सत्यशोधकाच्या अंतरंग क्रमशः13

सत्यशोधकाच्या अंतरंग क्रमशः13
जाधव गणपतराव गोविंदराव (४ मे १९०८-२० मे १९८७)
सत्यवादीकार सत्यशोधक गणपतराव गोविंदराव जाधव ऊर्फ ग. गो. जाधव यांचा जन्म ४ मे १९०८ रोजी गगनबावडा (जिल्हा कोल्हापूर) येथे झाला. जाधवांचे शिक्षण जेमतेम इयत्ता चौथीपर्यंत झाले. पुढे जाधवांचा कोल्हापूरकर ज्येष्ठ सत्यशोधक भास्करराव जाधवांशी परिचय झाला. या परिचयातून त्यांचा भास्कररावांशी स्नेह वाढला.
या स्नेहातून ते कट्टर सत्यशोधक मतपुरस्कर्ते झाले. पुढे मुंबई निवासी झाल्यावर सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांच्या कैवारी पत्रातून त्यांनी आरंभी सत्यशोधक पत्रकार म्हणून उमेदवारी केली. पुढे जवळकर इंग्लंडला गेल्यावर कैवारी पत्राची धुरा जाधवांनी सांभाळली.
दरम्यान, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, मुंबई येथील मंदिर सत्याग्रह, ठाणे येथील नाभिक समाज परिषद, तसेच आंबेडकर चळवळीत ते सक्रिय राहिले. इतकेच नव्हे तर दांडी यात्रेदरम्यान त्यांनी महात्मा गांधींना नवसारी येथे भेटून संदेश प्राप्त केला.
पुढे ते मुंबईहून कोल्हापूर येथे स्थायिक झाले. त्यांनी कोल्हापूर येथून साप्ताहिक ‘सेवक’ पत्र सुरू केले. या पत्रातून त्यांनी सत्यशोधक मताचा राबता कायम ठेवला. कैवारी, तेज आदी पत्रातील सत्यशोधकी लेखनाचा अनुभव याप्रसंगी त्यांना कामी आला. दिनांक १ जानेवारी १९३९ रोजी त्यांनी ‘सा. सेवक’चे नामांतर करून ‘दैनिक सत्यवादी’ पत्राचा आरंभ केला. दरम्यान, नाभिक समाजाचे प्रश्न हाताळून ग. गो. जाधवांनी ‘हलकट’ शीर्षकाची १४ पृष्ठांची पुस्तिका प्रकाशित केली.
सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचा प्रभाव असलेल्या या सत्यशोधकाचे २० मे १९८७ रोजी निधन झाले.
संदर्भ – सत्यशोधकी साहित्याचा इतिहास-खंड २, प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01




