महात्मा फुले यांना सावित्रीबाईंनी अखंड साथ दिली. अनेक त्यांच्या जीवनाचे पैलू सांगता येतील. ज्याचा ओझरता उल्लेख भुजबळ साहेबांनी केला
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती’ महात्मा जोतीराव फुले मार्केट यार्ड चाकण ता. खेड, जि. पुणे येथील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष छगनरावजी भुजबळ, तुम्हा सर्वांचं देशाच्या लोकसभेमध्ये समर्थपणाने प्रतिनिधित्व करतात ते खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सचिन अहिर, लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे, मार्केट कमिटीचे प्रमुख विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांतीताई सोमवंशी, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी आम्ही सगळ्यांनी इथे यावं यासाठी काळजी घेतली ते आमचे सहकारी रामभाऊ कांदे, सूर्यकांत फरांदे, दिलीपराव धोंडे, बाळासाहेब शिवरकर, कृषी बाजार समितीचे माजी अध्यक्ष विनायक घुमटकर व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू-भगिनींनो..
आजचा हा कार्यक्रम एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. ज्या व्यक्तिमत्वानं आपलं जीवन समाजासाठी दिलं, समाजामध्ये जागृती केली, चुकीच्या प्रवृत्तीविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली, उभं आयुष्य समाजातील उपेक्षित घटकांसाठी दिलं अशा थोर महात्म्यांचं, पती-पत्नींचं एक अतिशय देखणं स्मारक आज या ठिकाणी होतंय याचा तुम्हाला मला सगळ्यांना आनंद आहे.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. आत्ताच आपण भुजबळ साहेबांच्या भाषणामध्ये त्यापैकी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. एक आगळं वेगळं द्रष्टा असं व्यक्तिमत्व होतं. आधुनिकता, विज्ञानाचा पुरस्कार महात्मा फुले यांनी उभं आयुष्य केला. शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी विशेषतः त्या काळामध्ये महिलांसाठी सुद्धा शिक्षण खुले करण्याची महत्त्वाची गरज होती, त्याची पूर्तता करण्यासाठी महात्मा फुले यांना सावित्रीबाईंनी अखंड साथ दिली. अनेक त्यांच्या जीवनाचे पैलू सांगता येतील. ज्याचा ओझरता उल्लेख भुजबळ साहेबांनी केला
त्या माझ्यासारख्याच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा ठसा निर्माण केला.
मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यावर जे ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. तिथे ब्रिटिश राज्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी जी वास्तू उभी केली आणि ब्रिटिश राज्यकर्ते भारताला भेट देण्यासाठी तिथे आले. त्यांची बोट तिथे थांबली. त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या काळातले शासनाचे सगळे महत्वाचे घटक होते. त्याच वेळेला एका कोपऱ्यामध्ये मुंडासे बांधलेला, धोतर बंडी घातलेला, हातामध्ये कागद घेऊन उभं राहिलेला व्यक्तीमत्व होतं. राज्यकर्ते जसे उतरले बोटीतून आणि निघाले त्यावेळेला साहजिकच पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केला. त्या कागद हातात घेऊन उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं थांबा! हे काहीतरी वेगळं व्यक्तित्व दिसतंय. त्यांच्या हातात काही कागद आहे, कदाचित निवेदन असेल. त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला.
काय होतं त्या कागदात? पुणे विभागामध्ये दुष्काळाचं साम्राज्य होतं, जगण्याची लोकांना चिंता होती. अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्यासाठी खडी फोडण्याचं काम दिलं. त्या गृहस्थांच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं की, दुष्काळाच्या संकटामध्ये माझा कष्टकरी अडकलेला आहे. त्याला खडी फोडण्याची शिक्षा ही देऊ नका. त्या ऐवजी असं काही काम द्या की ज्या कामांमुळे त्यांच्या शेतीला पाणीपुरवठा कायमस्वरूपाचा होईल. तो जर करायचा असेल तर थेंब थेंब पडणारा पाणी हे थांबवलं पाहिजे. त्यासाठी झिरप तलाव करा त्यामधून दुष्काळाचे संकट दूर होईल.
दुसरी मागणी त्यांनी केली की, शेतीला जोड धंदा हवा आहे. तो जोडधंदा करायचं असेल तर उच्च प्रतीचे पशुधन तयार केलं पाहिजे. ते करायचे असेल तर विलायतेतून वळू पाठवा आणि नवीन संकरित जात या ठिकाणी तयार करा. जेणेकरून अधिक दुधाचा पुरवठा हा त्या शेतकऱ्यांना होईल आणि तो जोडधंदा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल.
तिसरी गोष्ट लिहिली होती की, या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवल्ली, झाडं तोडण्याची भूमिका घातक आहे. जर निसर्गाचा समतोल ठेवायचा असेल तर झाडीसुद्धा ठेवली पाहिजे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढीला लागेल. अशा प्रकारच्या मागण्या हातामध्ये घेऊन ते गृहस्थ उभे होते. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर महात्मा जोतिबा फुले होते. ते यातून सांगतात काय ? तर माझ्या मते विज्ञानाचा पुरस्कार त्या काळामध्ये त्यांनी केला. संकरित धान्य, संकरित बियाणं, संकरित पशुधन याचा अर्थ काय? याचा अर्थ आधुनिकता, याचा अर्थ विज्ञानाचा पुरस्कार हा विचार जोतिबा फुले यांनी त्याकाळात केला.
शिक्षणासं .बंधित प्रचंड काम त्यांनी केलं, सावित्रीबाईंनी त्यांना साथ दिली. उद्योग, व्यवसाय याचंही महत्त्व होतं. ज्याचा उल्लेख मगाशी भुजबळ साहेबांनी केला की, महात्मा जोतिबा फुलेंना शेठजी म्हणायचे घरामध्ये सुद्धा. त्यांनी एक कंपनी काढली ‘पुणे कन्स्ट्रक्शन कंपनी’. बांधकामाची कामे घ्यायचे. पुण्याच्या जवळचा खडकवासला धरणाच्या पायाचं काम महात्मा जोतिबा फुले यांच्या या कंपनीने केले. जुना पुणे आणि सासवडचा जो रस्ता आहे आणि कात्रजच्या घाटामध्ये जो बोगदा आहे त्याचे काम सुद्धा काही प्रमाणात महात्मा जोतिबा फुले यांच्या कंपनीने केले.
एक विलक्षण व्यक्तिमत्व होते, ते व्यक्तिमत्व आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची दूरदृष्टी दाखवते. म्हणून विशेषतः मी जेव्हा उत्तर हिंदुस्थानात जातो त्यावेळेला एका गोष्टीचे अभिमान वाटते की महात्मा जोतिबा फुले यांचे नाव महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे. पण त्याही बरोबर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, बिहारमध्ये जा महात्मा जोतिबा फुले यांचे पुतळे, त्यांचे नाव प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. मायावतींच्या हातामध्ये राज्याची सूत्र होती एका जिल्ह्याचे नाव ‘फुले जिल्हा’ म्हणून करून टाकले. आज उत्तर प्रदेशमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने, शाहू महाराज यांच्या नावाने जिल्ह्यांची नावे आहेत हे कर्तुत्व, ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली त्यामुळे आज देश पातळीवर त्याची नोंद ही घेतली गेलेली आहे. म्हणून शेतकऱ्यांसंबंधीत अतिशय आस्था असलेले, स्त्री-सन्मानाची भूमिका घेणारे, सामान्य माणसाचा विचार अखंड जपणारे, शिवछत्रपती असोत किंवा अन्य राज्यकर्ते असो की ज्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला त्या छत्रपतींची समाधी शोधून काढणं, त्यांच्यावर पोवाडा करणं आणि नव्या पिढीला त्यांचा आदर्श पोहाचवणे ही अत्यंत मोलाची कामगिरी ही महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केली.
मला आनंद आहे की, या ठिकाणी उभयंतांचा अतिशय देखणा पुतळा कृषी बाजार समितीने आणि पुतळा समितीने तुम्हा सगळ्यांच्या मदतीने आज या ठिकाणी उभा केला आहे. मला ठाऊक आहे की, या ठिकाणी आज चाकणला शेतीमालाचा व्यवहार मोठा आहे. इथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं कांदा, लसूण यांवर संशोधन करणारी संस्था आहे. पण आज सगळ्या जगामध्ये कांदा निर्यात करण्यासंबंधीची कामगिरी या भागातला हा कष्टकरी शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचे दुखणे हे उभं आयुष्य महात्मा जोतिबा फुले यांनी मांडलं. आजच्या परिस्थितीमध्ये कांदा निर्यात असेल किंवा कठोर प्रश्न असो त्यावर केंद्र सरकारने ड्युटी बसवली आणि त्याची झळ आज काळ्या आईशी इमान राखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला मोजावी लागते. ते घालवायचे असेल तर राज्यकर्त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांचे आदर्श पुढे ठेवावे आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध येणारे जे कोणते निर्णय असतील, कायदे असतील ते नष्ट करायचे, संपवावेत आणि थांबवावेत हीच महात्मा ज्योतिबा फुले यांना खऱ्या अर्थाने आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धांजली होईल.
मला आनंद आहे की, ॲड. विजय शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी, या पुतळ्यासाठी हातभार लावणारे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी हे अतिशय सुंदर शिल्प आज उभं राहिलं हे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देईल. हे करत असताना जो ‘शेतकरी’ शेतकरी कुटुंबातला घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्यासाठी नित्याने येत असतो, दिवस-दिवस त्याचा जातो आणि म्हणून रास्त किमतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी या कमिटीने केली त्याही बद्दल कमिटीला मी धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांची देखणी शिल्प या ठिकाणी अनावरित झाली हे जाहीर करतो.
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा –



