सत्यशोधकांचे अंतरंग 77

सत्यशोधकांचे अंतरंग
77
घोलप ज्ञानदेव ध्रुवनाथ
ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे मौजे सरूड, तालुका वाळवे, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत. ज्ञानदेव घोलप हे अस्पृश्य वर्गातील (महार समाजातील) असल्याने, तत्कालीन परंपरेप्रमाणे त्यांना वर्गाच्या खोलीबाहेर बसूनच प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले. या प्रसंगाची दाहकता लक्षात घेऊन सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही अमानुष पद्धत राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर घातली. विचारांती राजर्षीनी १९०८ साली कोल्हापूर येथे अस्पृश्यवर्गासाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केले.
या वसतिगृहात घोलपांना प्रवेश मिळाला. पुढे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुणे येथील डी. सी. येथे मिशन आणि मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले. इंग्रजी पाच – सहा इयत्तेपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीस सुरुवात केली. वाचन, लेखन आणि व्याख्यानाचा छंद असल्याने ‘नाही रे’ वर्गाचा पक्ष ते वर्तमानपत्रांमधून आणि व्याख्यानांमधून मांडत असत. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले असता त्यांनी ‘मूकनायक’ पत्राच्या संपादकत्वाची धुराही काही काळ सांभाळली. तसेच ‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ नियतकालिकाचे काही दिवस मॅनेजरही होते.
मुंबई इलाखा कायदे मंडळात त्यांची १९२०-१९२३ या तीन वर्षांसाठी आमदार म्हणून नियुक्ती झाली. मुंबई कायदेमंडळाच्या कौन्सिलमध्ये ते अस्पृश्यवर्गाचे पहिले पुढारी ठरले. तसेच इ. स. १९२४ ला सातारा येथे भाऊराव पाटलांनी ‘छत्रपती शाहू बोर्डिंग’चा नामकरण समारंभ महात्मा गांधींच्या हस्ते केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोलप यांनीच केले.
आरंभी ध्रुवनाथ घोलप हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी अनुयायी म्हणून वावरले. मात्र, पुढे त्यांनी अधूनमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधही केला.
घोलप सावळाराम दगडूजी
सत्यशोधक समाजाच्या अधिवेशन चळवळीतील आरंभीच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्यशोधक सावळाराम घोलप हे एक महत्त्वाचे सत्यशोधक होते. सावळाराम घोलप हे नाशिक येथील सत्यशोधक असून, इ. स. १९१० साली नव्याने स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा सत्यशोधक शाखेचे ते आरंभीचे अध्यक्ष आहेत. १७ एप्रिल १९११ साली भरलेल्या पुणे येथील पहिल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला ते उपस्थित होते. त्यांनी या अधिवेशनाच्या ठराव सत्रात एक
ठरावही मांडलेला आहे.
यानंतरचे दुसरे अधिवेशन विदर्भात होणार होते; परंतु काही अडचणीमुळे ऐनवेळेस हे अधिवेशन रद्द झाले. अशा विपरीत परिस्थितीत ५ एप्रिल १९१२ रोजी नाशिक शाखेने हे सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन सफल केले. याप्रसंगी सावळाराम घोलप अधिवेशन समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी या अधिवेशनाला स्वागताध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी या अधिवेशन फंडाला २५ रुपये निधीही दिला होता.
थोडक्यात, नाशिक येथील भद्राकली (नवापुरा) परिसरातील विजयानंद थिएटरात पार पडलेल्या या एकदिवसीय अधिवेशनाचे बरेचसे श्रेय सावळाराम घोलप यांच्याकडे जाते. अधिवेशन मालिकेच्या आरंभीच्या कालखंडातील नाशिक परिसरातील घोलप हे धडाडीचे सत्यशोधक कार्यकर्ते आहेत. मात्र, त्यांच्या जीवनकार्याच्या अनुषंगाने कुठलीही माहिती उपलब्ध होत नाही. असो.
संदर्भ – १. सत्यशोधक समाज परिषद अ. भा. व कार्यवृत्तांत – संपादक – प्राचार्य गजमल माळी
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




