महाराष्ट्र

‘जे स्वतःच्या रक्ताला नाव देऊ शकत नाहीत…’; ज्योती वाघमारेंचा गणेश नाईकांवर वैयक्तिक हल्ला, महायुतीत नवा वाद

नवी मुंबईतील एका शासकीय उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत आक्रमक आणि वैयक्तिक शब्दांत टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे.

निमंत्रण पत्रिकेवरून महायुतीत नवा वाद

नवी मुंबईतील आरोग्य सुविधांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. या मुद्द्यावरून कार्यक्रमस्थळीही आंदोलन झाले.

ज्योती वाघमारेंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. “जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव देऊ शकत नाहीत, ते दुसऱ्याचे नाव काय पुसणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निमंत्रण पत्रिकेवरून नाव वगळता येईल, पण जनतेच्या मनात कोरलेले नाव पुसता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

गंभीर आरोपांची सरबत्ती

वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर महिलांचे शोषण, नवी मुंबईतील डोंगर पोखरणे, घराणेशाही आणि संपत्तीचे प्रदर्शन अशा मुद्द्यांवरूनही टीका केली. ही कृती द्वेष, ईर्ष्या आणि संकुचित मानसिकतेतून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘तुम जलन बरकरार रखना…’

आपल्या वक्तव्याचा शेवट करताना वाघमारे म्हणाल्या, “तुम जलन बरकरार रखना, एकनाथ शिंदे साहेब जलवे बरकरार रखेंगे.” त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा

एकनाथ शिंदे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळल्यामुळे शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी आंदोलन केले. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय वर्तुळाचे लक्ष

निमंत्रण पत्रिकेवरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणावर गणेश नाईक यांची अधिकृत प्रतिक्रिया काय येते आणि महायुतीतील तणावावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button