प्रयत्न करत होते. बीड जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या रजनीताई पाटील यांनी डांगे व मराठवाड्यातील काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची भेट घालून दिली. मी त्यावेळी त्यांच्यासोबत होतो. चाकूरकर यांनी नंतर डांगे व सोनिया गांधी यांची चर्चा घडवून आणली. या चर्चेत डांगे यांनी माझ्यासाठी औरंगाबाद व त्यांच्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघ मागितला.
पण काँग्रेस त्यासाठी तयार झाली नाही. तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, राज्यसभा व विधान परिषदेची प्रत्येकी एक जागा नंतर देऊ, असे सांगण्यात आले. त्याला लोकराज्य पक्षाने संमती दिली. निवडणुकीत काँग्रेस पुन्हा विजयी झाली. मात्र पुढे चर्चाच झाली नसल्याने राज्यसभा व विधान परिषदेची जागा लोकराज्य पक्षाला मिळाली नाही एवढेच मला माहीत आहे. फार पूर्वी म्हणजे १९८३-८४ मध्ये नवी दिल्लीतील मंडल आयोगाच्या लढाईत मी सामील होत होतो,
तेव्हा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांची ओळख झाली. त्यांनी मला महाराष्ट्रात पक्षाचे काम करावे, असे सुचवले होते. मला संयोजक करण्याबद्दलचे पत्रही दिले. परंतु, मी ‘बसप’ मध्ये सामील झालो नाही. ‘बामसेफ’मधील कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी १९८४ च्या निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात मी व अॅड. बी. एन. वाघ यांनी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा जीव तोडून प्रचार केला.
काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या दोन आमदारांमुळे मुस्लिम ओबीसी चळवळीला लाभ होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मी संघटनेचेच काम करायचे ठरवले व निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिलो. सरकारवर संघटनेचा सामाजिक दबाव निर्माण केल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटत नाहीत, असे माझे मत आहे. मी आजही संघटनेचे काम करत आहे.
संघटना फोडण्याचा प्रयत्न
मुस्लिम ओबीसींचे लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर संघटनेचे विरोधकही वाढले. सर्व राजकीय पक्षांतील मुस्लिम नेत्यांकडून टोकाचा विरोध होऊ लागला. संघटनेला पाठिंबा वाढत असल्याने त्यांच्याकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. अजिबात वस्तुस्थिती नसलेले व बिनबुडाचे आरोप करण्यात आले. संघटनेच्या कामांसाठी मी व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटत होतो. आमच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री व शासन मागण्यांना प्रतिसाद देत होते. आवश्यक त्या ठिकाणी नवीन जीआर, सर्क्युलर काढण्यात येत होते. सतत दौरे सुरू होते. मुख्य म्हणजे मी, पिढ्यान् पिढ्या होणाऱ्या लाभाबद्दल जनजागृती करत होतो.
ज्यांना पटले ते प्रमाणपत्र काढून लाभ घेत. त्याची चर्चा होई. त्यामुळे सर्वपक्षीय मुस्लिम राजकीय नेते अस्वस्थ झाले. काही काळ गावागावातील राजकीय कार्यकत्र्यापेक्षा संघटनेच्या कार्यकर्त्याला जास्त महत्त्व मिळू लागले. त्यामुळे संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. काँग्रेसने १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत संघटनेला पाच जागा दिल्या. काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांच्यासोबत राबता वाढला. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही आमच्या कार्याची दखल घेतली. त्यामुळे काँग्रेसमधील मुस्लिम नेते अस्वस्थ झाले. त्यांच्याकडून संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. पण एखाद-दुसरा अपवाद वगळता त्यांना यश आले नाही. सर्व आव्हानांना पुरून उरत जनतेच्या आशीर्वादाने ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन आजही कार्यरत असून वयाची पंच्चाहत्तरी उलटत असताना मी मुस्लिम ओबीसींसाठी काम करत आहे.
मंडलनामा |
57
शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल लावा




