मंडलनामा क्रमशः 13.बोट क्लबवरील विराट सभा

मंडलनामा क्रमशः 13.बोट क्लबवरील विराट सभा
राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाच्या स्थापना अधिवेशनात ठरल्यानुसार पुढील दोन महिने देशभरात जोरदार तयारी करण्यात आली. २८ फेब्रुवारी १९८२ रोजी नवी दिल्ली येथील बोट क्लबवर जनसागर उसळला. सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोक या सभेला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. त्या दिवशी भारताच्या राजधानीतील सर्व रस्ते बोट क्लबकडे जात होते. हजारो मागासवर्गीय त्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरले. त्याचे लोंढे पाहून प्रशासन व पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. देशभरातून आलेला व नवी दिल्ली परिसरातील मोठा जनसमुदाय मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी,
या मागणीसाठी सभेला शांततेत उपस्थित राहिला. महासंघाचे नेतृत्व समाजवादी नेत्यांकडे असल्याने हिसेला थारा नव्हता. या जनसमुदायाने भारतीय संविधानाच्या कलम ३४० नुसार आपल्या न्याय हक्काची मागणी ठामपणे नोंदवली. बोट कल्बवरील या सभेचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचा वाटा आहे. बोट क्लबवरील या विराट सभेचे नेतृत्व थोर समाजवादी नेते, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनी केले.
लोकदलाचे नेते व माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, माजी उपपंतप्रधान व देशातील दलितांचे त्यावेळचे सर्वात मोठे नेते बाबू जगजीवनराम, कर्नाटकातील प्रभावी नेते देवराज अर्स यांची प्रमुख उपस्थिती होती. सरकारने प्रमुख नेत्यांसह अनेकांना अटक केली. अटक झालेल्यांत महाराष्ट्रातील अॅड. जनार्दन पाटील व माझा समावेश होता. आम्हाला संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेले होते. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अटक झाल्याचा हा प्रसंग माझ्या काळजावर कायमचा कोरला आहे.
14.मंडल आयोग संसदेत सादर
बोट क्लबवरील सभा, राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघ, राज्याराज्यातील ओबीसींच्या संघटनांनी देशभरात कार्यक्रमांचा धडका लावून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीला ओबीसीसह दलित व सामाजिक न्यायाच्या बाजूने असलेल्या सवर्णांचा पाठिंबा वाढत गेला. महाराष्ट्रात ओबीसींपेक्षा दलित संघटना जास्त आग्रही होत्या. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र म्हणजे कोण?, हे पुरेसे स्पष्ट केले असल्याने ओबीसींच्या न्याय हक्कासाठी दलित संघटना आग्रही राहिल्या. या देशव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मुसलमान दिसत नव्हते. आपण ओबीसीत आहोत हेच त्यांना ठाऊक नव्हते.
देशभरातून वाढलेला दबाव व बोट क्लबवरील सभेनंतर भरलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३० एप्रिल १९८२ रोजी मंडल आयोग सादर करण्यात आला. मात्र त्यावर चर्चा झाली नाही. परंतु, ओबीसी कोण हे पुन्हा शोधावे लागेल, अशी सांकेतिक भूमिका घेणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक पाऊल मागे घेऊन मंडल आयोगाचा अहवाल संसदेत सादर करावा लागला. हा राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाचा मोठा विजय मानला जातो. चौधरी ब्रह्मप्रकाश, कर्पूरी ठाकूर यांच्या सारख्या जाणत्या व उत्तुंग नेतृत्त्वामुळेच हे शक्य झाले. जयप्रकाश नारायण यांच्या आणिबाणीविरोधी आंदोलनातून घडलेल्या ओबीसी प्रवर्गातील तरुण नेत्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील जमीन नांगरण्यास सुरुवात केली.
मंडल आयोग संसदेत मांडून तो बासनात गुंडाळून ठेवणे इंदिरा गांधीसरकारला शक्य झाले नाही. देशभरात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी मोठा दबाव निर्माण झाला. मागासवर्गीय व दलित खासदारांनी सरकारवर दबाव वाढवला. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १२ ऑगस्ट १९८२ रोजी लोकसभेत मंडल आयोगावर चर्चा करण्यात आली. या चर्चेची सुरुवात जनता पक्षाचे तरुण नेते रामविलास पासवान यांनी केली. मागासवर्गीय खासदारांनी चर्चेत सहभाग घेत ओबीसींची अवस्था, सवर्णांनी काबीज केलेल्या नोकऱ्या, मागासवर्गीयांचे शिक्षणाचे प्रमाण, सत्तेतील सहभाग याची तुलना करत सरकारच्च्या डोळ्यात अंजन घातले.
मंडल आयोगाच्या शिफारशींवर तब्बल नऊ तास जोरदार चर्चा झाली. दक्षिणेतील खासदार विजय राघवन यांनी २७ टक्क्यांऐवजी ५४ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस पक्षातील खासदारांनीही मंडल आयोगाच्या शिफारसींना पाठिंबा दिला. अत्यंत सविस्तर चर्चा झाल्यामुळे नेमके कोणाला ओबीसी म्हणायचे हे पुन्हा शोधावे लागेल, या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेला जोरदार चपराक बसली. या चर्चेत मंडल आयोगाने ओबीसी जाती ठरवण्यासाठी लावलेले निकष व त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. राज्यसभेतही मंडल आयोगावर पाच तास चर्चा झाली व तेथील वातावरणही लोकसभेसारखेच राहिले.
लोकसभा व राज्यसभेत मंडल आयोगाच्या बाजूनेच चर्चा झाली. त्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात छापून आल्या. टाइम्स ऑफ इंडिया व स्टेटस्मन या देशातील प्रमुख इंग्रजी दैनिकांनी सविस्तर वार्तांकन करत संसदेच्या दोन्ही सदनात मंडल आयोगाच्या शिफारशींना एकाही सदस्याने विरोध केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. या दैनिकांनी ही बाब ठळकपणे अधोरेखित केली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




