सोलापूर

मंडलनामा क्रमशः 34.मशिदीत तीन सवाल

मंडलनामा क्रमशः

34.मशिदीत तीन सवाल

मंडल आयोगाचा लाभ मिळण्यात देशभर अनेक अडचणी येत होत्या.हिंदू ओबीसीसमोर अडचणींचा डोंगर असताना मुसलमान ओबीसीना कोण विचारतो ? त्यांची चर्चाच नव्हती, त्यामुळे मंडल आयोगाच्या सवलतींचा लाभ मुस्लिमांना मिळावा यासाठी देशपातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी नवी दिल्ली येथे मावळकर हॉल येथे २९ ऑगस्ट १९९६ रोजी संघटनेतर्फे राष्ट्रीय परिषद भरविण्यात आली. केंद्रीय मंत्री रामुवालिया व रामविलास पासवान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार, या नेत्यांच्या उपस्थितीत परिषद दणक्यात पार पडली. त्याचे सविस्तर रिपोर्टिंग प्रफुल्ल बिडवई यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’, दिवाकर रावते यांनी ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ मध्ये केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असगर अली इंजिनीअर यांनी ‘द हिंदू’ व जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठातील प्रो. पुरुषोत्तम अग्रवाल यांनी ‘राष्ट्रीय सहारा’ या दैनिकात लेख लिहून मुस्लिम चळवळीवर भाष्य केले.

या शिवाय अनेक उर्दू व हिंदी दैनिकांत सविस्तर छापून आले. त्यात मुस्लिम ओबीसी संघटनेची जोरदार तरफदारी करण्यात आली. शिवाय माझ्या कार्याची व माझी तारीफही केली होती. राष्ट्रीय पातळीवरील दैनिकांमधून ‘मुस्लिम ओबीसी’ हा मुद्दा विस्तृत व ठोसपणे पहिल्यांदाच मांडला गेला. त्यावर खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. परंतु, जमात-ए-इस्लामी हिंदच्या ‘दावत’ या मुखपत्रातून टोकाच्या टीकेचा सूर उमटला. ‘दावत’ हे भारतातील विद्वान मुस्लिमांकडून वाचले जाणारे मुखपत्र आहे. या शिवाय भारतातील मुसलमान मनाचा कानोसा घेण्यासाठी जागतिक

पातळीवरील अभ्यासक व विद्वान हे मुखपत्र वाचतात. या मुखपत्रात मुस्लिम ओबीसी संघटना, संघटनेचे कार्य व वैयक्तिक माझ्यावर जोरदार टीका करण्यात आली. संघटनेच्या कामाला विरोध दर्शविण्यात आलाच, पण शब्बीर अन्सारी नावाचा कोणी एक माणूस मुसलमानांमध्ये फूट पाडत आहे, असा या लेखाचा मतितार्थ होता. अर्थात त्यावरही भारतभर पडसाद उमटले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कामाची माहिती असलेल्या मुस्लिम अभ्यासकांना हे लेखन खटकले. त्या अभ्यासकांनी ‘दावत’ला पत्र पाठवून माझी भूमिका, संघटनेच्या कार्याची माहिती दिली. औरंगाबाद येथील पत्रकार सय्यद जहिरोद्दीन सिद्धिकी व सोलापूर येथील अभ्यासक अब्दुल गफार माळी यांनी ‘दावत’ मधील लेखाचा प्रतिवाद करणारे लेख पाठवले, मुस्लिम ओबीसी संघटनेचे काम तुम्हाला माहीत आहे का, शब्बीर अन्सारी हे समाजासाठी नेमके काय करतात हे तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्या कामाची तुम्ही कधी माहिती घेतली आहे का, त्यांना कधी भेटला आहात का?, असा या लेखांचा सूर होता. ‘दावत’मधील टीकात्मक लेखामुळे चळवळीबद्दल गैरसमज निर्माण होतील, त्यामुळे दुसरी बाजू छापली पाहिजे, असा या दोघांचा आग्रह होता. ‘दावत’ च्या संपादकांनी त्यांचे लेख छापले.

मूळ लेखाला उत्तर देणारा लेख छापून आला तरी उठलेला धुरळा खाली बसला नव्हता. ‘दावत’मध्ये चळवळीच्या बाजूने लेख आले तरी कट्टरपंथीना बळ मिळाले होतेच, नवी दिल्लीत घेतलेल्या मेळाव्यामुळे निर्माण झालेले सकारात्मक वातावरण गढूळ झाले. त्याकाळात मुसलमान तरुणांमध्ये स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (एसआयओ) व स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन संघटना लोकप्रिय होत्या. या संघटनांची एक प्रकारे दहशत होती. या संघटनांतील कार्यकर्ते अत्यंत कट्टर व कडवट होते. त्यांच्याकडून गावागावात संघटनेवर टीका सुरू झाली. कुराणाचे अभ्यासक असलेले मौलाना, उलेमा यांचेही याकडे लक्ष वेधले गेले. मी १९८० पासून कट्टरवाद्यांकडून होणारा विरोध सहन करत होतो. त्यांना तोंड दिले. पण मंडल आयोगाचे लाभ पदरी पाडून घेण्याच्या टप्प्यातील अडथळे दूर करण्याच्या काळात हे विरोधी वातावरण चळवळीला मारक ठरणारे होते. त्यामुळे कट्टरपंथींकडून होत असलेल्या टीकेचा जाहीर प्रतिवाद करण्याचे मी ठरवले.
माझ्या हितचिंतकांनी या भूमिकेला विरोध केला. त्यांना माझ्या जीवाचे
काही बरेवाईट होईल, अशी भीती होती. मी ओबीसी चळवळीसाठी डोक्याला कफन बांधून निघालेलो. त्यामुळे मला कशाची भीती? तुम्ही मला कोठेही बोलवा, कितीही जण या, आपण चर्चा करू. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकलो नाही तर मी चळवळ बंद करीन. जागा, वेळ, तुम्ही ठरवा, मी तेथे येतो, असे आव्हान मी टीकाकारांना दिले. त्यावेळी या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही हाणामाऱ्या करत नव्हतो. माझे काम समाजातील सर्व गरिबांसाठी होते. गावागावात जाऊन आम्ही लोकांसोबत चर्चा करून त्यांना मंडल आयोग पटवून देत होतो. जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ते समजावून देत होतो. त्यातील कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी सरकारकडे खेटे घालत होतो. येथे कट्टरवाद्यांसोबत चर्चाच तर करायची होती, चर्चेतून प्रश्न सुटतात व नवीन मार्ग प्रशस्त होतो, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी त्यांना आव्हान दिले.

तिकडूनही प्रतिसाद मिळाला. जागा, तारीख, वेळ ठरली. जागा होती मुंबईतील एक मशीद. मी मशिदीत जाऊन जाहीर चर्चा करणार असल्याने मित्रांनी मला पुन्हा सावध केले. मी तेथे जाऊ नये, अशी गळ घातली. पण माझा निर्धार पक्का होता.

मी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी मशिदीत गेलो. तेथे सुमारे तीनशे ते चारशे लोक होते. ते फक्त श्रोते नव्हते. कुराणाचे नावाजलेले अभ्यासक होते. मी हजर झाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. अनेकांनी मते मांडली. मुस्लिम धर्म, धार्मिक कर्तव्ये, मुसलमानांची जबाबदारी यावर मोठा खल झाला. शब्बीर अन्सारी हे मुस्लिमांना जातीच्या नावे फितवत आहेत. धर्मात नसलेल्या जाती निर्माण करत आहेत, असा या टीकेचा रोख होता.

‘आपणाला देणारा अल्ला आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणासमोर हात पसरता कामा नये. तो सर्वांवर प्रेम करतो. सर्वांना सर्वकाही देतो. शब्बीर अन्सारी मुसलमानांना अल्लाऐवजी सरकारपुढे हात पसरायला लावत आहे’, अशी टीका करण्यात आली. ही मते मांडणारे सर्व धर्मिक विद्वान होते. त्यामुळे

ते धार्मिक अंगाने चर्चा करत असले तरी वस्तुस्थितीपासून खूप दूर होते. त्यांना उत्तर देण्याची माझी वेळ आली. मी उभा राहिलो व नम्रपणे म्हणालो, ‘तुम्ही माझ्यापेक्षा खूप विद्वान आहात. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही धर्माचे गाढे अभ्यासक आहात, मी

कॉलेजही अर्धवट सोडलेले आहे. पण मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतो. त्याची

उत्तरे द्या. त्यानंतरही तुम्हाला असे वाटले की, मी इस्लामच्या विरोधात आहे तर मी मुस्लिम ओबीसी चळवळ थांबवतो.’ त्यांनी मला तीन प्रश्न विचारण्याची परवानगी दिली.

माझा पहिला प्रश्न होता, ‘तुम्ही भारताचे संविधान मानता का, भारताच्या संविधानावर तुमचा विश्वास आहे का ?’

हा प्रश्न तसा साधा होता. मला उत्तरही अपेक्षित मिळणार होते. मी धर्मातील कोणते दाखले देत तीन प्रश्न विचारणार आहे याची उत्सुकता असलेल्या व त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सज्ज असलेल्या त्या विद्वानांच्या समूहाला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. सर्वांनी एका सुरात उत्तर दिले, ‘हो, आम्ही भारतीय संविधान मानतो व त्यावर आमचा विश्वास आहे.’

आता दुसरा प्रश्न विचारायचा होता. त्या प्रश्नाला पार्श्वभूमी जोडून दिली. माझा प्रश्न होता, ‘तुम्ही आत्ताच म्हणालात की, अल्लाच देणारा आहे. त्याच्यापुढेच हात पसरा. त्याच्याशिवाय कोणीही देणारा नाही. असे खूप जण बोलले. पण जमात-ए-इस्लामी हिंदवर आणिबाणीत बंदी आली, अनेकांना अटक होत होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा का ठोठावला ? तेव्हा अल्लाकडे मागणी का केली नाही?’

माझा हा प्रश्नही त्यांना अपेक्षित नव्हता. त्यामुळे विद्वानांची गोची झाली.

अनेकांची दातखीळ बसली. काही जण म्हणाले, ‘आम्हाला संविधानाने अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे आम्ही दाद मागितली. भारतीय नागरिक म्हणून हा आपला हक्क आहे.’

मी म्हणालो, ‘मी पण हेच म्हणत आहे की, ओबीसीचे हक्क मिळवणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. मग मी इस्लामविरोधी कसा ठरतो?’ यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते.

मी तिसरा व शेवटचा प्रश्न विचारला, ‘मी इस्लाममध्ये जाती आहेत, असे म्हणतच नाही. इस्लाममध्ये समता आहे. एक अल्ला, एक खुदा, एक कुराण, त्यासमोर सर्व समान, हे मलाही मान्य आहे. पण जगण्यासाठी सर्वजण वेगवेगळी कामे करतात. तो त्यांच्या पेशा आहे. मंडल आयोगातही वर्ग म्हटले आहे. जात म्हटलेले नाही. ‘कास्ट’ नव्हे ‘क्लास’ असेच मंडल आयोगाच्या अहवालात आहे. ते बाजूला ठेवा. जगण्यासाठी जे मुसलमान वेगवेगळे व्यवसाय करतात त्यांना तुम्ही त्यांच्या पेशाच्या नावाने का संबोधता. वो दर्जी, ये बुनकर, फलाना कसाब, बिस्ताना बागवान, असे का म्हणता ? हे कित्येक वर्षापासून सुरू आहे. हे मी केलेले नाही. तुम्ही या व्यवसायाच्या जाती का केल्या?’

माझ्या या तिसऱ्या प्रश्नानंतर मशिदीत एकदम शांतता पसरली. सुई पडली तरी आवाज येईल अशी नीरव शांतता. ते सतत दोन तास बोलत होते. आता एकदम चिडीचूप झाले. त्यांच्याकडे माझ्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. शिवाय मी इस्लामविरोधी काही केले आहे, असेही या जाहीर चर्चेत ठोसपणे समोर आले नाही. ही चर्चा तिथेच थांबली. सगळे विद्वान मशिदीतून निघून गेले. सर्वात शेवटी मी बाहेर पडलो. मला ओबीसी चळवळ सोडून देण्याची गरज पडली नाही. या चर्चेचा सविस्तर वृत्तांत ‘टाइम्स ऑफ इंडिया’त छापून आल्यानंतर कथित विद्वानांची गोची झाली.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button