महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः 10

(सव्वीस)
खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.” “अहो. हे ब्राह्मणांचे ब्रह्मकपट तुम्हांस एकाएकी समजणे फार कठीण.” “अहो तात्यासाहेब ! आर्यांनी जे केले ते पुनः परत येत नाही, आता यांनी याला काय उपाय करावा?” ‘ ही आपली लोकपरंपरेची खास शैली आहे.
फुल्यांच्या गद्याचा मुख्य भाग समाजचिंतनाला वाहिलेला आणि हिंदु संस्कृतीची संबंध संरचनाच बदलवू पाहणाऱ्या देशीपणाच्या पोटतिडिकीने लिहिलेला आहे. विशेषतः ‘शेतकऱ्याचा असूड’ (१८८३), ‘इशारा’ (१८८५) आणि ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ (१८९१) ह्या तीन पुस्तकांमधील फुल्यांचे गद्य मराठीला त्यांच्यापूर्वी अपरिचित असे अर्थाचे अवाढव्य प्रांत आक्रमताना दिसते. इतके आधुनिक क्रांतिदर्शी विचार एवढ्या झपाट्याने मराठी गद्यात व्यक्त होताना मराठी भाषेच्या सर्व उपव्यवस्था वाकलेल्या दिसतात. वरील गद्य ग्रंथ मराठीच्या शैलीच्या विकासाचे अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत. मराठीच्या कोणत्याही अभ्यासकाला हे गद्य समजल्याशिवाय मराठीची संरचना कशी आधुनिक झाली हे समजणे कठीण आहे.
इ. स. १८१८ पासून १८७० पर्यंतच्या फुल्यांच्या आधीच्या गद्य लेखकांनी इंग्रजी गद्यातील विविध उपव्यवस्था मराठीत रिचवून छापील गद्यरचना प्रमाणित करत आणली होती. भाऊ महाजन आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्या दोन गद्यलेखकांमध्ये मराठीची इंग्रजी छापामुळे बिघडलेली लय दुरुस्त केलेली दिसते. १८७० नंतर फुले आणि टिळक ह्यांनी ह्या प्रक्रियेत मोठा भाग घेतला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, ह. ना. आपटे, आगरकर ह्यांनी ही प्रक्रिया पुन्हा बिघडवली. पुढे साने गुरुजींनी पुन्हा मराठी गद्याचा गोडवा प्रस्थापित केला. फुल्यांच्या कालखंडात इंग्रजीचा दबाव मराठीवर चालूच होता. परंतु आधुनिक युगाला आवश्यक अशा नव्या भाषिक गरजा मराठी लिखित भाषा झपाट्याने पूर्ण करत होती व ते इंग्रजीच्या सहाय्यानेच शक्य होते. लिपी, विरामचिन्हे व लिखित व्यवस्था ह्यात ह्या काळात मराठीचे मोठ्या प्रमाणावर प्रयोग केले आणि नाना रूपभेद वापरून अनावश्यक रूपभेद मागे टाकून प्रमाणित रूपे रूढ केली. त्यामुळे ह्या कालखंडातल्या सर्वच लेखकांच्या गद्यात अप्रस्तुत रूपभेदांची गर्दी दिसून येते. १८९० नंतरचा लेखक आणि त्यापूर्वीचा लेखक ह्यामध्ये भाषिक रूपांच्या बाबतीत मोठा फरक दिसून येतो. फुले हे मराठीची प्रमाणशैली रूढ होण्याच्या ह्या जोडावरच्या काळातले असल्याने त्यांचे गद्य इंग्रजीचा दबाव आणि मराठीची लय यांचा संघर्ष दाखवते. ३. महात्मा फुले : समग्र वाड्मय संपादक: धनंजय कीर व स. गं. मालशे, पृ. १८९
४. कित्ता, पृ
. २८५,
५. कित्ता, पृ. ४१०
10




