महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.14

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.14
महात्मा फुले : जडणघडण
गं. बा. सरदार
महात्मा फुले यांनी आपले व्यक्तित्व स्वयंप्रेरणेने व आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घडवले होते. त्यांचा पिंड हा कृतिशील क्रांतीकारकाचा होता. आपल्या कार्यसिद्धीला पोषक अशी निरनिराळ्या विषयांवरची अनेक लहानमोठी पुस्तके त्यांनी वाचली असतील. त्यांच्या विचारांना परिपक्वता येण्यास त्यांचा निश्चितच उपयोग झाला असेल. परंतु ग्रंथपांडित्यावर जोतीरावांचा मुख्य भर नव्हता.
उलट सामाजिक जीवनातील भल्याबुऱ्या प्रवृत्तींचा अन्वयार्थ लावण्याच्या बाबतीत ते बहुतांशी स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवावरच विसंबून राहात. त्यांचा स्वभाव जात्याच चिंतनशील होता. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. त्या काळातील अनेक सामाजिक चळवळींशी आणि विचारप्रवाहांशी त्यांचा कुठे ना कुठे संबंध आला होता. त्यांच्यातील ग्राह्यांश पारखून घेताना त्यांनी त्यांच्या मर्यादाही बरोबर जोखल्या होत्या. त्यांचे व्यक्तित्व प्रयोगप्रवण व विकसनशील होते.
म्हणून एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा पाईक न बनता त्यांनी आपला मार्ग आपणच शोधून काढण्याची उमेद बाळगली. महाराष्ट्रातील शूद्रांतिशूद्रांच्या उन्नतीकरिता ते रात्रंदिवस झटत होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. ते पार पाडताना जे बरेवाईट अनुभव आले त्यांतून त्यांना एक नवी दृष्टी मिळाली. या सम्यक दृष्टीमुळे येथील सामाजिक वास्तवाचे त्यांचे आकलन स्वतंत्र व सर्वस्पर्शी ठरले. मूलगामी समाजपरिवर्तनाशिवाय आपल्या देशातील कष्टकरी जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांना उमगले होते.
त्यातूनच त्यांना आपल्या जीवितकार्याची मनोमन ओळख पटली; अचूक दिशा गवसली. त्या दिशेने त्यांची पुढील वाटचाल सुरु झाली. जोतीरावांच्या आयुष्यात त्यांच्या तत्त्वनिष्ठेची कसोटी पाहणारे असे जे अनेक प्रसंग आले, त्यांत ते जरासुद्धा उणे पडले नाहीत. उलट त्यांतून वेळोवेळी त्याचे व्यक्तित्व उजळून निघाले. आपले विचार कृतीत उतरवताना जोतीरावांनी ऐनवेळी कधी कच खाल्ली नाही. तत्त्व आणि व्यवहार, संकल्प आणि साधना यांच्या
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01




