महाराष्ट्र

NEET पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट! ‘लेकाला डॉक्टर बनवण्यासाठीच पेपर फोडला?’ CBI च्या तपासात मोठा खुलासा

देशभर गाजत असलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी स्वतःच्या मुलासाठीच पेपरफुटी केल्याचा संशय CBI ने व्यक्त केला आहे. तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांना अटक केल्यानंतर तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.

दिल्ली न्यायालयाकडून ९ दिवसांची CBI कोठडी

NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीतील विशेष न्यायालयाने शिवराज मोटेगावकर यांना ९ दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी सुरू असून पेपरफुटीचे संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

CBI च्या मते, मोटेगावकर यांच्याविरोधात अत्यंत महत्त्वाचे डिजिटल आणि दस्तऐवजी पुरावे मिळाले आहेत. यामुळे या प्रकरणात कोचिंग क्लासेसची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

घरातून सापडली मूळ प्रश्नपत्रिका

CBI ने लातूरमधील मोटेगावकर यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तपासाला मोठे यश मिळाले. तपासादरम्यान त्यांच्या घरातून केमिस्ट्री विषयाची NEET परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी मोटेगावकर यांचा थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. NTA च्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित माहितीचा गैरवापर करून प्रश्नपत्रिका लीक करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.

‘मुलासाठी पेपरफुटी?’ धक्कादायक संशय

CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी शिवराज मोटेगावकर यांचा मुलगाही बारावीमध्ये शिकत होता आणि त्याने NEET परीक्षा दिली होती. आपल्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त गुण मिळावेत, या उद्देशानेच मोटेगावकर यांनी पेपरफुटीसारखा गंभीर प्रकार केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक चौकशीत मोटेगावकर यांनी आपल्या मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवल्यानंतर त्याचा व्यावसायिक वापर केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

लाखो रुपयांची देवाणघेवाण?

CBI च्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर मोटेगावकर यांनी काही पालकांशी संपर्क साधून “यशाची हमी” देत लाखो रुपये घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

लातूर आणि परिसरातील काही विद्यार्थ्यांना सराव परीक्षांच्या माध्यमातून मूळ प्रश्नांशी साधर्म्य असलेले प्रश्न दिल्याचीही चर्चा सुरू आहे. या संदर्भातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि सोशल मीडियावरील व्हिडीओंची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभर संतापाची लाट

या प्रकरणानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. लातूर, अकोला आणि इतर भागांत RCC क्लासेसविरोधात आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी क्लासेसच्या फलकांवर काळे फासून निषेध नोंदवण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. स्पर्धा परीक्षांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता

CBI सध्या मोटेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांची, मोबाईल डेटा आणि डिजिटल डिव्हाइसची तपासणी करत आहे. पेपरफुटी रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, याचाही शोध घेतला जात आहे.

तपास यंत्रणांच्या मते, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button