ओबीसीनामा- *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी* *ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्यांना आरक्षण का नाकारले

*ओबीसीनामा- *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी*
*ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्यांना आरक्षण का नाकारले?*
या विषयावर मी यापूर्वीही लिहिले आहे. परंतू ते सर्व लेखन वैचारिक व तत्त्विक स्तरावरचे असल्याने मला काही मित्रांनी सूचविले की, हे लेखन अत्यंत महत्वपूर्ण असल्याने सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. म्हणून आपण याला थोड्या सोप्या भाषेत पुन्हा लिहा! *आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात रणकंदन माजविले जात असतांना हा लेख पुन्हा नव्याने सोप्या भाषेत लिहीणे आवश्यक आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माननार्यांना बाबासाहेब पुन्हा नव्याने समजावून सांगणे आवश्यक झाले आहे.*
ज्या काळात मार्क्स युरोपमध्ये वर्गसंघर्षाचा ऐतिहासिक भौतिकवाद मांडून साम्यवादाची स्वप्ने रंगवीत होता त्याच काळात तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले हे भारतातील वर्ण-जाती संघर्षाचा ऐतिहासिक भौतिकवाद मांडून वर्ण-जातीविहीन भारतीय समाजाची रचना समजावून सांगत होते. *या दोघा महापुरूषांचे तत्वज्ञान समतावादी समाज निर्मितीचे असले तरी एकाचा मार्ग होता वर्गसंघर्षाचा व दुसर्याचा वर्ण-जातीसंघर्षाचा!*
पॅरिस कम्युनची मार्क्सवादी-साम्यवादी क्रांती (1789-1795) लोकशाहीच्या मार्गाने मतपेटीतून झाली. तिथपर्यंत मार्क्स आपल्या तत्वज्ञानाचा पाया वर्गसंघर्षाच्या लोकशाही परिभाषेत मांडत होता. *परंतू भांडवलदार वर्गाने लष्करी युद्ध पुकारुन पॅरीस कम्युनची कत्तल केल्यानंतर मार्क्सची वर्गसंघर्षाची लोकशाहीवादी परीभाषा बदलली व त्याने यु-टर्न घेत ‘‘वर्गयुद्धाची’’ भाषा सुरू केली.*
भारतात वर्णव्यवस्थेची गुलामगिरी नष्ट करणारी बौध्द क्रांती महामानव बुद्धाच्या महाप्रबोधनाने यशस्वी केली. असंख्य बौद्ध भिख्खूंच्या मदतीने बुद्धाने ही क्रांती रक्ताचा थेंब न सांडता केली, याचे एक कारण हेही होते की, तत्कालीन गुलाम बाळगणारा मिरासदार शेतकरी हा उत्पादन दसपटीने वाढण्याच्या फायद्यापोटी गुलामांना मुक्त करीत होता व त्यांना वेतनी मजूर म्हणून वागवत होता. उत्पादनसाधनांचा विकास व उत्पादनसंबंधातील तुलनात्मक पुरोगामी बदल यातून दास्यांताच्या क्रांतीने गर्भ धारण केला व बौद्ध धम्माने त्याची सायलेंट प्रसुती घडवून आणली. *मेंढक श्रेष्ठीसारख्या मिरासदार शेतकर्याच्या अनुभवातून बुद्धाने दासप्रथा मुक्तिचा पंचधम्म सांगीतला व तो संपूर्ण भारताने मान्य केला.*
पुष्यमित्र शृंगाने लष्करी प्रतिक्रांती करून वर्णसंघर्षाला एकतर्फी वर्ण-जातीयुद्धाचे स्वरूप दिले. परंतू तरीही आधुनिक भारतातील वर्णजाती संघर्षाची भुमिका मांडणारे सर्वच महापुरुष लोकशाहीवादी असल्याने त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा की वर्णजाती संघर्षाची जागा वर्णजाती युद्धाने घेऊ नये. शोषित-पिडित समाजाला मैदानी युद्धाची भाषा परवडत नाही, कारण साधनांचा अभाव हे एकमेव कारण नव्हे तर अशा मैदानी युद्धात शोषित-पिडित समाजघटकांचेच शिरकाण होत असते. *शोषणकर्ता समाज जर सत्तावंचित असेल तरच मैदानी युद्धात त्याला पराभूत करता येते, हे भीमा-कोरेगाव युद्धावरून सिद्ध होते. चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकरांनी 1803 सालीच पेशव्यांचा पराभव केला होता.* तेव्हा पेशवे हे आपला जीव वाचविण्यासाठी वसईला पळाले व तेथेच लपून बसले. होळकरांपासून जीव वाचविण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी मांडलिकत्वाचा करार केला. तेव्हापासून पेशवे सत्तावंचित झाले होते. त्यामुळे 1818 साली महार रेजिमेंटने भीमाकोरेगावच्या मैदानी युद्धात पेशव्यांच्या सैन्याला सहजपणे कापून काढले. पेशव्यांच्या अनन्वित अत्याचारांमुळे महार रेजिमेंट या युद्धात ज्या त्वेषाने लढली, ते पाहता भीमाकोरेगाव युद्धाला जातीयुद्धाचे स्वरूप आले होते. या जातीयुद्धात पेशव्यांचा सहज पराभव झाला कारण ते या आधीच (1803 साली) सत्तावंचित झाले होते.
जाती संघर्षाला जातीयुद्धाचं स्वरूप प्राप्त होणार नाही, याची काळजी तात्यासाहेब महात्मा फुले यांनी घेतली, तशीच काळजी बाबासाहेब आंबेडकरांनीही घेतली. स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात गांधीजी उपोषणाला बसले असतांना बाबासाहेबांनी माघार घेतली व जिंकलेली लढाई सोडून दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी हेच सांगीतले की, ‘उपोषणात गांधींचे प्राण गेलेत तर गावोगावी दलित वस्त्यांचे शिरकाण होईल.’ *जातिसंघर्षाची जागा जातियुद्धाने घेउ नये, यासाठी बाबासाहेबांनी माघार घेतली.*
जातीसंघर्ष असो की जातीयुद्ध, त्याची शास्त्रशूद्ध मांडणी बाबासाहेब आंबेडकरांना करावी लागली. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी केलेली वर्णजाती संघर्षाची मांडणी मोघम होती व बदलत्या काळाच्या संदर्भात ती कालबाह्य होत होती. शूद्रादिअतिशूद्रांची *‘अब्राह्मणी छावणी’* विरूद्ध ब्राह्मणांची *‘ब्राह्मणी छावणी’* ही तात्यासाहेब महात्मा फुले यांनी केलेली वर्ण-जाती संघर्षाची मांडणी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी जशीच्या तशी स्वीकारली असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ती मांडणी बदलत्या काळात कालबाह्य वाटत होती. त्यांना ही मांडणी अधिक काटेकोर व शास्त्रशूद्ध करण्याची गरज वाटत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जातीसंघर्षाची मांडणी आपल्याला त्यांच्या ‘‘राईटिंग्ज एण्ड स्पीचेसच्या 5 व्या खंडात पाहायला मिळते. त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचा तक्ता काढून आपल्याला समजावून सांगीतले आहे. या तक्यात हिंदू समाजव्यवस्थेचे Caste Hindu व Non-Caste Hindu असे मुख्य दोन व एकूण चार भाग केलेले आहेत. कास्ट हिंदूच्या पहिला भागात त्यांनी ब्राह्मणी छावणी घेतलेली आहे. *या पहिल्या भागाला ब्राह्मणी छावणी का म्हणायचे? तर स्वतः बाबासाहेब लिहीतात की, ‘या पहिल्या भागात येणार्या जाती जातीव्यवस्थेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे जातीव्यवस्था टिकविणे व मजबूत करणे हे पहिल्या भागातील जातींचे मुख्य काम असते.* यासाठी ते या पहिल्या स्तंभात संक्षिप्तपणे लिहीतात की, ‘‘High Caste – Dvijas Traivarnikas – Caste evolved out of the three varnas, Brahmins, Kshatriyas and Vaishyas.’’ (Dr. Babasahib Ambrdkar Writings and Speeches, Vol.-5, page-112)
बाबासाहेबांचे लेखन संशोधनाच्या पाळीवरचे असल्याने ते मोघम शब्द वापरत नाहीत, ते अत्यंत काटेकोर, शास्त्रशूद्ध व संदर्भासहीत शब्द वापरतात. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या काळात संशोधनाची साधने पुरेशी नव्हती, त्यामुळे त्यांनी ‘‘शुद्रादिअतिशुद्र वर्ण-जाति विरुद्ध ब्राह्मण वर्ण-जात’’ अशी ऐतिहासिक संघर्षाची मांडणी केली. *बाबासाहेबांनी आपल्या गुरूने केलल्या या मांडणीचा विकास करीत तीला अधिक काटेकोर व शास्त्रशूद्ध केली.* बाबासाहेबांनी येथे जो एक शब्द वापरला आहे, तो विशेष करून लक्षात घेतला पाहिजे. तो शब्द कोणता व बाकीच्या तीन स्तंभातील जातींची नेमकी काय भुमिका आहे, हे आपण या लेखाच्या दुसर्या भागात पाहू या!
तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
*-प्रा. श्रावण देवरे*
*
*संपर्कः* 94 227 88 546
तीन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा


