महाराष्ट्र

तुकाराम मुंडेंची सर्वात मोठी कारवाई! केमिकल दुधाचं रॅकेट उद्ध्वस्त; 13 जण अटकेत, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये धाडसत्र राबवत केमिकल दुधाचे रॅकेट उध्वस्त करण्यात आले असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

केमिकल दुधाच्या रॅकेटवर मोठा घाव

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळीविरोधातील कारवाईला वेग आला आहे. त्याच मोहिमेअंतर्गत राज्यातील केमिकल दुधाच्या मोठ्या रॅकेटवर धडक कारवाई करण्यात आली. ही दुधाशी संबंधित आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

महिनाभर गुप्त तपास, नंतर धाड

तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, या कारवाईपूर्वी सुमारे महिनाभर गुप्त माहिती गोळा करण्यात आली. एका माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर तिची पडताळणी करण्यात आली आणि आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करण्यात आली. त्यानंतर FDA आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी केली.

पाच जिल्ह्यांत छापे, 13 आरोपी अटकेत

या कारवाईत पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिवसह विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. प्राथमिक तपासात मंचर परिसरातून हे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

या धाडीत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, रसायने आणि अन्य पुरावेही तपास यंत्रणांनी जप्त केले आहेत. या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम दूध बाजारात पुरवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी दोन टोळ्यांचा शोध

तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, या रॅकेटव्यतिरिक्त अशाच प्रकारे काम करणाऱ्या आणखी दोन टोळ्यांची माहिती तपास यंत्रणांकडे आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. गंभीर स्वरूप लक्षात घेऊन आरोपींवर कठोर कायदेशीर कलमे आणि आवश्यक असल्यास मकोका लावण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भेसळविरोधातील मोहिमेला वेग

गेल्या काही दिवसांत तुकाराम मुंडे यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी 25 कठोर नियम जाहीर केले होते. त्यानंतर आता या मोठ्या कारवाईमुळे राज्यातील भेसळ माफियांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. प्रशासनाने नागरिकांना संशयास्पद दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची माहिती तातडीने देण्याचे आवाहन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button