‘ **बाई वाड्यावर या’… पलीकडचे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे श्रद्धास्थान निळू फुले!**

‘ **बाई वाड्यावर या’… पलीकडचे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे श्रद्धास्थान
निळू फुले!**
सत्यशोधक अभिनेते नाट्यकर्मी समाजसेवक . अंधश्रद्धा निर्मूलन विज्ञानवादी निळूभाऊ फुले यांचा मी एक सोलापूर जिल्ह्यातला विश्वासू कार्यकर्ता सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर ते मला सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्याचा कार्यक्रम अगोदर सांगत . त्यांच्या खाण्यापिण्याची खास व्यवस्था मी करत होतो – 11 मे 2003 रोजी . सांगोला येथे झालेल्या सत्यशोधक सामूहिक विवाह साठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांचा आदर्श त्यांचे मराठीतील चित्रपट सोंगाड्या थापाड्या हरणाऱ्या एक गाव बारा भानगडी अशा त्यांच्या अनेक चित्रपटा मध्ये मी लेमन गोळ्या पेपर मीट गोळा विकत होतो त्यानंतर मी माझ्या जन्मगाव नजरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे हायस्कूल वर एक नाटक आलेला होता कथा अकलेच्या कांद्याची . त्या वेळेला मी जवळून जाऊन त्यांची . भेट घेतली तेव्हापासून मी त्यांचा . छोटा कार्यकर्ता मित्र सेवक म्हणून शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलो त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01


हे आयुष् 1य म्हणजे चांगलं आणि वाईटाचा संगम आहे. या आयुष्यात जितकं चांगलं आहे तितकंच वाईटही आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे कि वाईट आहे म्हणून चांगल्याची किंमत आहे. आता हेच पहा ना, जर चित्रपटात खलनायक नसता तर नायकाचं एवढं महत्व राहिलं असतं का? पण रुपेरी पडद्यावरच्या याच खलनायकाच्या आत दडलेल्या नायकावर जेव्हा रसिक मनापासून प्रेम करायला लागतो तेव्हा तो खलनायक वास्तव जीवनातील नायक ठरतो यात शंकाच नसावी. खलनायकाच्या आत दडलेला असाच एक नायक म्हणजे ‘निळू फुले’!
रंगभूमी ते चित्रपट हा निळूभाऊंचा प्रवास फारच रंजक होता. ४ एप्रिल १९३० साली त्यांचा ‘पुणे’ इथं जन्म झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. अशा परिस्थिती निळूभाऊंनी आपलं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः ‘येऱ्या गबाळ्याचे काम नोव्हे’ हा वग लिहिला. त्यानंतर पु. लं. देशपांडे यांच्या नाटकात ‘रोंगे’ ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुढं राष्ट्र सेवादलाच्या कलापथकातून निळूभाऊंच्या अभिनयाला नवं कोंदण लाभलं. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्यातून त्यांचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं. त्यानंतर ‘पुढारी पाहिजे’ आणि ‘ बिन बियांचं झाड’ या लोकनाट्यांमधून त्यांच्या अभिनयाला नवे कंगोरे लाभले. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. पण रसिकांना मात्र कायम त्यांच्यातील खलनायकच भावला.
साधारपणे खलनायक म्हंटलं कि अंगापेरानं मजबूत, दिसायला उग्र आणि मारधाड करणारा असं साधारणपणे चित्र असतं. पण निळूभाऊ या चौकटीत कुठल्याही अर्थानं फिट नव्हते आणि असं असूनही त्यांच्यासारखा खलनायक आजतागायत मराठी चित्रपटसृष्टीत झाला नाही आणि पुढेही होणार नाही. कारण, एक तर त्यांचं वाचन प्रचंड होतं. हातात आलेलं पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण करायचं हा त्यांचा होरा होता आणि दुसरं म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनाचं त्यांचं निरीक्षण अतिशय अचूक होतं. या निरीक्षणाचा त्यांनी आपल्या अभिनयात सार्थ वापर करून घेतला. एका हातात धोतराचा सोगा, नजरेत बेरकी भाव आणि आवाजातली जरब हे त्यांच्या यशाचं गमक होतं. ‘बाई … वाड्यावर या’ ही जी त्यांची जरबयुक्त संवादफेक होती ना,
ती ऐकून चित्रपटगृहात बसलेल्या महिला प्रेक्षकांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. त्यांचं हे अभिनय कौशल्य आत्मसात करायचं ठरवलं तर सात जन्म सुध्दा कमी पडतील.
निळूभाऊंच्या अभिनय कारकिर्दीकडं पाहिलं तर हा माणूस अभिनयाचं विद्यापीठ होता असं म्हंटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्या काही भूमिका पाहिल्या तर हे विधान किती सार्थ आहे हे लक्षात येईल. ‘पिंजरा’ चित्रपटातील फडात नाचणाऱ्या नर्तकाचा कोडगेपणा ज्या खुबीनं निळूभाऊंनी रंगवलाय, तितक्याच ताकदीनं ‘सिंहासन’ चित्रपटात राजकारणामुळं व्यथित झालेला पत्रकार त्यांनी साकारला. ‘जैत रे जैत’ मधील आदिवासी जमातीची दैना दाखवणारा नाग्याचा हतबल बाप ते ‘माझा पती करोडपती’ चित्रपटातील सुखवस्तू कुटुंबातील नरेंद्र कुबेरचा करोडपती बाप … बाप रे बाप! निळूभाऊंच्या अभिनयाची केवढी ही रेंज! अजूनही खूप उदाहरणं आहेत. ‘कळत नकळत’ चित्रपटातील बॉसलाच ब्लॅकमेल करणारा कर्मचारी, ‘बिन कामाचा नवरा’ चित्रपटातील भ्रष्ट आणि कामचुकार सरपंच, ‘हीच खरी दौलत’ चित्रपटातील कामगारांना आपल्या मुलाप्रमाणं जपणारा कारखानदार … ही यादी न संपणारी आहे. पण या प्रत्येक भूमिकेतील वैविध्य निळू भाऊंची अभिनयाची क्षमता दाखवून जातं आणि आपण अवाक होऊन फक्त पहात राहतो.
निळू भाऊंच्या अभिनयाला एक धार होती, जी इतरांच्या तुलनेत त्यांचं वेगळेपण सिध्द करायची. ही धार होती रंगभूमीशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या नाळेची. रंगमंचावरून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रेक्षकांशी साधलेल्या संवादाची ही हातोटी रुपेरी पडद्यावर अभिनय करत प्रेक्षकांची नाडी ओळखण्यात त्यांना कामाला आली. निळूभाऊंनी रंगभूमी गाजवली. बेबी, रण दोघांचे, पुढारी पाहिजे, राजकारण गेलं चुलीत, सूर्यास्त, प्रेमाची गोष्ट या निळूभाऊंच्या नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘सखाराम बाईंडर’ नं तर इतिहास रचला. निळूभाऊंची भाषा शैली ग्रामीण आणि सखाराम बाईंडर चे संवाद लिहिले होते साक्षात विजय तेंडुलकरांनी. निळूभाऊंसमोर हे कडवं आव्हान होतं. पण आपल्या विलक्षण सामर्थ्यानं आणि दुर्दम्य इच्छाशक्तीनं त्यांनी हे आव्हान लीलया पेललं. या नाटकातील संवादांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.
कलेला भाषेचं बंधन नसतं, म्हणूनच ते कलाकारांनाही नसतं आणि निळूभाऊंसारख्या कलाकारांना तर कोणत्याही सीमारेषेचं वावडं नसतंच. आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या निळूभाऊंची दखल बॉलीवूड नं घेतली नसती तरच नवल! तिथंही निळूभाऊंनी आपल्या अभिनयाची छाप सोडलीच. बीग बी अमिताभ बच्चन नायक असतानाही ‘कुली’ चित्रपटातील निळू भाऊंनी साकारलेला ‘नत्थू’ कोणी सहज विसरू शकेल का? केवळ कुलीच नाही तर सारांश, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, नरमगरम, मशाल यासारख्या गाजलेल्या चित्रपटांतून निळूभाऊंनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात निळू भाऊंनी आपला ठसा उमटवला. नाट्य रसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ हे समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. ते समाजवादी विचारवंत, नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रेरित होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रध्दा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेल्या निळू भाऊंनी १९५८ च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व देखील केले होते. आपला आवडता कलाकार हा केवळ कलाकार म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही तेवढाच मोठा आहे ही भावना रसिकाला त्या कलाकाराच्या आणखी जवळ नेते. निळू भाऊंचं रसिकांभोवती असंच वलय होतं … नव्हे आहे…. जे आजही कोणीही तोडू शकलेलं नाही.
आयुष्यात आपण जसं ठरवतो तसं कधीही होत नाही. निळू भाऊंच्या बाबतीतही तेच घडलं. त्यांना राजकारणात रस होता. परंतु त्या क्षेत्रात त्यांना जाता आलं नाही. घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळं त्यांनी माळीकामाचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यातील कॅंटोन्मेंट एरियात तब्बल अकरा वर्षे त्यांनी माळीकाम केलं. दरम्यान त्यांच्या मित्राचे वडील एका चित्रपटगृहाचे व्यवस्थापक होते. त्यामुळं त्यांच्या सहकार्यामुळं निळूभाऊंना हॉलीवूड चे चित्रपट पाहण्याचा छंद लागला. भाषा त्यांना कळायची नाही, परंतु पडद्यावरील कलाकारांचा अभिनय त्यांना चित्रपटगृहाकडं पुन्हा पुन्हा खेचून आणायचा. ते आधी चित्रपट पाहायचे, ज्या कादंबरी अथवा घटनेतून चित्रपट तयार झाला आहे ती कादंबरी अथवा घटना यांचा ते अभ्यास करायचे आणि पुन्हा तो चित्रपट पाहायचे. यातूनच त्यांच्या मनात अभिनयाविषयी आकर्षण निर्माण झालं आणि ते या क्षेत्राकडं वळले. एका मुलाखतीदरम्यान त्यांना ‘अभिनय कसा करावा?’ असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले कि, “अभिनय म्हणजे आपली भाषा आणि चेहऱ्यावरचे हावभाव हेच असतं. मी कुठेही अभिनय शिकलो नाही. किंबहुना आमच्या काळात असा काही अभ्यासक्रम नव्हता किंवा नाट्यशिबिरं नव्हती. पण निरीक्षणातून मी अभिनय शिकलो. खरं सांगायचं तर एका तमाशामध्ये ‘कुशा कुसगावकर’ नावाचा सोंगाड्या होता.
तो खाकी चड्डी, खाकी शर्ट घालून रंगमंचाजवळ उभं रहायचा आणि तिथं जे घडतंय त्यावर फक्त मार्मिक टिपण्णी करायचा. त्याची बोलण्याची शैली इतकी जबरदस्त होती कि लोकं रंगमंचावरील लावण्यवतींना विसरून केवळ या सोंगाड्याकडंच पहायचे. जमलेल्या सहा सात हजार लोकांना खिळवून ठेवण्याची ताकत या कुशा कुसगावकरकडं होती. त्यानं मी खूप प्रभावित झालो, शिवाय वरिष्ठ अभिनेत्यांकडूनही बरंच शिकायला मिळालं.” निळू भाऊंची ती मुलाखत पहाताना, ऐकताना एक विशालकाय वटवृक्ष नजरेसमोर आला, जो विशाल असूनही त्याच्या फांद्या जमिनीकडं झुकलेल्या होत्या. इतकी विनम्रता, इतका साधेपणा, इतकी प्रसिध्दी पराङमुखता असलेला कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पण रुपेरी पडद्याबाहेरच्या वास्तव जगात वावरताना बायका त्यांना बिचकून त्यांच्यापासून चार हात लांब जायच्या. ही जी त्यांची प्रतिक्षिप्त क्रिया असायची तोच खऱ्या अर्थानं निळूभाऊंना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे, असं म्हणता येईल. इतका त्यांचा अभिनय खरा होता.
प्रत्येक कलाकारांमध्ये आपण कुठेतरी स्वतःला शोधत असतो. एखाद्या कलाकारांमध्ये आपल्याला आपण सापडतो आणि त्याच्या माध्यमातून आपण आपली स्वप्न जगतो. बऱ्याचदा हा शोध नायकापाशी येऊन थांबतो. पण निळूभाऊंच्या बाबतीत मात्र हा अपवाद आढळतो. कारण निळूभाऊंचा खलनायक रसिकांना भावला आणि त्यांनी त्या खलनायकाच्या आत दडलेल्या साध्या, सच्च्या, पापभिरू, नम्र आणि समाजसेवी माणसावर अतोनात प्रेम केलं. म्हणून तर नीलकंठ कृष्णाजी फुले अर्थात ‘निळू फुले’ यांचं नाव जेव्हा जेव्हा उच्चारलं जातं तेव्हा तेव्हा प्रत्येक मराठी माणसाची मान गर्वानं ताठ होते आणि मन त्यांच्यावरील मायेनं गदगदून येतं. ही कहाणी होती खलनायकामागच्या खऱ्या नायकाची. मला तर खूप भावली … तुम्हाला भावली कि नाही ते नक्की सांगा.
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #niluphule #niluphulebirthanniversary #niluphulemovies #niluphulesongs #niluphuledialaugs #marathactors



