सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.129

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.129
टाकळगव्हाणकर अण्णाराव
अण्णाराव टाकळगव्हाणकर हे हिंगोली जिल्ह्यातील सत्यशोधक असून इ. २. १९९० मध्ये ते केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. शासकीय कर्मचारी असूनही आयुष्यभर त्यांनी सत्यशोधक विचारसरणीचा पाठपुरावा केला. सतत ते लोकशिक्षकाच्या भूमिकेत राहत असत. त्यांना नाणेसंग्रह करण्याचा छंद होता. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाणे प्रदर्शनात सहभाग नोंदवून त्यांनी पुरस्कार मिळविले. इ.स. २००५ मध्ये औरंगाबाद येथे आयोजिलेल्या सत्यशोधक समाजाच्या ३३व्या अधिवेशनात त्यांनी नाणे प्रदर्शन भरविले होते. हा प्रदर्शनाचा स्टॉल सर्व सत्यशोधकांना आकर्षित करत होता.
टेकाळे विठ्ठलराव वाघोजी (जन्म ७ जून १९५५)
सत्यशोधक विठ्ठलराव वाघोजी टेकाळे यांचा जन्म ७ जून १९५५ रोजी सावंगी पेठारी, तालुका देऊळगावराजा येथे झाला. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विठ्ठलराव टेकाळे यांनी परिस्थितीशी दोन हात करीत बी. एस्सी., बी. एड. पर्यंत शिक्षण घेतले. पुढे ते जालना जिल्ह्यातील रंगनाथ महाराज हायस्कूल, वाधरूळ येथून मुख्याध्यापक पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्त झाले.
ऐच्छिक सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सत्यशोधक समाज चळवळीत सहभाग नोंदवण्यास प्रारंभ केला. जालना येथे भरलेल्या दुसऱ्या सत्यशोधकी साहित्य संमेलनात ते उत्साहाने सहभागी झाले. येथून पुढे सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक बैठकीला ते उपस्थित राहू लागले.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




