🌹||||| श्री विठ्ठल तुकोबाराय चैतन्य |||||🌹 अभंग क्र. १५५४

🌹||||| श्री विठ्ठल तुकोबाराय चैतन्य |||||🌹
अभंग क्र. १५५४
https://youtu.be/Wtp-HPLTRNs
तेथे सुखाची वसति | गाती वैष्णव नाचती | दिंड्या पताका झळकती | जे गर्जती हरिनामें ||१||
दोषा झाली घेघेमारी | पळती भरले दिशा चारी | न येती माघारी | नाही उरी परताया ||धृ ||
विसरोनि देवपणा | उभा पंढरीचा राणा | विटोनी निर्गुणा | रूप धरिलें गोजिरें ||३||
पोट सेविता न धाये | भूक भुकेलीच राहे | तुका म्हणे पाहे | कोण वास मुक्तीची ||४||
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ज्येष्ठ कृ.सप्तमी रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि ज्येष्ठ कृ. अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपुराकडे प्रस्थान करतो. या दोन्ही सोहळ्यात हजारो भक्त, भाविक, वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. सर्वसाधारणपणे दहा लाखोपेक्षा अधीक वारकरी पंढरपूरात एकत्र येतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातूनही अनेक संताचे पालखी सोहळे यामध्ये सहभागी होतात. त्याबरोबरच शेजारील राज्यांतूनही वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरात एकत्र जमतात. तेथे कसल्याही प्रकारच्या जातपात, धर्मभेद, लिंगभेद, गरीब श्रीमंत इ. गोष्टींना थारा दिला जात नाही. तथापि एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की, असं काय मिळतं पंढरपूरला जाऊन? तर याचंच उत्तर जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या प्रस्तुत अभंगांमधून देत आहेत. ते म्हणतात की, ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर करीत वैष्णव गात आहेत, नाचत आहेत आणि जेथे वीणा, सुशोभित पताका दिसतात, त्या ठिकाणी
अर्थात पंढरपूर येथे सकळ सुखाची वस्ती आहे.
येथे सर्व प्रकारच्या दोषांना, पातकांना घे घे मारीचा त्रास होत असल्यामुळे ते चारी दिशांना पळून जातात. तसेच ते परत माघारी सुध्दा येऊ शकत नाहीत. कारण परत येण्यासाठी ते मुळात शिल्लकच राहत नाहीत.
तेथे पंढरीचा राजा जो देव आहे, तो आपल्या देवपणाला विसरून भक्ताची वाट पाहत उभा आहे. तसेच त्याला आपल्या निर्गुण स्वरूपाचाही वीट आला असल्याने त्याने गोजिरे रूप धारण केले आहे. दुसऱ्या एका अभंगात जगदगुरू तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीसी जा रे आलेनो संसारा | दीनाचा सोयरा पांडुरंग || वाट पाहे उभा भेटीची आवडी | कृपाळू तांतडी उतावीळ ||
जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवांच्या सुखाचे सेवन केल्यामुळे आमचे पोट भरत नाही. ही सुख सेवन करण्यासाठीची भुक तशीच भुकेलेलीच राहते म्हणजेच ती कधीही शांत होत नाही. परिणामी या सुखाच्या सेवनाची इच्छा अपुरी राहील्याने आता मुक्तीची कोणाला गरज आहे? याची पुष्टी करताना जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की, पाहतां श्रीमुख सुखावलें सुख |डोळियांची भुक न वजे माझ्या || जिव्हें गोड तीन अक्षरांचा रस | अमृत जयांस फिकें पुढें ||
चला तर मग एकदा जगद्गुरू तुकोबारायांच्या वचनावर विश्वास ठेऊन आयुष्यात एकदा तरी होय होय वारकरी | पाहे पाहे रें पंढरी || काय करावी साधनें | फळ अवघेचि येणें || याची अनुभूती घेऊ या आणि आपले जीवन कृतार्थ करू या!
बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ! श्री नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम! पंढरीनाथ भगवान की जय!
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय !!
|| देवशयनी आषाढी एकादशी आणि पंढरपूर यात्रेनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा !!
|| जय शिवराय || जय जगद्गुरू || जय हरी ||
हभप देवराम (आण्णा) कोठारे




