फुले+शाहू+आंबेडकरवादी नेते व कार्यकर्ते दलाली करण्यासाठीच जन्म घेतात परंतू सामी पेरियावादी नेते व कार्यकर्ते मनुवादाला गाडण्यासाठीच मरेपर्यंत काम करतात!

फुले+शाहू+आंबेडकरवादी नेते व कार्यकर्ते दलाली करण्यासाठीच जन्म घेतात
परंतू सामी पेरियावादी नेते व कार्यकर्ते
मनुवादाला गाडण्यासाठीच मरेपर्यंत काम करतात!
ओबीसीनामा-37. लेखकः प्रा. श्रावण देवरे
भाग-2. पेरियारवादी पक्षच फुले-आंबेडकरांचे स्वप्न साकार करू शकतो!
बाबासाहेब आंबेडकर व सामी पेरियार यांच्यात खुप साम्य आहे. सर्वात मोठे साम्य हे आहे की, हे दोन्ही महापुरूष जातीअंतवादी होते व म्हणूनच स्वाभाविकपणे दोघेही महापुरूष प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तात्यासाहेब महात्मा फुले यांना गुरू मानून त्यांचा वारसा आदर्श शिष्य म्हणून चालवित होते. बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेवादाला वर्णांतक बुद्ध तत्वज्ञानाची जोड देऊन फुलेवादाचा विकास केला व ‘आंबेडकरवाद’ सिद्ध केला व सामी पेरीयार यांनी फुलेवादाला निरिश्वरवादाची जोड देऊन फुलेवादाचा विकास केला व ‘पेरियारवाद’ सिद्ध केला. हे झाले वैचारिक व तात्विक साम्य!
पेरियार यांनी आपल्या जात्यंतक चळवळीची सुरूवात 1924 पासून अस्पृश्यताविरोधी वायकोम सत्याग्रहापासून केली. बाबासाहेबांनी आपल्या जात्यंतक चळवळीची सुरूवात 1927 पासून अस्पृश्यता विरोधी महाड चवदार तळ्याच्या संगर पासून केली.
साम्य खूप असले तरी दोघांमध्ये फरकही होते. दोन अत्यंत महत्वाचे फरक पेरीयार व बाबासाहेब यांच्यात आहेत. पहिला फरक लिबरेशन (दलित) पँथरचे खासदार माननीय थोल थिरूमावलवण (तामीळनाडू) यांनी स्पष्टपणे आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडला. संभाजीनगर औरंगाबादला 1 सप्टेंबर 2024 रोजी सामी पेरियार यांच्या पुतळ्याच्या न होऊ शकलेल्या अनावरणसाठीचा समारंभ आयोजित केला होता. या समारंभाचे अध्यक्ष होते तामीळनाडूच्या लिबरेशन (दलित) पँथरचे खासदार मान्यवर थोल थिरूमावलवण! या पुतळ्याच्या न होऊ शकलेल्या अनावरण समारंभाचा वृत्तांत मी या लेखाच्या पुर्वार्धात केलेला आहेच!
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरूवातीलाच थिरूमावलवण ‘पेरीयार व आंबेडकर’ यांच्यातील एक महत्वाचा फरक सांगतात-
“.. Dr. Babasaheb Ambedkar focused mainly on the annihilation of the caste system through Constitutional means and Parliamentary Democracy. But Periyar wished to eliminate the Caste system through a revolutionary approach. Periyar never has faith in the constitution and electoral politics…..’’ (From the speech of Hon. Thol Thirumavlavan, MP, Tamilnadu on the occasion of unveiling the statue of Sami Periyar situated at Maharashtra College, Valuj in Sambahji Nagar Aurangabad. The link to this speech is given below.)
मान्यवर थिरुमावलवण यांनी मांडलेल्या आणखी काही मुद्द्यांचं विश्लेषण करता येईल. त्यांनी जे सांगीतले की बाबासाहेब आंबेडकर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी संविधानावर व संसदीय लोकशाहीवर विसंबून होते. मात्र पेरियार यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी क्रांतीकारी.? मार्ग अवलंबला. पेरियार यांचा संविधानावर व संसदीय निवडणूकांच्या राजकारणावर कधीच विश्वास नव्हता.* त्यांना तामीळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची व केंद्रीय मंत्रीपदाची अनेकवेळा ऑफर आली. परंतू त्यांनी मिळत असलेली ही राजकीय पदे आक्रमकपणे ठोकरून लावली. पेरीयार यांनी बौद्ध धम्मासकट सर्वच धर्म नाकारलेत. ते टोकाचे नास्तिक व निधर्मी होते.
संविधानात जरी सर्व धर्मियांना आपापल्या देवा-धर्माच्या उपासनेचे स्वातंत्र्य दिलेले असले तरी पेरीयार यांना हे घटनात्मक धार्मिक स्वातंत्र्य मान्य नव्हते. ज्या देवा-धर्माच्या उपासनेतून जनतेच्या शोषणाला मान्यता मिळते ते धार्मिक स्वातंत्र्य नाकारलेच पाहिजे व असे स्वातंत्र्य देणारे संविधानही नाकारलेच पाहिजे. म्हणून पेरीयार यांनी संविधानाची चौकट मोडून ब्राह्मणी देव-देवतांना भर चौकात उभे करून चपलेने बडवले. आजही एखाद्या सार्वजनिक चौकात कुणी गणपती बसविण्याचा प्रयत्न केला तर पेरीयारवादी कार्यकर्ते तेथे जातात व तो गणपती उचलून फेकून देतात.
संसदीय लोकशाहीच्या मार्गाने जातीव्यवस्था कधीच नष्ट होऊ शकत नाही. यावर पेरियार यांचा ठाम विश्वास होता. तामीळनाडूच्या कोणत्याही मतदारसंघातून ते उभे राहीले असते तर ते सहज आमदार-खासदार म्हणून निवडून आले असते. परंतू निवडणूकांच्या संसदीय लोकशाहीवर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. कारण ब्राह्मणशाहीग्रस्त भांडवलशाही समाजव्यवस्थेत संसद ही ब्राह्मणशाहांची व भांडवलशाहांची बटिक बनूनच राहणार, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे व आज आपण स्वातंत्र्याच्या 77 वर्षांच्या संसदीय कु-अनुभवाने समृद्ध झालेलो आहोत. निवडणूकांच्या राजकारणात ‘‘बहुजन हिताय’’ ऐवजी ‘‘सर्वजनहिताय’’ च्या नावाने बहुजन समाज पार्टी (बसपा) ब्राह्मणशाहीला कशी शरण गेली, याचा ऑंखो देखा हाल आपण पाहीलेला आहेच. मंडल आयोगासाठी झगडणारे पासवान भाजपात केव्हा सामील झालेत ते कळलेच नाही. कांशीराम साहेबांचा आदर्श घेऊन जानकर भाजपवासी कसे झालेत, हेही आपण पाहात आहोत. राजकारण संसदीय असो की नक्षलवादी जर या राजकारणाचा पाया सांस्कृतिक नसेल तर ते राजकारण तुम्हाला ब्राह्मणी शोषक-शासकांच्या छावणीत सहजपणे ओढून नेणारच!
संसदीय राजकारणाचा वापर करून ब्राह्मणशाहीला लगाम घालता येऊ शकतो, हे तामीळनाडूच्या ओबीसी नेत्यांनी सिद्ध केले आहे. तामीळनाडूच्या राजकारणाची पायाभरणी सामी पेरीयार यांनी ब्राह्णी-अब्राह्मणी सांस्कृतीक संघर्षातून मजबूतपणे करून ठेवल्यामुळे आज 57 वर्षांपासून तेथे ओबीसींच्या नेतृत्वाखाली दलित+आदिवासी-अल्पसंख्यांक या शोषित जाती-जमातींची एकहाती सत्ता आहे व ब्राह्मणवादी कॉंग्रेस-भाजपा हे दोन्ही पक्ष त्यांनी तामीळनाडूतून उखडून फेकून दिलेले आहेत. ब्राह्मणशाहीला लगाम घालण्यासाठी पहिला मार्ग त्यांनी अवलंबला जात-संख्यानिहाय आरक्षण! 50 टक्के ओबीसींना 50 टक्के आरक्षण व 18 टक्के दलितांना 18 टक्के आरक्षण! देशात सगळ्यात जास्त आरक्षण दलितांना मिळते ते तामीळनाडूमध्येच! हिंदू मंदिरातून ब्राह्मणांची हकालपट्टी करण्याचा कायदा करणे व त्याची यशस्वीपणे अमलबजावणी करणे, हे तामीळनाडूमध्येच शक्य आहे, इतरत्र दुसर्या राज्यात कदापीही शक्य नाही, कारण सामी पेरीयार यांनी तामीळनाडूचा अब्राह्मणी सांस्कृतिक पाया भक्कमपणे तयार करून ठेवलेला आहे.
सामी पेरीयार यांच्या पुतळ्याला मनुवादी आक्रमकपणे विरोध करतात व फुले-आंबेडकरांच्या पुतळ्याला मनुवादी मदत करतात. असे का? यावर चिंतन करतांना आणखी दुसरा सगळ्यात मोठा फरक फुले+आंबेडकर व पेरियार यांच्यात मला दिसला. आजवर फुले+आंबेडकरांच्या चळवळीतून जे कार्यकर्ते व नेते तयार झाले आहेत, ते बहुतेक सर्वच प्रस्थापित मराठा-ब्राह्मणांचे दलाल बनलेले आहेत. मात्र सामी पेरीयार यांच्या चळवळीतून जे कार्यकर्ते व नेते तयार होतात ते सर्वच ब्राह्मणशाहीला गाडण्यासाठीच मरेपर्यंत आक्रमकपणे काम करतात. तात्यासाहेब महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत जात्याभिमानी मराठे ब्राह्मणेतर म्हणून सहजपणे घुसले व त्यांनी ही चळवळ ब्राह्मणी कॉंग्रेसला विकून टाकली, त्याबदल्यात दलाली म्हणून त्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळविली. दलालीची व गुलामीची परंपरा मराठ्यांपासून तेथुन सुरू झाली. या परंपरेचा वारसा आजचे तथाकथित सत्यशोधक व ओबीसी नेते इमानेईतबारे चालवित आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर जन्मसिद्ध हक्क म्हणून एक जातीय जात्याभिमानी लोकांनी वर्चस्व कायम ठेवले व त्यांनी बाबासाहेबांची चळवळ प्रस्थापित मराठा-ब्राह्मणांच्या पायावर अर्पण करून त्याबद्ल्यात दलाली म्हणून समाज कल्याण मंत्रालय कायमस्वरूपी मिळविले.
अर्थात सर्वच फुले+आंबेडकरवादी नेते व कार्यकर्ते बेशरम आहेत, असे नाही. काही फुले+आंबेडकरवादी लोकांमध्ये थोडीफार शरम बाकी आहे. काही लोक डायरेक्ट भाजपा-कॉंग्रेसमध्ये जायला लाजतात. कारण त्यांच्यात शरम बाकी आहे. परंतू अशा अर्ध-शरमी लोकांसाठी पर्यायी सोय संघ-भाजपाने करून ठेवलेली आहे. संघ-भाजपाने ‘‘बी-टीम वा सी-टीम’’च्या नावाने पर्यायी पक्ष तयार करून ठेवलेले आहेत. डायरेक्ट भाजापामध्ये न जाता बी-टीममध्ये जाऊन भाजपाला मदत करता येते. म्हणजे बी-टीमवाल्यांना स्वतःला फुले-आंबेडकरवादी म्हणून मिरविताही येते व भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करून दलालीही मिळविता येते.
शब्द मर्यादा असल्याने मला लेखाचा हा दुसरा भाग येथेच थांबवावा लागत आहे. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर उगवलेली झाडे-झुडपे व काटे-कुटे तोडून बाजूला सारली व समाधी स्वच्छ केली. या समाधीच्या प्रकाश झोतात बरीच सत्य उजेडात आलीत व ब्राह्मणी-अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्षाची पायाभरणी तात्यासाहेबांना करता आली. पेरियार पुतळ्याच्या न होऊ शकलेल्या अनावरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बरीच दडलेलली सत्ये बाहेर येत आहेत. या दडलेल्या सत्यांवर उगवलेली ब्राह्मणी झाडे-झुडुपे व काटे-कुटे साफ करून सत्य उजेडात आणण्यासाठी मला आणखी बरेच काही लिहावे लागणार आहे. लेखाचा तिसरा भाग येईपर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,*
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
ईमेलः obcparty@gmail.com


