संडे स्पेशल प्रशांत वाघमारे झाडांचे गाव भंडीशेगाव

संडे स्पेशल प्रशांत वाघमारे
झाडांचे गाव भंडीशेगाव
: 20 हजार झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन
: 42 एकरावरील साडे पंधरा हजार देशी वृक्षांचे ड्रीम गार्डन
आषाढी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, संत चांगावटेश्वर, संत चौरंगीनाथ महाराज पालखी मुक्कामाचे गाव असणारे भंडीशेगाव आज झाडांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गावातील पूर्वीची जुनी झाडे सोडून नवीन वृक्षारोपण केलेली जिवंत झाडे वीस हजाराच्या पुढेच आहेत. त्यामुळे ते नैसर्गिक पर्यटनाचे निसर्ग संपन्न केंद्र बनलेले आहे.
पंढरपूर- पुणे रोडवर असणारे भंडीशेगाव हे पंढरपूर पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे.सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असे, 42 एकर एकाच जागेवर 17 हजार 500 देशी वृक्षांचे वृक्षारोपण व त्यातून संवर्धन झालेल्या 15 हजार 700 झाडांचे घनदाट जंगल असणारे भंडीशेगाव हे एकमेव गाव असेल. या ड्रीम गार्डनमध्ये असणारे शेततळे व पायथ्याशी वाहणाऱ्या कासाळ ओढ्यावर बंधारा बांधून भविष्यात बोटिंगची ही सोय होणार आहे. त्याचबरोबर या गावात स्वादिष्ट जेवणाची प्रसिद्ध अशी हॉटेल ही आहेत.गावात काही हेमाडपंथी मंदिरेही आहेत. नजीकच्या काळात या ठिकाणी सेंद्रिय भाजीसह रानभोजनाची सोयही उपलब्ध होणार आहे.
अजित कंडरे या उद्योजकाने 42 एकरावरील या गायरान जमिनीवर आपल्या सहकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून वृक्षारोपण करण्याचा ठाम निश्चय केला. त्यांना त्या काळातील जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी खूप मार्गदर्शन केले. त्याचवेळी अजित कंडरे, आमदार सुभाष देशमुख यांचे प्रयत्नतून एनटीपीसी सोलापूर, अधिकारी किशोर आहेर व वन विभाग यांनी या रानात वृक्षारोपण व संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी उद्योजक अजित कंडरे येलमार , त्यांचे सहकारी, त्याचबरोबर ड्रीम फाउंडेशन, सोशल फाउंडेशन व ग्रामपंचायत भंडीशेगाव यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले. या जागेवर असणारी चिल्लार बाभळीची झाडे जेसीबीने काढून टाकून त्या ठिकाणी एक बोअर मारून देण्यात आले. या एकाच ठिकाणी सतरा हजार पाचशे वृक्षांचे वृक्षारोपण केले .या ड्रीम गार्डन वर होणाऱ्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, सहकार शिरोमणी वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, युवक नेते डॉ. बाबासाहेब देशमुख व विविध खात्याचे शासकीय अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.
आज या ड्रीम गार्डनवर 15500 देशी झाडांचे घनदाट असे जंगल उभे राहिले आहे. यामध्ये 4 हजार 500 चिंच, जांभूळ, करंज यासारख्या फळांची झाडे आहेत. जेणेकरून भविष्यात हया झाडापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या ड्रीम गार्डनची देखभाल होऊ शकेल.असे हे ड्रीम गार्डन नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहे.
या ड्रीम गार्डन जवळून जाणारा भंडीशेगाव – वाडीकुरोली रस्ता आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नातून आता होत आहे. या रस्त्यापासून 200 फुटांवर ड्रीम गार्डन आहे. परंतु मुख्य रस्त्यापासून ड्रीम गार्डन वर जाण्यासाठी कोणताही शासकीय रस्ता नाही. तो होणेही आता अत्यंत गरजेचे आहे. शेजारील शेतकऱ्यांच्या शेतातून या ठिकाणी जावे लागते.
त्याचबरोबर भंडीशेगाव येथे असणारे सुंदर असे बुद्ध पार्क हे विविध वृक्षांनी नटलेले आहे. अजित व आलिषा कंडरे यांनी स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून लाखो रुपये खर्चून या भागातील युवकांच्या मदतीने याची निर्मिती केली आहे. बुद्ध पार्कच्या या परिसरामध्ये आज विविध कार्यक्रम होत असतात. काटेकोरपणे निगा राखलेल्या या सुंदर वातावरणातून लोक हलायलाच तयार नसतात. त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यासिका, बुद्ध विहार व व्यायाम शाळेचे नियोजन करण्यात आलेले आहे. गावातील रस्ते, शाळा, मंदिरे, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, स्मशानभूमी, पालखी मार्गावरील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सर्वात मोठे गोल रिंगण ज्या ठिकाणी होते, अशी ऐतिहासिक बाजीराव विहीर व गावातील ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले आहे. यामुळे काही रस्त्यावर तर गर्द सावलीच असते.
गावातील प्रत्येक जण निसर्ग प्रेमाने झपाटून या झाडांच्या संगोपनासाठी प्रयत्न करीत आहे.गावात वाढदिवस, विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वर्षभर वृक्षारोपण होतच असते.डॉ. अनिल यलमार व शिक्षक प्रशांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले आहे.अगदी होम मिनिस्टर सारख्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनाही तीन फूट केशर आंब्यासारख्या फळझाडांचे वाटप नूतन सरपंच सुमन पाटील,गणेश पाटील,धनाजी कवडे पाटील यांच्याकडून करण्यात येते.
ग्रामपंचायतच्या वतीने व गावात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार रोपे देऊनच केला जातो. वृक्ष संवर्धन करणाऱ्यास खड्डे काढून त्यामध्ये माती भरून देण्यास ग्रामपंचायत तयारीत असते. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेणाऱ्या नागरिकांना अन्नदाते पोलीस नाईक वामन यलमार यांच्या वतीने त्यांच्या आईच्या स्मरणार्थ फळझाडांचे वाटप करण्यात येत आहे.
आता गावातील विविध चौकांचे सुशोभीकरण करण्याचा आराखडा ही ग्रामपंचायतीने तयार केलेला आहे. गावातील शेतकरी आता सेंद्रिय भाजीपाला व सेंद्रिय शेती करण्यास उत्सुक आहेत.भविष्यात भंडीशेगाव मध्ये छोटे-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणात उभारले जाणार आहेत. जेणेकरून येथील युवक व महिलांनाही रोजगार गावातच मिळू शकेल.भंडीशेगाव एक हरित व नैसर्गिक पर्यटन स्थळ होण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व माजी सरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध सामाजिक संस्थां, फ्रेंड्स ग्रुप, सर्व संघटनाचे पदाधिकारी, क्रीडा मंडळे, सार्वजनिक वाचनालय, युवक संघटना प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
*भंडीशेगाव हे झाडांचे गाव म्हणून ओळखले जात असून ते एक नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणूनही उदयाला येत आहे. आता लोकांचा ओढा या नैसर्गिक अधिवासाचा जास्तीत जास्त आस्वाद घेण्याकडे वाढला
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


