धाराशिवमध्ये फिल्मी स्टाईल दरोडा; पिस्तूल-सुरा दाखवत कलाकेंद्रातून 9.51 लाखांचा मुद्देमाल लंपास
धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक दरोड्याची घटना घडली. सहा जणांनी घरात घुसून पिस्तूल आणि सुरा दाखवत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची माहिती समोर आली आहे.

चोराखळीतील कलाकेंद्रावर सशस्त्र दरोडा
धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या चोराखळी परिसरात पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिकांच्या घरी सहा जणांनी घुसून धमकी देत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरी परतत असताना संशयास्पद पाठलाग
तक्रारीनुसार, कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला जाधव या रविवारी पहाटे बार्शी येथील कार्यक्रम आटोपून इनोव्हा कारने चोराखळी येथे परतत होत्या. त्यांच्यासोबत रेखा शिंदे, शिवम गंगावणे आणि चालक शशिकांत मुंडे होते.
परत येताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचा संशय त्यांना आला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या घरी पोहोचल्या असता अचानक तोंडाला कापड बांधलेले सहा जण घरात घुसले.
पिस्तूल आणि सुरा दाखवत धमकावले
घरात घुसलेल्या आरोपींपैकी दोघांनी शिवम गंगावणे यांना जमिनीवर दाबून धरले. त्याचवेळी एका आरोपीने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावून धमकावले.
आरडाओरडा होऊ नये म्हणून आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
9.51 लाखांचा ऐवज लंपास
दरोडेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा मोठा मुद्देमाल चोरून नेला.
एकूण अंदाजे 9 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी लंपास केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आधीपासून वाद असल्याचा संशय
तक्रारीत काही संशयितांची नावेही नमूद करण्यात आली आहेत. आर्थिक व्यवहारातून काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींपैकी एक जण पूर्वीपासून परिचित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे




