मंडलनामा क्रमशः 49.बॅरिस्टर दलवाईकडून शाबासकी

मंडलनामा क्रमशः
49.बॅरिस्टर दलवाईकडून शाबासकी
मुस्लिम समाजातील विविध नेत्यांना ‘मुस्लिम ओबीसी’ हा मुद्दा पटवून देण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. बॅरिस्टर हुसेन दलवाई हे कोकणातील मुसलमानांचे अंतुले यांच्या सारखेच काँग्रेसचे मोठे नेते. ते चिपळूणचे आमदार होते, नंतर खासदारही झाले. इमानदार व अभ्यासू माणूस, अशी त्यांची प्रतिमा. गरिबांबद्दल कणव असलेला व त्यांच्यासाठी जमेल ते सर्व करणारा, अशी त्यांची ख्याती. ते १९९४ मध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष होते. मुस्लिम ओबीसीबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, त्यामुळे आपण येऊन आयोगाला माहिती द्यावी, असे पत्र त्यांनी मला पाठवले. ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. मी त्यांना आयोगाची बैठक बोलावण्याची विनंती केली. त्यांनी विनंती मान्य करून बैठक बोलावली.
या बैठकीला मी तयारीनिशी गेलो. बैठकीला आयोगाचे सदस्य उपस्थित होते. त्यांच्यात पुण्यातील विचारवंत व मुस्लिम समाजातील सन्माननीय कार्यकर्ते पी. ए. इनामदारही होते. समाजकल्याण विभागाचे सचिव असलेले आयएएस अधिकारी संदीप बागची यांनाही बोलावले होते. दलवाई यांच्या सांगण्यावरून मी देशातील ओबीसींची अवस्था, संविधानाततील कलम ३४०, विविध धर्मातील हिंदू ओबीसींच्या समकक्ष असलेले वर्ग, भारतातील मुस्लिमांतील ओबीसींची अवस्था याची सविस्तर माहिती सादर केली.
जनता दलाच्या व्ही. पी. सिंह सरकारने मंडल आयोग स्वीकारला होता व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशभर विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या संघर्षांचा हा काळ. प्रशासकीय
अधिकाऱ्यांना पटवून देणे व मुस्लिम ओबीसींना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. त्यामुळे अल्पसंख्याक आयोगाची ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.
माझे बोलून झाल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष दलवाई यांनी आयएएस अधिकारी बागची यांना भूमिका मांडण्यास सांगितले. यावर बागची यांनी, मुसलमानात ओबीसी नाहीत, असे मत मांडले. हे ऐकताच माझ्या अंगाचा तीळपापड झाला. या काळात वेगवेगळ्या ठिकाणी कनिष्ठ अधिकाऱ्यांचा अत्यंत कटू अनुभव घेत होतो. आयएएस अधिकाऱ्याकडून हे अपेक्षित नव्हते. दलवाई हे बागची यांना म्हणाले, ‘अहो, केंद्र सरकारने मंडल आयोग स्वीकारला आहे. हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्ही आयएएस अधिकारी आहात.’ बागची पुन्हा म्हणाले, ‘माझ्या माहितीप्रमाणे मुसलमानांमध्ये ओबीसी नाहीत.’
मी यावर उसळलोच. मी दलवाई यांना म्हणालो, ‘बागची यांना त्यांचे शब्द मागे घेण्यास सांगावे.’ बागची माझ्याकडे पाहातच राहिले.
मी पुन्हा म्हणालो, ‘संविधानाच्या विरोधात मत व्यक्त केल्याने बागची यांनी माफी मागितली पाहिजे.’ बागची यांना हे अपेक्षित नव्हते. एकदम संविधानाचाच दाखला दिल्यामुळे ते चपापले.
मी त्यांना विचारले, ‘तुम्ही संविधान वाचले आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कलम ३४० कशासाठी अंतर्भूत केले? त्याबद्दल काही माहीत आहे का?’
माझ्याकडून एवढा संविधानिक हल्ला झाल्यानंतर बागची यांनी आयोगाचे अध्यक्ष दलवाई यांच्याकडे अभ्यास करून माहिती देण्यासाठी वेळ मागून घेतला. दलवाई सुद्धा पक्के होते. त्यांनी बागची यांना किती दिवसाची मुदत पाहिजे, अशी विचारणा केली व तेवढा वेळ दिला. या बैठकीनंतर काही दिवसांनी मला हुसेन दलवाई यांचे पत्र मिळाले. तुम्ही मुस्लिम ओबीसींसाठी महत्त्वाचे कार्य करत आहात. तुमच्या कामाबद्दल आम्हाला आस्था आहे, असे त्यात लिहले आहे. बागची यांच्याबद्दल मला कोणताही आकस नव्हता व नाही. पण ज्या आयएएस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर सरकार चालते व सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ते अधिकारी करतात, त्यांच्यातच ओबीसींबद्दल एक्के घोर अज्ञान व चालढकलपणा होता, याचे वाईट वाटते.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


