कायदा, सुव्यवस्था, मीडिया – काल आणि आज

कायदा, सुव्यवस्था, मीडिया – काल आणि आज
तारीख – 16 ऑगस्ट 2007, स्थळ – सोलापूर
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते शिवसेनेचे रतिकांत पाटील, आणि त्यांचे सख्खे बंधू रविकांत पाटील शेजारच्या कर्नाटकातील इंडी मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेचे आमदार होते. त्या रात्री रविकांत पाटील यांचा वाढदिवस होता आणि बरोबर मध्यरात्री या आमदार भावांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्याने फटाके वाजवायला सुरुवात केली ज्याचा सर्वांना त्रास होता. त्याही काळी रात्री 10 नंतर फटाके, लाऊडस्पीकर यावर बंदी होती.
आवाजाचा त्रास लक्षात घेवून एक पोलिस निरीक्षक पाटील बंधूंच्या बंगल्यावर गेले आणि त्यांना फटाके न वाजवण्याची विनंती केली. त्यावर उन्मत्त आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की केली. सदर प्रकार कळताच पोलिस आयुक्त श्री. अशोक कामटे स्वतः आमदारांच्या बंगल्यावर गेले तर तिथे त्यांनाही गुर्मीत उत्तरे दिली गेली. मग अशोक कामटे यांनी त्यांच्यातला खमक्या IPS काय करू शकतो हे दाखवत तत्कालीन आमदार रविकांत पाटील यांना अटक केली. दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करताना पाटील यांना स्ट्रेचरवरून न्यावे लागले होते, यात बरेच काही समजते.
या प्रसिद्ध घटनेनंतर आमदार रतिकांत पाटील यांनी स्वतःच्या आमदार भावाला मारहाण झाली हे सांगत अशोक कामटे यांच्यावर टीकेचा भडिमार केला, अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. पण, त्यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील हे अशोक कामटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी विधानसभेत आणि मीडियात दोन्हीकडे कामटे यांच्या कारवाईचे कौतुक केले. दुर्दैवाने हेच IPS अशोक कामटे पुढे 26/11 च्या हल्ल्यात शहीद झाले आणि आर. आर. आबाही आज हयात नाहीत.
आमदाराला अटक करणारे पोलीस ते थेट पोलिस स्टेशनमध्ये दुसऱ्यावर गोळी झाडणारे आमदार (दोन्ही बाजू एकेका सत्ताधारी पक्षाच्या समर्थक) ही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची अधोगती आम्ही आमच्याच पिढीत पाहिली. आठवडाभर आधी त्याच रविकांत पाटील यांच्या मुलावर बलात्कार आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल झालाय आणि तीन दिवस आधी तेच रविकांत पाटील (मध्यंतरी जुगार व्यवसाय चालवल्याचा गुन्हा दाखल झालेले) आता थेट राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) सहभागी झालेले आहेत… आणि मीडिया शांत आहे!
महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि मिडीयाचा एवढा बाजार उठलेला कधी पाहिला नव्हता!
– डॉ. विनय काटे तीन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा




