चार महिने उलटले, तरी मदतीची प्रतीक्षा कायम; पिंकी माळींच्या वडिलांची खदखद, VSR कंपनीवर गंभीर आरोप

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना अद्याप अपेक्षित आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. अपघाताला चार महिने उलटूनही विमा रक्कम, आर्थिक मदत आणि इतर आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी आपली व्यथा व्यक्त केली. त्यांनी रोहित पवार यांचे आभार मानत, अपघातानंतर सातत्याने पाठपुरावा करणारे ते मोजकेच नेते असल्याचे सांगितले.
शिवकुमार माळी यांनी सांगितले की, VSR कंपनीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. अंतरिम मदत स्वीकारण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र एकूण किती विमा रक्कम मिळणार, अंतिम सेटलमेंट कधी होणार आणि प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कुटुंबीय संभ्रमात असल्याचे त्यांनी म्हटले.
“आमची मुलगी आता परत येणार नाही. पण तिच्या हक्काचे मानधन आणि विमा रक्कम तरी वेळेत मिळावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चार महिने उलटूनही विमा प्रक्रियेत कोणतीही ठोस प्रगती दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती फोनद्वारे देण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. मात्र दुर्घटनेचे गांभीर्य पाहता ही मदत अत्यंत अपुरी असल्याचे त्यांचे मत आहे. अधिक मदतीसाठी पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच विमान दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपघाताचे नेमके कारण समोर यावे आणि जबाबदार घटकांवर कारवाई व्हावी, अशी त्यांची भूमिका कायम आहे.
पिंकी माळी या बारामतीकडे जाणाऱ्या विमानातील फ्लाइट अटेंडंट होत्या. या दुर्घटनेत त्यांच्यासह अजित पवार आणि इतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.




