महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका! लातूरमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश; हजारो किलो पावडर, 7,500 लिटर दूध नष्ट

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात दूध भेसळीचे रॅकेट उघडकीस आले असून, हजारो किलो Whey Permeate Powder आणि 7,500 लिटर संशयित दूध नष्ट करण्यात आले आहे. याचवेळी मुंबईतील दहिसरमध्येही दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

लातूरमध्ये FDA ची मोठी धाड

अन्न व औषध प्रशासनाने लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारीवाडी येथील नीलकंठेश्वर दूध संकलन व शीतकरण केंद्रावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर दूध भेसळीचा पर्दाफाश केला. ही कारवाई तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत करण्यात आली.

हजारो किलो पावडर आणि 7,500 लिटर दूध नष्ट

तपासणीदरम्यान 4,225 किलो Whey Permeate Powder आणि 7,500 लिटर संशयित मिश्रित दूध आढळून आले. प्राथमिक तपासात या पावडरचा वापर दूध भेसळीसाठी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे जनआरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे ₹5.03 लाख असल्याचे सांगण्यात आले.

अनेक कंपन्यांची पावडर जप्त

कारवाईदरम्यान Milky Mist, Paras, Lactoprima आणि Sonai या ब्रँडची Whey Permeate Powder आढळून आली. तसेच या प्रकरणी दूध संकलन केंद्राचे मालक, कर्मचारी आणि संबंधित पुरवठादारांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसरमध्येही भेसळखोरांवर कारवाई

मुंबईतील दहिसर परिसरात गुन्हे शाखा आणि FDA यांच्या संयुक्त कारवाईत नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळून भेसळ केल्याचा प्रकार उघड झाला. या कारवाईत 470 लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या पिशव्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे ₹39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंढेंची राज्यभर धडक मोहीम

तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात आक्रमक कारवाई सुरू केली आहे. यापूर्वीही पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश करून अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. आता मोठ्या दूध साखळ्या आणि पुरवठा व्यवस्थेवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य

FDA ने नागरिकांना भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांविषयी संशय असल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात शुद्ध आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button