मंडलनामा क्रमशः 54.चर्चासत्रे व प्रशिक्षण

मंडलनामा क्रमशः
54.चर्चासत्रे व प्रशिक्षण\
मोर्चे, निदर्शने, मेळावे याशिवाय संघटनेतर्फे वैचारिक मांडणीही करण्यात आली. त्यात मुंबई विद्यापीठात झालेल्या एका चर्चासत्राचा मोठा वाटा राहिला आहे. समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते प्रा. डॉ. भालचंद्र मुणगेकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांना मुस्लिम ओबीसी चळवळीची माहिती होती. कुलगुरूंच्या पुढाकारामुळे विद्यापीठ व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Confornting inequalities: Muslim Communities’ या विषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली. डॉ. मुणगेकर यांनी परिषदेची जबाबदारी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. के. भौमिक यांच्यावर सोपवली. डॉ. भौमिक यांच्या प्रयत्नांमुळे २६ ते २८ मार्च २००२ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या जे. पी. नाईक सभागृहात झालेल्या परिषदेला २९ विद्यापीठातील संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक व विद्वान उपस्थित राहिले.
या राष्ट्रीय परिषदेत तिरुवअनंतपूरम् येथील जस्टीस फातिमा बी अन्नावेदू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर ऑफ इंडियन लँग्वेजेसचे डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, मुंबई येथील कमांडिंग हेडक्वॉर्टर महाराष्ट्र अॅण्ड गुजरातच्या जनरल ऑफिसर नोमिता यादव, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर पोलिटिकल स्टडीजचे प्रोफेसर डॉ. इम्तियाज अहमद, मदुराई येथील डॉ. एम. एस. किटचलू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे डॉ. अन्वर आलम, उदयपूर (राजस्थान) येथील मोहनलाल सुखदिया विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या डॉ. झेनब बानू, अलीगड मुस्लिम विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे डॉ. सय्यद जहिरोद्दीन, नागपूर येथील शिबानी रॉय, दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे डॉ. गोपाळ गुरू, मद्रास विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. एम. ए. कलाम, पटना येथील डी. एन. कॉलेजच्या समाजशास्त्र विभागाचे डॉ. सरफराज अहमद, पंजाब विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. के. गोपाल अय्यर, जम्मू येथील डॉ. बलराज पुरी, मिदनापूर (पश्चिम बंगाल) येथील विद्यासागर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे डॉ. सय्यद अब्दुल हाफीज मोईनोद्दीन, म्हैसूर येथील अन्थ्रोपोलॉजिकल सव्र्व्हे ऑफ इंडियाचे डॉ. अब्दुल अजीज साहेब, खेड (पुणे) येथील मेहबूब सय्यद, सी. एस. डी. एस.चे (नवी दिल्ली) योगेंद्र यादव व पटना येथील अली अन्वर (माजी खासदार) या अभ्यासकांनी संशोधन पेपर सादर करून सखोल चिंतन केले. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम ओबीसींची अवस्था समाजशास्त्रीय पद्धतीने प्रथमच समोर आली.
विद्यापीठाच्या कॉन्व्हकेशन हॉलमध्ये झालेल्या चर्चासत्राच्या समारोपाला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मंत्री पतंगराव कदम व हसन मुश्रीफ यांच्यासह ओबीसी नेते अॅड. जनार्दन पाटील, सामाजिक कार्यकर्ते पी. ए. इनामदार, डॉ. झहीर काझी, लेखक व गीतकार हसन कमाल आणि पत्रकार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चळवळीत वेगवेगळ्या टप्प्यांवर कार्यकर्ते सामील होत असतात. प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आल्या की, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जाऊन वाद घालत. त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे युक्तिवाद करून प्रमाणपत्र देण्याचा आग्रह धरतात. परंतु, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुरावे दाखल करावे लागतात. त्यासंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून, प्रसंगी संघर्ष करून अनेक जीआर काढून घेतले आहेत. अधिकाऱ्यांनाही त्यांची पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे वादाऐवजी पर्याय कसे सुचवावेत यावर संघटनेने भर दिला. यासाठी कार्यकत्यांची प्रशिक्षण शिबिरे घेतली. २० जानेवारी २००१ रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे पहिले प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात कार्यकत्यांना मुस्लिम ओबीसी प्रमाणपत्रांसंदर्भात काढण्यात आलेल्या सर्व जीआरची माहिती देण्यात आली. कार्यकत्यांना त्याच्या प्रती देण्यात आल्या. या प्रकारची प्रशिक्षण शिबिरे गरजेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली. यामुळे प्रशासनासोबत वाद टळून प्रमाणपत्रे मिळण्याचा वेग वाढला. एखादे प्रकरण अडले की कार्यकर्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जीआरची प्रत घेऊन जातात. या प्रशिक्षणामुळे शिस्तबद्ध कार्यकर्ते तयार झाले.
या शिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या प्रतिष्ठित संस्थेकडून मला अनेकवेळा विविध विषयांवर व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले. या माध्यमातून मी सामाजिक न्यायाचा लढा पुढे नेला.
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




