मंडलनामा क्रमशः30.अंतुले झाले निरुत्तर

मंडलनामा क्रमशः30.अंतुले झाले निरुत्तर
अलिबाग शेजारी असलेल्या रेवदंडा येथे भंडारी समाजाचे एक कार्यकर्ते
राहत होते. त्यांनी मला सांगितले की, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे खासदार
अब्दुल रहमान अंतुले यांना मुस्लिम ओबीसीबद्दल सांगा, ते काही तरी करतील. मी समाजाच्या भल्यासाठी कोणालाही भेटायला तयार असायचो. त्या कार्यकत्यांचा एके दिवशी निरोप आला, अलिबागला ‘डीपीडीसी’ची मिटिंग आहे. तेथे अंतुले येणार आहेत. येथे जास्त गर्दी नसते, त्यांना भेटता येईल. त्यावेळी झुबेदा तांडेल नावाची एक महिला ‘डीपीडीसी’ची सदस्य होती.
तांडेल मुस्लिम ओबीसीत येत होत्या. भंडारी समाजाच्या त्या कार्यकर्त्याची तांडेल यांच्यासोबत ओळख होती. मी त्या कार्यकर्त्याच्या सूचनेनुसार, मिटिंगच्या आदल्या दिवशी रेवदंड्याला पोहोचलो. रात्री तेथेच मुक्काम करून सकाळी लवकर झुबेदा तांडेल यांच्या घरी गेलो. त्यांना मुस्लिम ओबीसीबद्दल माहिती दिली व अंतुले यांची भेट घालून देण्याची विनंती केली. झुबेदा यांना त्यांचा समावेश ओबीसीमध्ये होतो याची माहिती नव्हती. त्यांनी मिटिंग हॉलजवळ येण्याचे सांगून अंतुले यांना निरोप देईन, असे सांगितले.
आम्ही बैठक सुरू होण्याच्या आधीच हॉलजवळ पोहोचलो. मिटिंग सुरू होण्याआधी तांडेल यांनी अंतुले यांना, शब्बीर अन्सारी आपली भेट घेऊन मुस्लिम ओबीसीबद्दल काही सांगणार आहेत, असे सांगितले. त्यावर आश्चर्यचकित झालेल्या अंतुले यांनी मला भेटण्यास नकार दिला. एकदा भेटण्यास काय हरकत आहे, असे तांडेल म्हणताच, अंतुले यांचा पारा एकदम चढला, त्यांनी मुस्लिम ओबीसी वगैरे काही नसते, असे म्हणत पुन्हा नकार
दिला. मी हॉल बाहेरच होतो. हे संभाषण माझ्या कानावर पडले. मी चटकन हॉलमध्ये शिरलो. मिटिंग अजून सुरू व्हायची होती.
मी अंतुले यांना म्हणालो, ‘मुस्लिम समाजात अनेक लोक गरीब आहेत. व्यवसायाच्या आधारावर ओबीसींमध्ये समावेश होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत.’
एव्हाना हॉलमध्ये प्रशासकीय अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, ‘डीपीडीसी’चे सदस्य, पत्रकार जमले. मिटिंग सुरू झालेली नव्हती. माझे वाक्य ऐकताच आधीच पारा चढलेले अंतुले एकदम संतापले, ‘मी तुमचे काहीही ऐकणार नाही. मुसलमानांत जाती नाहीत, ओबीसी वगैरे काही नसते. सर्व मुसलमान एक समान असतात. तुम्ही बाहेर व्हा.’
ओबीसींबद्दल काँग्रेसची भूमिका जगजाहीर होती. अंतुले पक्के काँग्रेसी. काँग्रेसमुळेच कलम ३४० ची अंमलबजावणी रखडली होती. त्यामुळे मला अंतुले यांची भूमिका अपेक्षित होती. परंतु, अंतुलेंना माझे म्हणणे पटवून द्यायचे होते. मी बोलणे सुरूच ठेवले, त्यामुळे त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना मला हॉलबाहेर काढण्यास सांगितले. बैठकीत जिल्हाधिकारी सुद्धा होते. त्यांनी पोलिसांना बोलावले. तोपर्यंत मी ‘डीपीडीसी’च्या सदस्या झुबेदा तांडेल या ओबीसी असल्याचे सांगितले. पण अंतुले यांना ते पटत नव्हते. एव्हाना पोलिस हॉलमध्ये दाखल झाले व तेथील वातावरण एकदम तापले. मला त्यावेळी कसे काय सुचले माहीत नाही. मी एकदम म्हणालो, ‘मुस्लिमात सर्व समान आहेत, उच्च-नीच काहीही नाही, तर मग तुमची मुलगी या तांडेलच्या मुलाला देता का?’
हे ऐकताच आधीच संतापलेल्या अंतुले यांच्या अंगाचा तीळपापड झाला. अंतुलेंचा रागरंग ओळखून पोलिसांनी माझी बखोटी धरून हॉलबाहेर आणले. याचा सविस्तर वृत्तांत दुसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छापून आला. या बातमीमुळेही मुस्लिम ओबीसी चळवळीची चर्चा झाली. त्यावेळी कोकणात मुसलमानांतील तांडेल व दलित यांच्या सामाजिक दर्जात फार फरक नव्हता.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




