सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 73

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
73
घुले राजेंद्र किसनराव (जन्म १ जुलै १९६८)
राजेंद्र किसनराव घुले हे जालना येथील उच्चविद्याविभूषित सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १ जुलै १९६८ रोजी जालना येथे झाला. घुले राजेंद्र हे किशोरवयापासून परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी लोकमंगल प्रतिष्ठान स्थापन करून प्रतिष्ठानच्या माध्यमातून २००९ सालापासून जालना येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेमध्ये अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी सत्यशोधक तत्त्वज्ञानावर व्याख्याने दिली आहेत.
१० व ११ जानेवारी २०१५ रोजी जालना येथे सत्यशोधक समाजाचे ३७ वे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाच्या संयोजन समितीचे घुले समन्वयक होते. या अनुषंगाने प्रकाशित झालेल्या ‘सत्यशोधन’ स्मरणिकेचे ते संपादक होते. १ मार्च २०१५ रोजी पुढाकार घेऊन पहिले सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलन घेतले. हे संमेलन त्यांनी यशस्वी करून दाखविले.
मातंग समाजात सत्यशोधक चळवळ रुजावी म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सतत प्रयत्नशील असलेल्या घुले यांनी मातंग समाजात सत्यशोधकमते अनेक विवाह लावले. जालना जिल्ह्यात खेडोपाडी फिरून मातंग समाजाच्या युवकांना सत्यशोधक विवाह चळवळीचे महत्त्व पटवून दिले आहे.
घोगरे
पांडुरंग राजाराम
(जन्म १८९३- १९८२)
डॉ. पांडुरंग राजाराम घोगरे (पवार) हे खान्देशातील धुळे येथील एक सेवाभावी सत्यशोधक होते. डॉ. पांडुरंग ऊर्फ दादासाहेब घोगरे यांचे मूळ गाव मराठवाड्यातील खडकवाघळ असून पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव पवार होते. डॉ. घोगरे यांचे आजोबा गंगाराम घोगरे कन्नड तालुक्यातील भटाणा येथे काही दिवस वास्तव्य करून धुळे येथे कायम वास्तव्यास गेले. पुढे डॉ. घोगरे यांचा जन्म २० एप्रिल १८९३ रोजी मातोश्री तुळसाबाईंच्या पोटी अमळनेर येथे झाला. तसे तर डॉ. घोगरे यांचे वडील राजाराम गंगाराम घोगरे यांनी मध्यप्रदेशातील इंदोर येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच सयाजीराव महाराज गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, रावबहाद्दर वंडेकर, केशवराव जेधे आदींच्या पुरोगामी कार्याने ते प्रभावित झाले होते. ऐन तारुण्यात अस्पृश्यता निवारण चळवळ सक्रिय राहिल्याने त्यांच्या दवाखान्यावर सनातन्यांनी बहिष्कार टाकला. विमनस्क अवस्थेत त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे ठरविले; मात्र त्यांच्या पत्नी पार्वतीबाईमुळे धर्मातराचा बेत त्यांनी रहित केला. इ. स. १९२६ नंतर ते सत्यशोधक ब्राह्मणेतर पक्षात सक्रिय झाले. १७
जानेवारी १९२६ रोजी शिंदखेड तालुक्यातील आमळथे येथे ब्राह्मणेतर पक्षाची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला डॉ. घोगरे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मौजे छाईल, तालुका साक्री येथे साक्री तालुका मराठा सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन दुपारी अकरा वाजता यादवराव रघुनाथ पाटील देसले कासारेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी माधवराव गोपाळराव भोसले, साक्रीकर यांनी उपस्थित तीन हजार श्रोत्यांचे स्वागत केले. रविवार दिनांक १४ फेब्रुवारी १९२६ रोजी संपन्न झालेल्या या अधिवेशनाला डॉ. घोगरे उपस्थित होते. या अधिवेशनात मुख्य सात ठराव आणि अनेक उपठराव पारित झाले. या ठराव सत्रात डॉ. घोगरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यानंतर दिनांक ६ नोव्हेंबर १९२६ रोजी धुळे तालुका ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सत्यशोधक शाखेच्या वतीने व्याख्याने आयोजित केली. या व्याख्यानांचे अध्यक्षस्थान डॉ. घोगरे यांनी भूषविले. धुळे नगर परिषदेचे तीन वेळेस अध्यक्षपद त्यांनी भूषविले. धुळे येथील शिक्षण संस्थेचे इ. स. १९७२ पर्यंत ते अध्यक्ष राहिले. अशा या कर्तृत्ववान सत्यशोधकाचे १९८२ साली निधन झाले.
संदर्भ – १. खान्देशातील समाज प्रबोधनाची चळवळ (१९१०-१९५०) – प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, २. साक्री तालुका मराठा सामाजिक परिषद- अधिवेशन पहिले. कजवे छाईल, तालुका साक्री, जिल्हा पश्चिम खानदेश
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


