सोशल

मंडलनामा क्रमश: मुस्लिम ओबीसी चळवळीची वाटचाल 21.जालना परिषदेमुळे फुटली कोंडी

मंडलनामा क्रमश:

मुस्लिम ओबीसी चळवळीची वाटचाल

21.जालना परिषदेमुळे फुटली कोंडी

मुस्लिम व्यक्ती व गटांसोबत फक्त संपर्क व संवाद साधून महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेचा रेटा निर्माण होत नव्हता. त्यामुळे संघटनेने जाहीर कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राज्यात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीने जोर पकडला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यास मराठवाड्यातील सवर्णांचा तीव्र विरोध होता. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या, दलितांच्या हत्या झाल्या. अनेक दलित कुटुंबं गावं सोडून शहरात स्थायिक झाले. एक दशकापूर्वी दलित पँथर स्थापन होऊन तिचा राज्यात दबदबा निर्माण झाला होता. मराठवाड्याबाहेरील अनेक ओबीसी चळवळीतील नेत्यांचा नामांतर आंदोलनाला पाठिंबा होता. ते नामांतराच्या लढाईत हिरिरीने सामील होत असत. मी सुद्धा मुंबईत झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. डॉ. आंबेडकर यांच्यामुळे वैचारिक कक्षा रुंदावलेल्या दलित बांधवांचा ओबीसी चळवळीला मनापासून पाठिंबा होता. त्यावेळी मंडल आयोगाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी देशभर आंदोलने होत होती. चौधरी ब्रह्मप्रकाश, कर्पूरी ठाकूर, शरद यादव, रामविलास पासवान, कांशीराम, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, जनार्दन पाटील, वीरमणी आदी नेत्यांनी तत्कालीन राजकारणाचा फोकस ओबीसी आंदोलनावर आणला. देशात ओबीसी व महाराष्ट्रात दलितांच्या आंदोलनाचा जोर वाढला असताना या दोन्ही आंदोलनात मुसलमान कोठेच नव्हते. विशेषतः महाराष्ट्रातील मुसलमान ओबीसी आंदोलनात नव्हतेच. त्यामुळेच वातावरण निर्मिती करण्याकरिता मुसलमानांचे मेळावे घेण्याचे महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेने ठरवले.

मराठवाड्यात मुस्लिमांची लोकसंख्या इतर विभागाच्या तुलनेत जास्त आहे.
जालना, औरंगाबाद, अंबाजोगाई, उदगीर, नांदेड, अहमदपूर, परभणी, लातूर, उस्मानाबाद या शहरात ती ठळकपणे जाणवण्याएवढी मोठी आहे. त्यामुळे मुस्लिमांचा मंडल आयोगाला पाठिंबा मिळविण्यासाठी मराठवाड्यात पहिली परिषद घेण्याचे ठरवले. ती जालन्यात घ्यावी, असा निर्णय झाला. परिषदेची तारीख होती ५ फेब्रुवारी १९८४. चौधरी ब्रह्मप्रकाश, रामविलास पासवान, के. वीरमणी, रा. सु. गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, निहाल अहमद, जनवादी पक्षाचे चंद्रजीत यादव, डी. पी. यादव, सय्यद शहाबुद्दीन, ऑल जम्मू अँड काश्मीर गुजर वेलफेयर असोशिएशनचे अध्यक्ष ताज मोहियोद्दीन, विचारवंत असगर अली इंजिनीअर, रामदास आठवले, प्रा. अरुण कांबळे यांना निमंत्रणे गेली.

संघटनेने फक्त मुसलमानांच्या ओबीसीतील समावेशाच्या जनजागृतीसाठी परिषदेचे आयोजन केले होते. निमंत्रण मिळाल्यानंतर विद्यापीठ नामांतर लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मला पत्र लिहून परिषदेला विद्यापीठ नामांतर हा विषय जोडण्याची विनंती केली. संघटनेने प्रा. कवाडे यांची विनंती मान्य केली. अशा रितीने या परिषदेच्या माध्यमातून दलित व ओबीसी मुस्लिम यादुर्बल समाजघटकांची एकजूट करण्याचा हा प्रयत्न. पण पुढे काय वाढून ठेवले याची मला कल्पना नव्हती. संघटनेच्या कार्यकत्यांनी मुस्लिम व दलितांमध्ये परिषदेचा जोरदार प्रचार केला. परिषदेच्या तयारीसाठी माजी आमदार शांती नाईक या जालन्यात दहा दिवस येऊन राहिल्या. त्यांच्या देखरेखीखाली आम्ही परिषद यशस्वी करण्यासाठी राबत होतो.

लाँग मार्चमुळे नामांतर आंदोलनाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे हे प्रचंड लोकप्रिय होते. त्यांची भाषणे जमावाला चेतवत असत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत प्रा. कवाडे यांना प्रवेशबंदी होती. आम्ही तर त्यांना निमंत्रित केलेले. बंदीमुळे ते येणार की नाही, याबद्दल थोडी धाकधूक होती. दलित कार्यकर्तेच याबद्दल चर्चा करू लागले. मी प्रा. कवाडे यांना संपर्क केला. त्यांनी येणार असल्याचे पत्र पाठवले. महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेने नामांतर आंदोलनाशी जोडून घेतल्याबद्दल कौतुकही केले. ते पत्र दाखवून आम्ही शंका घेणाऱ्यांचे समाधान करत असू.

परिषदेला अनेकांना निमंत्रित केले होते. पण प्रत्यक्षात चौधरी ब्रह्मप्रकाश, प्रा. जोगेंद्र कवाडे, रा. सु. गवई, असगर अली इंजिनीअर, रामदास आठवले व प्रा. अरुण कांबळे हेच उपस्थित राहिले. इतरांनी परिषदेला पाठिंबा देणारी पत्रे पाठवली. ही सर्व पत्रे आम्ही परिषदेत वाचून दाखवली. ही परिषद होऊ नये यासाठीही जालन्यात काही मंडळी हरत-हेचे प्रयत्न करत होते. परिषदेचे नियोजित स्थळ कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे (मोंढा) मैदान होते. तेथील परवानगी मिळाली होती. ही परिषद जालन्यात चर्चेचा विषय ठरत होती. नामांतराला अनेकांचा विरोध होताच. पण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीलाही अनेकांचा विरोध असल्याचे या परिषदेच्या निमित्ताने प्रथमच लक्षात येत होते. त्यावेळी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे आप्पा (तात्या) चव्हाण हे जालन्याचे आमदार आणि नाना पाटील हे जिल्हाधिकारी होते. मंडल आयोग व विद्यापीठ नामांतर विरोधकांच्या दबावाखाली बाजार समितीने मैदान देण्यास नकार दिला. आता काय करावे? मोठा प्रश्न निर्माण झाला. आम्ही आमदार व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

परिषदेपूर्वी एक घटना घडली. शरद पवार यांचा मंडल आयोग व विद्यापीठ नामांतर या दोन्हींना पाठिंबा होता. पण मराठा महासंघाचा या दोन्हीला विरोध

होता. परिषदेच्या काही दिवस आधी शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. मंडल आयोगाच्या मुद्यावर मराठा महासंघाने बीड रस्त्यावर शरद पवार यांचा ताफा अडवला. या घटनेचाही परिणाम जालन्यातील आयोजनावर झाला. त्यामुळे परिषदेला जागा नाकारली होतीच, पण लोकांना तेथे जाण्यास रोखण्यासाठी अपप्रचार सुरू झाला. आम्हीही परिषद रद्द न करता यशस्वी करण्याच्या ईरने पेटलो. नियोजित स्थळ बदलून काँग्रेस भवन जवळच्या मैदानावर परिषद भरवण्यात आली. जिल्हाबंदी हुकूम मोडून प्रा. कवाडे परिषदेला हजर राहिले. चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्या सारखा राष्ट्रीय नेता आला. रा. सु. गवई व असगर अली इंजिनीअर हे दोन विद्वान होतेच. परिषदेत जोरदार भाषणे झाली. प्रचंड विरोध होऊनही त्याकाळी सुमारे पाच हजार लोकांच्या उपस्थितीने मैदान खचाखच भरले.

परिषदेच्या निमित्ताने घडलेली आणखी एक घटना, चौधरी ब्रह्मप्रकाश हे औरंगाबादला विमानाने आले. ते राष्ट्रीय नेते असल्याने व परिषदेच्या वातावरण

निर्मितीसाठी औरंगाबादला त्यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात लोकसत्ता दैनिकाच्या पत्रकाराने मंडल आयोगाच्या मागणीला नामांतराचा जोड का दिला, असा प्रश्न विचारला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी का करत नाही?, असा उपप्रश्न जोडला. मंडल आयोग व नामांतराची सांगड घातल्याचे चौधरी ब्रह्मप्रकाश यांना माहीत नव्हते. विद्यापीठ नामांतराची मागणी होत असल्याचे त्यांना माहीत होते, पण सविस्तर भूमिका माहीत नव्हती. या प्रश्नामुळे ते थोडे गडबडले. कसलेले नेते असल्याने ‘इसका जबाब ये देंगे’, असे म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. ओबीसींमधील अनेकांचा नामांतराला विरोध होता हे मला माहीत होते. हा सापळा असल्याचे माझ्या लक्षात आले. परिवर्तनवादी भूमिका परिषदेत मांडता येते, पत्रकार परिषदेत नेमके व पत्रकारांना पटणारे उत्तर देणे भाग होते. ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव विधानसभेत झाला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे,’ असे तांत्रिक उत्तर देऊन मी वेळ मारून नेली.

औरंगाबाद ते जालना प्रवासात चौधरी ब्रह्मप्रकाश यांनी माझ्याकडून विद्यापीठ नामांतराची सगळी माहिती जाणून घेतली. त्यांनी जालन्याच्या सभेत पत्रकार परिषदेतील घटना सांगून माझ्या उत्तराची तारीफ केली. शिवाय विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी केली जात नसल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले.

परिषद यशस्वी झाल्यानंतरही जालन्यात महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेबद्दल अपप्रचार थांबत नव्हता. असगर अली इंजिनीअर हे बुद्धिमान विचारवंत. ते विविध चळवळीत सहभागी होत व मार्गदर्शन करत. ते पक्के धर्मनिरपेक्ष होते. परिषदेला आल्यानंतर त्यांना कुंकू लावून औक्षण केले. परिषदेनंतर हा मुद्दा मुस्लिमांमधील जातीयवाद्यांनी तापवला. त्या आडून मुस्लिमांमध्ये मुस्लिम ओबीसी संघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न होता. संघटनेची बदनामी झाली की नाही हे माहीत नाही मात्र झालेला विरोध व परिषदेतील जोरदार भाषणांमुळे परिषद गाजली. परिषदेतील मांडणीची महाराष्ट्रात चर्चा झाली. या परिषदेमुळे मुस्लिम ओबीसींचा प्रश्न जाहीर मंचावरून मांडण्यास सुरुवात झाली. मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नाला या परिषदेने तोंड फोडले. माझा व संघटनेचा मनसुबा पूर्ण झाला. मुस्लिम ओबीसी या मुद्द्याची चर्चा व्हावी हेच तर आमचे म्हणणे होते व त्याची सुरुवात या पद्धतीने झाली.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button