अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवरून रायगडमध्ये शिवसेनेत बंड; 38 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेत मोठी नाराजी उफाळून आली आहे. या नाराजीचे रूपांतर आता उघड बंडात झाले असून रायगडमधील शिवसेनेच्या तब्बल 38 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
महायुतीमध्ये या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. स्थानिक शिवसैनिकांना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येईल, अशी अपेक्षा होती. मात्र अखेर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूरचे माजी तालुकाप्रमुख संदेश पाटील यांच्यासह 38 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. स्थानिक स्तरावर झालेल्या जागावाटपामुळे शिवसेना कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली असून त्याचा निषेध म्हणून हे राजीनामे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना सहकार्य केल्याचा आरोपही काही नाराज पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणातील मतभेद आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे.
राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना संदेश पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सत्तेत असूनही आम्हाला अपमान सहन करावा लागत आहे. अशी सत्ता आम्हाला नको,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, रायगडची विधान परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली असली तरी त्याबदल्यात शिवसेनेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळू शकते. मात्र अशा चर्चांनंतरही स्थानिक शिवसैनिकांची नाराजी कमी झालेली दिसत नाही.
महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असला तरी रायगडमध्ये शिवसेनेतील या सामूहिक राजीनाम्यांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा पहिला मोठा संघटनात्मक धक्का मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नाराजीचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




