आधुनिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते महात्मा ज्योतिराव फुले !

आधुनिक महाराष्ट्रातील पहिले शेतकरी नेते महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांविषयीचे कार्य आजच्या या लेखातून जाणून घेऊ.
साभार – व्याख्याते परमेश्वर बनकर, बीड 9503288282
महात्मा फुले म्हटलं की केवळ स्त्री शिक्षण हेच चित्र आपल्या पुढे उभं राहातं, महात्मा फुलेंनी आपल्या कार्याची सुरुवात स्त्री शिक्षणापासून जरी केली असली तरी समाजातील सर्वच उपेक्षित, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी,शेतमजूर, विधवा महिला, अनाथ मुलं, या सर्वच घटकासाठी योगदान दिलेलं आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या संदर्भातील महात्मा फुलेंचे कार्य आजच्या लेखातुन आपण समजून घेऊ.
1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांची दयनिय अवस्था कश्यामुळे झाली
याचं वर्णन या पुस्तकामध्ये मध्ये फुलेंनी केलं आहे. आधुनिक काळात शेतकऱ्यांवरती पुस्तक लिहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महात्मा फुले हेच पहिले शेतकरी नेते ठरतात.शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक महात्मा फुलेंनी बडोद्याला जाऊन महाराज सयाजीराव गायकवाड यांना दाखवलं होतं त्यांच्या समोर ते पुस्तक वाचलं होतं. याचं पुस्तकाच्या छपाई साठी महाराज सयाजी राव गायकवाडांनी आर्थिक मदत देखील केली होती.शेतकऱ्यांसाठी रात्रीच्या रात्र शाळा काढून शेतकरी सुशिक्षित झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे पहिले समाजसुधारक म्हणून महात्मा फुले ओळखले जातात.
1890 साली राष्ट्रीय सभेचे 5 वे अधिवेशन मुंबई येथे भरले होते,या अधिवेशनाच्या प्रवेश द्वारावार महात्मा फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी 30 फूट उंचीचा गावताचा पुतळा उभा केला होता, जो पर्यंत सर्वसाधारण गोरगरीब शेतकरी वर्गाचा प्रतिनिधी राष्ट्रीय सभेमध्ये असणार नाही तो पर्यंत सभेला राष्ट्रीय म्हणून घेता येणार नाही असं महात्मा फुलेंनी ठाम पणे सांगितलं होतं.
महात्मा फुले हे उत्तम चित्रकार होते, परंतु समाज सुधारण्याच्या कार्यातून त्यांना या कामासाठी वेळ मिळत नसे,
तरी पण शेतकऱ्यांसाठी महात्मा फुलेंनी एक चित्र रेखाटले होते. एका शेतकऱ्याच्या डोक्यावर एक झाड उगवलेलं दाखवून त्या झाडाच्या ओझ्याने शेतकरी व्याकुळ झाला होता, आणि त्या झाडाचे फळं मात्र वरती बसून शेटजी भटजी आणि लाटजी खात होते, या चित्रातुन त्यांनी शेटजी भेटजी आणि लाटजी हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असं त्या काळच वर्णन केलं होतं.महात्मा फुलेंनी या चित्राच्या हजारो प्रती काढून वाटल्या होत्या, हे चित्र वृत्तपत्रात छापण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.
1875-76 साली, पुणे जुन्नर नगर परिसरात शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध जे खतफोडीचे बंड झाले,आंदोलन झाले त्याचे नेतृत्व महात्मा फुलेंनी केलं होतं. तत्कालीन काळात सावकार जमीनदार शेतकऱ्यांना व्याज देऊन त्यांच्या कडून जास्तीच्या व्याजदराने पैसा वसुल करत होते, पैसा वसुल झाला नाही तर त्यांच्या जमिनी हडप करत होते, दहा रुपये व्याज दिले तर बारा रुपये लिहून ठेवत असत,शेतकरी शिकलेले नसल्यामुळे त्यांना ही सावकार जमीनदार भिक्षुकांची ठगबाजी लक्षात येत नसे,
या मध्ये शेतकरी पिळून निघत असे, सावकार, जमीनदाराचे कर्ज असल्यामुळे कधी कधी सावकार व जमीनदार सांगतील तेच पीक शेतकऱ्यांना घ्यावा लागत असे. हा शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय थांबावा म्हणून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सावकार व जमीनदाराच्या विरोधात आंदोलन पुकारलं, जमीनदार व सावकाराच्या सांगण्यावरून शेतात नांगर चालणार नाही,जमिनी पडीत ठेवल्या जातील, हे आंदोलन पुणे जुन्नर नगर परिसरात जोरदार सुरु होते, जे शेतकरी थोडेफार शिकले होते ज्यांना सही करता येत होती अश्या शेतकऱ्यांच्या हजारो सह्या घेऊन सावकारी छळाविरोधात सरकारला निवेदन देण्यात आलं,
हे आंदोलन दोन वर्ष चाललं, शेतकरी मागे हटत नाहीत हे पाहून सरकाने सावकार व जमीनदाराच्या हा अन्यायाला कायदा करून प्रतिबंध घालण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना कमी दरात व्याज देण्यात येऊन त्यांच्या कडून जास्तीची वसुली करण्यात येऊ नये त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येऊ नये अश्या पद्धतिचा डेक्कन ऍग्रीकल्चरल रिलीफ ऍक्ट नावाचा कायदा केला.शेतकऱ्यांसाठी झालेले हे पहिलेच यशस्वी आंदोलन होते ज्याचं नेतृत्व महात्मा फुलेंनी केलं होतं. म्हणूनच आधुनिक आधुनिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते महात्मा ज्योतिराव फुले!
महराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते.




