मंडलनामा क्रमश: 6.अखेर मुंबई गाठली

मंडलनामा क्रमश: 6.अखेर मुंबई गाठली
माझ्या शिंपी कामाचा जालन्यात दोन वर्षात चांगलाच जम बसला. कपडे वेळेत व उत्तम शिवून मिळत असल्याने माझी ख्याती वाढायला लागली. परिणामी, दुकानातील कारागिरांची संख्या वाढली. माझे दुकान आता गाईच्या गोठ्यातून उत्तम ठिकाणी स्थलांतरित झाले. चंचल स्वभाव व सतत नवीन्याच्या शोधात असलेला मी, स्वस्थ बसणारा नव्हतो. लग्न झाल्यामुळे संसारात रमू लागलो. पत्नीचीही उत्तम साथ मिळत होती. ‘एक्स्पर्ट टेलर’ म्हणून नावारुपाला आल्यामुळे जालन्यातील पुढारी, अधिकारी दुकानात येत. आता मला व्यावसायिक प्रगतीचे वेध लागले. त्या काळात नुकतीच ‘एमएफसी’ची (महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ) स्थापना झाली होती. हे महामंडळ लघु उद्योगांना कर्ज देत असे. या महामंडळाकडून कर्ज काढून होजिअरीची फॅक्टरी काढायची, असे मनात आले. त्यासाठी खटपटी सुरू झाल्या. ओळखीपाळखी कामाला आल्या. मला तेव्हा म्हणजे १९७२ मध्ये अकरा हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. लहान कंपनीसाठी ही रक्कम पुरेशी होती. पण जालन्यासारख्या लहान शहरात होजिअरीची फॅक्टरी चालवणे किती कठीण होते ते मला माहीत नव्हते.
कर्ज मिळाल्यानंतर त्यातून विविध प्रकारची १८ यंत्र खरेदी केली. बाहेरून कापड आणून कपडे शिवून विकायचे, अशी योजना होती. तेव्हा जालन्यात रेडिमेड कपड्याची फॅशन आली नव्हती. तयार कपडे घेण्याऐवजी माप देऊन कपडे शिवून घेण्याची मानसिकता होती. मोठी माणसे चड्डीसुद्धा शिंप्याकडून शिवून घेत. त्यामुळे तयार मालासाठी योग्य मार्केटचा शोध घेणे हे आव्हान होते. अशा अनेक अडचणी असल्यातरी फॅक्टरी चालवायचीच, असा निर्धार पक्का होता. तरुण होतो. काहीतरी नवीन करण्यासाठी रक्त सळसळत होते.
अधिक चौकशी केल्यानंतर दक्षिण भारतातून कापड आणायचे व त्याचे कपडे शिवायचे, असे ठरवले. आता दोन अडचणी होत्या. पहिली कापड आणणे व दुसरी कारागीर मिळवणे. मी माझ्या संपर्कातून सातारा जिल्ह्यातून कारागीर आणले. त्यांची राहण्याची सोय केली. दक्षिण भारतात त्रिचूर, सालेम व एलम येथे कापड खरेदीसाठी दौरा केला. पहिल्यांदा त्रिचूर येथून कापड खरेदी केले. त्यांना पैसे दिले. त्यांनी ट्रान्सपोर्टने कापड पाठवू, असे सांगितले. मी जालन्याला परत आलो. पण, त्रिचूरहून तीन महिने कापड आलेच नाही. कारागिरांचा पगार व जागाभाडे हा खर्च सुरू होता. व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या या अडचणींची कल्पना नव्हती. अखेर काही महिन्यानंतर उत्पादन सुरू झाले. ते विकण्यासाठी व्यापाऱ्यांना भेटू लागलो. काम कठीण होते. जिद्द कायम होती. एव्हाना साताऱ्याकडून आलेल्या कारागिरांचीही कटकट सुरू झाली. एकतर त्यांच्यासाठी जालना हा दूरचा पल्ला आणि अगदीच भिन्न वातावरण. यामुळे ते येथे टिकेनात. पुन्हा सातारा, पुणे भागात नवीन कारागिरांचा शोध घ्यायचा. त्यांना जालन्यात आणायचे, असे चक्र सुरू झाले. शिवाय फॅक्टरीच्या कामात मी एकटाच असल्याने प्रचंड दगदग होत असे. कच्चा माल खरेदी व पक्का माल विकण्यासाठी बाहेरगावी गेल्यानंतर फॅक्टरीकडे दुर्लक्ष होत असे. माझे कापड शिलाईचे दुकानही बंद झाले.
वर्षभरातच अडचणी वाढण्यास सुरुवात झाली. कर्जाचे हप्ते, कामगारांचा पगार, कच्चा माल येण्यास होणारा उशीर, व्यापाऱ्यांकडून उशिरा मिळणारे पैसे; हे टाळता न येणारे व्यावसायिक चक्र सांभाळताना दमछाक होऊ लागली. त्यामुळे फॅक्टरी चालवणे कठीण झाले. घरची कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्याने नातेवाईकांचे मार्गदर्शन मिळत नव्हते. आज जालना उद्योगनगरी आहे. त्याकाळी फक्त व्यापारी शहर होते. त्यामुळे उद्योग यशस्वी करण्यासाठी जालन्यात योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळत नव्हते. परिणामी, दोन वर्षातच फैक्टरी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला व पोटापाण्याची तजवीज करण्यासाठी पुन्हा मुंबई गाठली. सुरुवातील गोरेगाव येथील गोलानी नावाच्या एका सिंधी व्यक्तिच्या होजिअरी फॅक्टरीत कटिंगमास्तर म्हणून नोकरी धरली. त्यांच्याकडे कापड कटिंगसाठी विजेवर चालणारी यंत्रे होती. मी ते काम
मंडलनामा | ३०
चटकन शिकून घेतले. माझ्या कामावर मालक खुश होता. दिवसभरात पाच ते सहा तास काम केले की माझा कामाचा कोटा पूर्ण होत असे. माझ्या कामात वेग होता. आरे कॉलनीत एकटाच राहत होतो. पत्नी जालन्यात होती. माझे मस्त चालले.
दरम्यान, मी मुंबईत होजिअरी फॅक्टरी थाटायचे ठरवले. राहण्यासाठी माहीमला गेलो. तेथेच एक जागा बघून जालन्यातून १८ यंत्रे व कारागीर घेऊन आलो. जालन्यात फॅक्टरीच्या कामात तोंड पोळलेले असल्यामुळे आता ताकही फुंकून प्यायचे, असे ठरवले. म्हणजे नोकरीही करायची व आपली फॅक्टरीही चालवायची. गोलानी यांच्याकडील नोकरी सोडून मी माहीमला गांधी यांच्या होजियरी फॅक्टरीत काम धरले. नोकरी सांभाळून माझा छोटासा व्यवसाय सांभाळण्यासाठी गांधींना हरकत नव्हती. त्यांच्याकडे मी सुपरवायजर होतो. तसे पाहिले तर ही माझी पदोन्नती होती. माझ्या फॅक्टरीतील कारागीर टिकत नसत. शिवाय मला गांधींच्या फॅक्टरीतही काम करावे लागत असे. पुन्हा तेच सुरू झाले. उदरनिर्वाहासाठी माझे नोकरीला प्राधान्य असल्याने परिस्थितीचा अंदाज घेऊन कामगार सोडून जात. पुन्हा नवीन कामगार शोधायचे, त्यांना कामावर ठेवायचे, कच्चा माल आणायचा, पक्का माल विकायचा. खूप धावपळ होऊ लागली. जालन्याला पत्नीलाही पैसे पाठवावे लागत. तिच्यासाठी जालन्याला पंधरा-वीस दिवसातून एकदा जावे लागे. तरीही मी मुंबईत रमत होतो. जालन्याला जाऊन माझे काही भले होणार नाही, असे वाटे, देशभरातून कामाच्या शोधात आलेल्या कष्टकऱ्यांना मुंबईनगरी सामावून घेत असे. मी तिच्यासाठी नेहमीच्या एका कष्टकऱ्यासारखाच होतो. माझी कष्टाची तयारी होती. धडपड करत होतो. पण जम बसत नव्हता.
जालना व औरंगाबादमध्ये ओळख झालेले राजकीय कार्यकर्ते मुंबईला येत असत. त्यांच्या भेटी होत असत. त्यांच्याकडून राजकीय खबरबात कळत असे. नुकतीच आणिबाणी लागल्याने बोलकी माणसे अबोल झाली. वातावरणात एक प्रकारची भीती, दडपण होते. अनेक माणसे पोलिस चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे मुंबई सोडून गावाकडे जात होती. गरज भागवण्यासाठी फॅक्टरीसाठी खरेदी केलेल्या मशीन विकायला लागलो. पण मुंबईत तळ ठोकून राहिलो. राजकीय व सामाजिक संपर्क वाढू लागला. म्हणतात ना मुंबई तुमच्या गुणांची पारख करते. तुम्हाला तशी संधी निर्माण करून देते. ती घ्यायची की नाही हे तुम्हाला
ठरवायचे असते. या काळात मला सामाजिक व राजकीय काम खुणावत होते. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या ओळखी व आकर्षण यामुळे माझ्या मंत्रालयात फेऱ्या सुरू झाल्या. स्थानिक पातळीवरच्या सामान्य कार्यकत्यांच्याही ओळखी होत होत्या. मी काही जणांची अडलेली लहान सहान कामे मार्गी लावून देत असे. तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे काँग्रेसचे मोठे पुढारी बाबुराव काळे हे राज्याचे गृहमंत्री व नांदेडचे शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. मी पहिल्यांदा काम करत असलेल्या गोलनी यांच्या मुलाला पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळत नव्हता. एखाद्या राजकीय नेत्याची चिठ्ठी आणल्यास प्रवेश मिळेल, असे त्यांना शाळेतून सांगण्यात आले. ते सरळ स्वभावाचे. त्यांच्या राजकीय ओळखी नव्हत्या. बोलता बोलता ते माझ्याजवळ याबद्दल बोलून गेले. मी म्हणालो, ‘यात काय मोठे? मी आणून देतो तुम्हाला चिड्डी’
‘अरे, पण कोणाची आणणार, माझी ओळख नाही. तू जालन्याचा, तुला येथे
कोण ओळखणार?’ गोलानी म्हणाले.
मी म्हणालो, ‘तुम्हाला ते काय करायचे. मी शंकरराव चव्हाणांची चिठ्ठी आणून देतो.’
गोलानी उडालेच. ‘ते मुख्यमंत्री आहेत. तुला जमेल का?’ मी म्हणालो, ‘जमेल.’
खरंतर मंत्रालयात जाण्याचा छंद जडल्यामुळे थोड्याफार ओळखी झाल्या
होत्या. शंकरराव चव्हाण यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रेम राठोड नावाची व्यक्ती होती. ते औरंगाबाद जिल्ह्यातील. आम्ही दोघं एकाच जिल्ह्याचे असल्यामुळे चांगली मैत्री झाली. राठोड धडपडे होते. मुख्यमंत्र्यांच्या ऑफीस स्टाफमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे रायभान जाधव हे एक उच्चाधिकारी होते. त्यांचीही ओळख झाली. या दोघांच्या साह्याने मी गोलानींच्या मुलाला प्रवेश मिळावा, असे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे शिफारसपत्र मिळवले. गोलानीच्या मुलाला प्रवेश मिळाला व गोलनी यांच्याकडे माझी वट वाढली.
कालांतराने रायभान जाधव यांची दाट ओळख झाली. पुढे जाधव हे कन्नडचे आमदार झाले. त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलगा हर्षवर्धन जाधव हे सुद्धा रायभान यांच्या निधनानंतर आमदार झाले. रायभान जाधव यांचे मित्र बाबुराव जाधव हे माझे सुद्धा मित्र झाले. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातील बाबुराव काळे व बाळासाहेब पवार या पुढाऱ्यांचा दबदबा
मंडलनामा | ३२
■ जालना येथे घरी आलेले चित्रपट अभिनेते व राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते निळू फुले यांच्यासह अन्सारी कुटुंब.
होता. या दोघांच्या कार्यकर्त्यांच्या ओळखीच्या जीवावर मी मंत्रालयात लुडबुड
करू लागलो.
आणिबाणीत पोलिस चौकशीचा मोठा धाक होता. थोडासाही संशय आला की पोलिस धडकायचे. लोकांमध्ये प्रचंड भीती होती. मुंबईतील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांवर सरकारी अधिकारी व पोलिस नजर ठेवून असत. त्यांना कोणते ना कोणते कारण काढून सतत चौकशीसाठी बोलावत. मंत्रालयातील तुटपुंज्या ओळखीच्या आधारे अशी काही प्रकरणे निस्तारली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


