सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 78

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
78
घोले विश्राम रामजी (जन्म १८३३ मृत्यू १० सप्टेंबर १९००)
सत्यशोधक समाज आणि सत्यधर्म समाजाचे एक भूतपूर्व अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांचा जन्म वेंगुर्ले येथे १८३३ साली झाला. घोले घराणे मूळ कोकणातले असले तरी रामजी घोले हे चौदाव्या काळ्या पलटणीत सुभेदार असल्याने एका ठिकाणी त्यांचे वास्तव्य राहत नसे. त्यामुळे साहाजिकच डॉ. विश्राम रामजी यांचे शिक्षण मामांकडे ठाणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण दापोली, मुंबई येथे झाले. ते मुंबईतील ‘रॉबर्ट मनी स्कूल’मधून मॅट्रिक झाले.
आरंभी त्यांची सेकंड ग्रेड ऑपरेटर म्हणून कराची येथे पलटणीत नेमणूक झाली. १८५७ च्या उठावाच्या धामधुमीत बाटलीवाला इस्पितळात त्यांची नेमणूक झाली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना ते १८६९ साली एल. एम. झाले, यानंतर असिस्टंट सर्जन म्हणून त्यांची नेमूणक झाली. इ. स. १८७४ ला ते पुण्यात आले, पुणे येथे वास्तव्य असताना १८८९ साली ते निवृत्त झाले. दरम्यान. इ. स. १८८७ साली व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांच्या हस्ते त्यांना ‘रावसाहेब’ हा किताब सरकारने बहाल केला. व्हॉईसरॉयचे मानद सहायक सर्जन म्हणून त्यांची इ. स. १८९१ ला नेमणूक झाली,
डॉ. विश्राम घोले यांचा इ. स. १८६५ साली ‘संयोगजन्य रोग’ हा वैद्यकशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ पाच प्रकरणांत विभागला असून १९८ पृष्ठांमध्ये समाविष्ट झाला आहे. दरम्यान, पुणे येथील एक लेखक सीताराम रामचंद्र गायकवाड यांनी त्यांचा ‘पुणे शहर-दुसरा भाग’ हा ग्रंथ डॉ. धोले यांना अर्पण केला आहे. डॉ. घोले ‘ज्ञानप्रकाश’ पत्रातही लेखन करीत असत, ते पुणे नगरपालिकेचे १८७७ ते १८९५ पर्यंत सलग अठरा वर्षे सरकारनियुक्त सदस्य होते.
इ. स. १८७४ साली ते सत्यशोधक समाजाचे सदस्य झाले. पुढे १८७५ मध्ये ते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झाले. पुढे महात्मा फुले यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी इ. स. १८७८ साली समाजाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दख्यान, गुजरातमधील अहमदाबाद येथे जलप्रलय झाल्याने डॉ. घोले अध्यक्ष
असताना या आपद्ग्रस्तांसाठी १९५ रुपयांची आर्थिक मदत त्यांनी पाठविली. यादरम्यान समाजाच्या वार्षिक उत्सवाचे आयोजन करून निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन डॉ. घोले यांनी केले. या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षीसही ठेवले. तसेच ६० रुपयांची घसघशीत देणगीही डॉ. घोले यांनी सत्यशोधक समाजाला दिली. समाजाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टात ही देणगी, देणगीदार नामावलीत अव्वल स्थानावर आहे. डॉ. घोले यांच्या निवासस्थानी सत्यशोधकमतावर नियमितपणे व्याख्याने आयोजित केली जात असत.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर, त्यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथाला डॉ. घोले यांनी छोटेखानी अभ्यासू प्रस्तावना लिहिली आहे. दिनांक १० जुलै १८८७ रोजी महात्मा फुले यांनी हवेलीच्या सबरजिस्ट्रार कार्यालयात मृत्युपत्र तयार केले. या मृत्युपत्रावर एक विश्वस्त म्हणून डॉ. घोले हे एक विश्वस्त आहेत. (साक्षीदार आहेत.)
महात्मा फुले निर्मिकाचे जग सोडून गेल्यावर त्यांच्या भावकीतील (फुले परिवारातील) काही व्यक्तींनी फुले यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या हक्कावरून हरकत घेतली. अशा बिकटप्रसंगी डॉ. घोले यांनी म्हादवा फुले यांच्याशी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. समेटाचे सर्व प्रयत्न असफल झाल्यावर शेवटी डॉ. घोले यांनी पोलिसांना बोलावून म्हादाबा फुले यास तेथून पिटाळून लावले. महात्मा फुले निवर्तल्यावर सत्यशोधक चळवळ जरा खंडित झाली. अशा प्रसंगी सत्यशोधक समाजाऐवजी ‘सत्यधर्म समाज’ असे समाजाचे डॉ. घोले यांनी नामांतर केले. या चळवळीला त्यांनी गतिमान केले. ते या नामांतरित समाजाचे काही वर्षे अध्यक्ष राहिले. पुणेकर सत्यशोधक ह. ना. नवलकर हे सचिव म्हणून या समाजाचे काम पाहत राहिले. डॉ. घोले यांनी ३ मार्च १८९२ ला सत्यधर्म समाजाची एक बैठकही घेतली.
अशा या सत्यशोधकाचे मधुमेह व उदराच्या आजाराने १० सप्टेंबर १९०० रोजी पुणे येथे निधन झाले; मात्र आयुष्याच्या सायंकाळी ते ‘विशेष धर्मश्रद्धाळू झाल्याचे’ बालबोध मासिकाने त्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात म्हटले होते. संदर्भ – १. डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार – अरुणा ढेरे, २. महात्मा फुले समग्र वाङ्मय – य. दि. फडके, ३. महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा (पृ. २६७) – संपा – हरि नरके
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


