मंडलनामा क्रमशः 31.भटक्या मुस्लिमांचे संघटन

मंडलनामा क्रमशः
31.भटक्या मुस्लिमांचे संघटन
भारताला स्वातंत्र्य मिळल्यानंतर मुसलमान प्रामुख्याने शहरात स्थायिक झाले आहेत. खेड्या-पाड्यांतूनही अनेक मुस्लिम कुटुंबे राहतात. त्यांना शासन, प्रशासन, पुरावे याची किमान माहिती आहे. भटक्या विमुक्तांमध्येही मुसलमानांची मोठी संख्या आहे. त्यांची शहरी व बहुसंख्य मुस्लिम बिरादरींसोबत घसट नाही. गुन्हेगारीचा ठप्पा मारून ब्रिटिशांनी काही जमातींना सोलापूरला स्थानबद्ध केले होते. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ब्रिटिशांनी लावलेल्या कुंपणाच्या तारा प्रतिकात्मकरित्या तोडून त्यांना मुक्त केले. या भटक्यांकडे कोणतेही पुरावे नाहीत.
त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक शिकलेले होते. त्यांना मुस्लिम ओबीसींचे प्रमाणपत्र काढून देणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. छप्परबंद, शिकलगार, सायकलगार, मदारी, अस्वलवाले, सापवाले, फकीर, भांड, डोंबारी, गारुडी, धावड, पाथरवट, माकडवाले, टकारी, कल्हईवाले, इराणी, चित्ता पारधी, असे कितीतरी मुस्लिम भटके समूह आहेत. त्यांच्याकडे ना घर ना गाव. त्यामुळे कुठलेच पुरावे नसतात. त्यांच्यातील एखाद दुसरा विद्यार्थी शिकतो. त्याला आपण ओबीसीमध्ये येतो हे कोठून तरी समजते. तो आमच्यापर्यंत पोहचतो. त्याला प्रमाणपत्र काढून देणे मोठे कष्टाचे व कटकटीचे काम आहे. ते मी व आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आनंदाने व चिकाटीने केले.
आम्ही पुढाकार घेऊन मुस्लिमांतील अनेक भटक्या समुहांचा शोध घेतला. भारतीय मुसलमान इराणी हे शियापंथीय आहेत. त्यांच्यावर ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीचा शिक्का मारला. ही जमात भटकी असून सध्या गावागावांत चष्मे विकताना दिसतात. गोरेपान व ताडमाड उंचीच्या या इराणी जमातीतील काही लोक उदरनिर्वाहाचा मूळ व्यवसाय बंद पडल्यामुळे चोऱ्या करत असत. अद्यापही पोलिस त्यांना चोरीच्या संशयावरून पकडतात. त्यांच्याकडे रहिवासी पुरावे कसे असणार. हे लोक भारतभर पसरलेले आहेत. त्यांची भाषाही वेगळी आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सोलापूर, परळी, सांगली, सातारा, श्रीरामपूर या भागात ते राहतात. त्यांना एकत्र करून तुमच्या मुलांना शाळेत घाला, असे सांगण्यात खूप ऊर्जा खर्च केली. कारण जमाती बाहेरील कोणी बोलला की, त्यांना तो पोलिसच वाटतो. या जमातीमधील एका तरुणीला आम्ही मुस्लिम ओबीसी प्रमाणपत्र मिळवून दिले. ती सध्या नाशिक जिल्ह्यात न्यायाधीश आहे.
डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या पण गावकुसात राहणाऱ्या एका जमातीचे नाव आहे मेहतर, त्यांना आपण भंगी म्हणूनही ओळखतो. मेहतर हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ सैन्य तुकडीचा प्रमुख, असा आहे. मैला वाहून नेणाऱ्या जमातींचा सन्मान करण्यासाठी सुफी संतांनी मेहतर हे नाव दिले. या जमातीचे संघटन करणे सोपे होते. अत्यंत गरीब व हीन काम करणाऱ्या या जमातीमधील अनेक जण आज जात प्रमाणपत्रांमुळे विकासाच्या मूळ प्रवाहात आले आहेत.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मुसलमान चित्ता पारधी ही अत्यल्प संख्या असलेली जमात आढळते. त्यांना मीर शिकारी व नीर शिकारी या नावानेही संबोधले जाते. त्यांचा कोल्हापूरच्या गॅझेटमध्येही उल्लेख आहे. राजे, महाराजे,संस्थानिक चिते पाळत. राजासाठी चित्ते पकडणे, त्यांना माणसाळणे व चित्त्यांची काळजी घेणे हे त्यांचे काम. युद्धामध्ये शत्रूसैन्यावर अचानक चित्ते सोडून हाहाकार उडवून दिला जात असे. कोल्हापूरच्या महाराजांकडे चित्ते होते. त्यामुळे ही भटकी जमात या भागात आढळते. त्यांना संघटित करून प्रमाणपत्रे मिळवून दिली.
सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिम पाथरवट व धावड या जमाती आढळतात. या दोन जमाती परंपरागतरित्या दगड फोडण्याचे काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राजातील किल्ल्यांच्या परिसरातील गावात या जमातींमधील लोक राहतात. त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत नव्हते. या जमातीचे काम वडारांसारखे आहे. पण जातीचे नाव पाथरवट व धावड असल्याने अडचण येत असे. ते दगड फोडतात, संघटनेने याचे संशोधन केले. मुंबईतील मदनपुरा येथील एका मशिदीचे नावच दगडफोडू मशीद असल्याचा पुरावा दिला व मुसलमानात दगड फोडणारे आहेत, असे सिद्ध केले.
राजे, महाराजे, संस्थानिक, सरदार, पाटील, पटवारी, बडे शेतकरी यांच्या घरी पखालीने पाणी भरून उदरनिर्वाह करणारी भिश्ती नावाची एक जमात आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रामुख्याने आठवडी बाजार, दर्गा, धार्मिक स्थळे येथे तहानलेल्यांना पाणी पाजून पैसा, दोन पैसे घेऊन ते जगत असत. आता ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या सोयी झाल्यामुळे हे लोक दिसत नाहीत. अत्यंत गरीब असलेल्या या जमातीचे संघटन केले. ही जमात गावकुसात राहात असल्याने त्यांच्यातील काही जण शिकलेले आहेत. मंडल आयोग लागू झाल्यानंतर प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने त्यांना मदत केली.
देवाच्या नावाने भीक मागून जगणाऱ्या फकिरांकडे जातीचे काय पुरावे असणार? उखळ, वरवंटे तयार करणारे व जात्यांना टाके पाडणारे टकारी, भांड्यांना कल्हई करणारे कल्हईगार, दुरड्या विणणारे काकर, साप पकडणारे गारुडी, माकडाचा खेळ करणारे माकडवाले, अस्वलांचा खेळ करणारे अस्वलवाले किंवा रिचवाले, अशा कित्येक लहान लहान जातीपर्यंत संघटना पोहचली. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप झगडावे लागले. आजही अज्ञात भटक्या मुस्लिम समुहातील एखादा व्यक्ती समोर येऊन उभा टाकतो. त्याला न्याय हक्क मिळवून देण्याचा लढा सुरू आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




