सांगोला-मोहोळ परिसरावर शोककळा

सांगोला-मोहोळ परिसरावर शोककळा
स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे थोरले चिरंजीव अण्णासाहेब उर्फ पोपटराव देशमुख यांना अखेरचा निरोप
सांगोला तालुक्याच्या राजकारणात साधेपणा, शेतकरीहित आणि जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे थोरले चिरंजीव अण्णासाहेब उर्फ पोपटराव गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सांगोला, मोहोळ तालुका तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
पेनूर (ता. मोहोळ) येथे वास्तव्य असलेले अण्णासाहेब देशमुख हे अत्यंत शांत, संयमी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. देशमुख परिवाराने अनेक दशकं जपलेल्या शेतकरी चळवळीच्या आणि जनसंपर्काच्या परंपरेला त्यांनी आपल्या साध्या, मितभाषी स्वभावातून कायम जिवंत ठेवले. त्यांच्या निधनाने हजारो कार्यकर्ते, शेतकरी आणि सामान्य नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवला होता. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आता त्यांचे नातू तथा अण्णासाहेब उर्फ पोपटराव देशमुख यांचे सुपुत्र डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे देशमुख परिवाराचे सांगोला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ झाले आहे.
अण्णासाहेब देशमुख यांच्या निधनानंतर काल दि. १२ मे रोजी पेनूर येथे सावडण्याचा कार्यक्रम अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या दुःखद प्रसंगी डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे सांत्वन करण्यासाठी डॉ. के. टी. गवळी यांच्या समवेत शंकरराव लिंगे यांनी देशमुख परिवाराच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सांत्वन भेटीदरम्यान वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. “कार्यकर्त्यांना मायेची साथ देणारा, माणुसकी जपणारा आणि साधेपणातून मोठेपणा दाखवणारा माणूस आपण गमावला,” अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशमुख परिवाराने जनतेशी जपलेले नाते हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते सुख-दुःखात धावून जाणारे कौटुंबिक नाते होते. अण्णासाहेब देशमुख यांच्या निधनाने सांगोला तालुका, मोहोळ तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील जनतेला आधार देणारी एक प्रेमळ सावली हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त ।l होत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली… 💐 सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ













