मंडलनामा क्रमशः 46.लखनौ परिषद

मंडलनामा क्रमशः
46.लखनौ परिषद
चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांच्या चळवळीतील प्रवेशामुळे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला प्रशासकीय व सामाजिक पातळीवर यश येत होते. हज हाऊस येथे ८ जानेवारी १९९६ रोजी झालेल्या परिषदेमुळे ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यातील छोट्या मोठ्या अडचणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अडेलतट्ट दृष्टिकोन, मुस्लिम समाजातील तथाकथित धर्माभिमान्यांकडून होणारी दिशाभूल इत्यादी मुद्द्यांवर मुस्लिमांत चर्चा होऊ लागली. एकूणच चळवळ जोरात होती.
त्यामुळे आम्हाला वाटले जरा उत्तरेकडे स्वारी करून येऊ म्हणजे उत्तर प्रदेश व बिहार आदी राज्यांत जाऊन तेथील मुसलमानांमध्ये जागरूक निर्माण करू. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या काही कार्यकत्र्यांसह मी १९९७ च्या जून महिन्यात उत्तर प्रदेशात दाखल झालो. तेथे सुमारे दीड महिना मुक्काम ठोकला. माझ्या सोबत संघटनेच्या नेत्या नसीम महात व इतर कार्यकर्ते होते. काही पदाधिकारी त्यांना वेळ मिळेल तसे काही दिवस उत्तर प्रदेश मोहिमेत सामील होत. या दीड महिन्यात उत्तर प्रदेशातील २६ जिल्ह्यांत दौरे केले. विविध राजकीत पक्षातील मुस्लिम नेते, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. सामाजिक कार्यकत्यांनाही भेटलो. उत्तर भारतात संघटनेचे कार्य रुजवण्यासाठी लखनौ येथे मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर १२ ऑगस्ट १९९७ रोजी परिषद घेण्याचे जाहीर करण्यात आले. या परिषदेला दिलीपकुमार उपस्थित राहणार होते.
या परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र व उत्तर भारतातील सामाजिक परिस्थिती लक्षात आली. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यालाही मोठ्या प्रमाणात कार्य करता येईल, अशी सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या महान नेत्यांनी वैचारिक नांगरणी केल्यामुळे आम्हाला चळवळी रुजवण्यासाठी आयते रान मिळते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये तसे नाही. किमान माझा अनुभव तरी खूप कष्टप्रद आहे. द्रवीड चळवळीमुळे दक्षिण भारतात सामाजिक प्रश्न व त्यासाठी कार्य करणाऱ्यांबद्दल आस्था आहे. उत्तर भारतात अगदी विरुद्ध परिस्थिती असल्याचे माझ्या लक्षात आले. लखनौ परिषदेच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेशातील २६ जिल्ह्यांत दौरे करताना या कठीण परिस्थितीचा पुरेपूर अनुभव आला.
उत्तर प्रदेशातील दीड महिन्याच्या मुक्कामात २६ जिल्हे फिरलो. लोकांना संघटित करणे खूप अवघड होते. सर्वात मोठा अडसर होता तो तेथील मुस्लिमांतील उच्च प्रवर्गांचा. ते आमच्या बैठका होत असलेल्या गावातील गरीब व ओबीसी प्रवर्गातील मुस्लिमांची दिशाभूल करत. लखनौमधील परिषदेचे समन्वयक सय्यद होते. ते ओबीसी प्रवर्गातील नव्हते. त्यावरूनही ते लोक गरीब व ओबीसी मुस्लिमांना भडकावत. ‘हे महाराष्ट्रातून ओबीसींच्या हक्कावर बोलण्यासाठी आले आहेत. पण त्यांच्या परिषदेचा समन्वयक सय्यद आहे. तुमच्यावर ज्या सय्यदांनी अन्याय केला, त्यांच्या नेतृत्वात तुम्हाला न्याय कसा मिळेल’, असे सांगून ते सर्वसामान्यांना भडकावून देत. आमच्या बैठकांत प्रश्नांच्या फैरी झडत, आम्हाला त्या प्रश्नांना तोंड द्यावे लागे. समन्वयक सय्यद असल्याने एका ठिकाणी लोक आमच्यावर धावून आले होते.
तेथील मुस्लिम राजकीय कार्यकर्ते व नवाबांचाही परिषदेला विरोध होता. गरीब व ओबीसी मुस्लिमांमध्ये राजकीय जाणीव निर्माण झाली तर आपले राजकारण संपेल, अशी भीती गावागावातील मुस्लिम राजकीय नेत्यांना वाटत होती. त्यामुळेही आमच्या बैठकांना विरोध झाला. ओबीसी त्यांच्या बरोबरीत येणे नवाबांना कसे पसंत पडणार ? यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही नवाबांचीही बैठक घेतली. ‘संविधानाने हक्क दिल्यामुळे ओबीसी शासनाकडे मागणी करत आहेत. त्याला विरोध का करता? ते तुमचे काहीच हिसकावून घेत नाहीत. ओबीसींसोबत आत्ताच जुळवून घ्या. त्यांच्यात राजकीय जागृती निर्माण होणार आहेच; त्यांचे राज्य आले तर पळता भूई होईल,’ या शब्दात नवाबांना सुनावले. या बैठकीनंतर नवाबांचा विरोध थोडा मवाळ झाला.
लखनौ परिषदेवेळी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे सरकार व मायवती या मुख्यमंत्री होत्या. आमच्या राज्यात परिषद होत आहे. दिलीपकुमार येत आहेत व आम्हालाच निमंत्रण नाही, असे ‘बसप’च्या काही नेत्यांना वाटत होते. मुख्यमंत्री मायावती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यात चुकीचे काहीच नव्हते. ही आमच्यासाठीही संधी होती. एके दिवशी ‘बसप’चे दोन मंत्री बुनियाद हुसेन अन्सारी व गुप्ता माझ्याकडे आले व मुख्यमंत्री मायावती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करावे, असे सुचवले. मी होकार दिला पण एक अट घातली. मुस्लिम ओबीसींसाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआरप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने जीआर काढावा.
त्यानंतरच त्यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करू. त्या दोन मंत्र्यांनी आमचा निरोप मुख्यमंत्री मायावती यांना सांगितला. त्यावर, ‘बसप’चे ओबीसी चळवळीतील योगदान माहीत नाही का?, मुख्यमंत्र्ऱ्यांना अटी कसल्या घालता, अशा प्रतिक्रिया ‘बसप’मध्ये उमटल्या. त्यांचे सगळे खरे होते. परंतु, मलाही उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना महाराष्ट्राप्रमाणे ओबीसी प्रमाणपत्र सुलभतेने काढता यावे, असा जीआर काढण्याची संधी हवी होती. ते मंत्री पुन्हा एकदा आले व असा जीआर काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री परिषदेमध्ये देतील, असे सांगितले. मी ते
अमान्य केले व आधी जीआर काढा व उद्घाटनाला या, असे नम्रपणे सांगितले. मुख्यमंत्री मायावतींनी जीआर काढला नाही.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनाही परिषदेला बोलवावे, असाही दबाव होता. ‘सप’ व ‘बसप’ या दोन्ही पक्षांना मी दाद देत नव्हतो. याची तक्रार दिलीपकुमार यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी माझ्याकडे विचारणा केली. मी त्यांना म्हणालो, आपल्या राज्याप्रमाणे जीआर काढण्यात त्यांना काय अडचण आहे. दिलीपकुमार यांनी विषय लांबवला नाही. दिलीपकुमार यांच्या उपस्थितीत लखनौ येथे झालेली परिषद यशस्वी झाली. परिषदेला मोठी गर्दी झाली. दिलीपकुमार यांच्या भाषणाच्या बातम्या तेथील वर्तमानपत्रांत ठळकपणे छापून आल्या. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही जीआर काढावा, या मागणीसाठी तेथे मोठा मोर्चा काढण्यात आला. नसीम महात व वर्षा कांबळे यांनी या मोर्चात उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात संघटित केले.
उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ओबीसींचे राजकारण प्रभावी आहे. मात्र महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे सक्रिय सामाजिक चळवळी नाहीत, असे माझे मत आहे. त्यामुळे तेथे जे काही घडते, त्या सर्वांचे राजकारण होते. काही घटनांकडे राजकारणाच्च्या पलीकडे जाऊन बघायचे असते. या दोन राज्यात याचा अभाव असल्याचे मला जाणवले. तेथे आमची डाळ शिजली नाही. तिकडे आमच्या संघटनेचा विस्तार झाला नाही. त्या राज्यात माझा आजही व्यक्तिगत संपर्क आहे. तेथे काही कार्यक्रमांना मला निमंत्रित केले जाते. ते तेवढ्यापुरतेच असते. उत्तर प्रदेशातील दीड महिन्याच्या दौऱ्यात ‘उमराव जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मुज्जफर हुसेन व त्यावेळचे खासदार जफर नकवी यांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळेच लखनौ परिषद यशस्वी करू शकलो.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




