*व्यथा वेदना सामाजिक कार्यकर्त्यांच्या..* *सामाजिक कार्यकर्त्यांचे समाजाला एक भावनिक आवाहन..*

प्रिय समाज बांधवांनो सध्या ओबीसी समाज प्रचंड संकटात आहे.आपल्यावरील संकट दूर व्हावे यासाठी आपण अहोरात्र मेहनत करत आहोत.हे करत असताना सरकारला निवेदन देने,समाज जागृती करणे, मोर्चे काढणे,धरणे आंदोलन करणे,ओबीसी नेतृत्वाला भेटून समस्यांची जाणीव करून देणे,समाज संघटन करणे या आणि इतर अनेक बाबी आपण करत आहोत. हे करत असताना सामाजिक नेतृत्व करणारे निष्ठावान कार्यकर्ते आपला अनमोल वेळ व पैसा खर्च करून प्रचंड परिश्रम घेत असतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
वास्तविक पाहता सामाजिक कार्यकर्त्याला सुद्धा वैयक्तिक घर प्रपंच सुख दुख वैयक्तिक कामे व इतर बाबी असतातच.परंतु तरीसुद्धा ते स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून झोपलेल्या समाजाला जागं करण्यासाठी तथा अज्ञानी समाजाला सुज्ञ करण्यासाठी पर्यायाने समाज विकासासाठी सदोदित वेळ देत असतात.त्यातूनच समाजाचा विकास साधला जातो.हे करत असताना बऱ्याच वेळी मोर्चे,सभा किंवा इतर कार्यक्रम घेण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि तो पैसा सामाजिक कार्यकर्ते समाजातील दातृत्वशील राजकीय पुढारी तथा समाजातून जमा करत असतात.परंतु काही अपवाद जर वगळले तर बहुतांश वेळी कार्यक्रमास लागलेला खर्च आणि जमा झालेली रक्कम यामध्ये तफावत असते.अर्थात जमा झालेला पैसा कमी आणि खर्च रक्कम अधिक असते.मग ती तूट भरून काढण्यासाठी पुन्हा पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते स्वतःच्या खिशाला झळ लावून घेतात व तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतात हे वास्तव नाकारता येत नाही.
सध्या आपल्या ओबीसी समाजाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.अर्थात आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे.जर आपण वेळीच सावध झालो नाही,लढा दिला नाही तर आपल्याला मिळणारं तुटपुंज आरक्षण व प्रतिनिधित्व इतिहास जमा होईल आणि पुन्हा सुरू होईल समाजाची अधोगती ! म्हणूनच आपल्या सर्वांना सजग राहून हा लढा सदोदित सुरू ठेवणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी समाजातील सुज्ञ व्यक्तींची आहे.म्हणूनच सुज्ञ व्यक्तींनी पुढाकार घेऊन समाजाला जागं करणे,समाजाचे संघटन करणे,समाजामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहून समाजाची ताकद दाखवून समाजाला सुरक्षित ठेवणे या गोष्टी होणे अपेक्षित आहे.अनुभव सांगतो बरेचसे सधन ओबीसी बांधव या कोणत्याच प्रक्रियेमध्ये सहभागी होताना दिसत नाही.त्यांना फक्त लाभ हवा असतो,आरक्षण हवे असते,सोयी सवलती हव्या असतात.सरकारने आपल्यासाठी खूप काही करावं असं त्यांना मनोमन वाटतंपण हे होण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही,पैसा नाही आणि परिश्रम करण्याची इच्छा नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.
क्रांती घरात बसून होत नसते.क्रांती घडवून आणण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते.त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.घरात बसणाऱ्यांनी आणि सामाजिक उन्नतीसाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये शून्य योगदान असणाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी.
16 ऑक्टोबर 2023 च्या मेळाव्याचा हिशोब समाजासमोर ठेवल्यानंतर त्यामध्ये आलेली तूट सुद्धा समाजासमोर ठेवण्यात आली होती आणि ही तूट भरून काढण्यासाठी कर्मचारी वर्ग आणि इतर समाज घटक यांनी तूट भरून काढण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले होते. अजूनही ती तूट भरून निघालेली नाही याची खंत वाटते.
वास्तविक पाहता मोर्चामध्ये जो खर्च झाला तो तर आम्ही आमच्या खिशातून केलेलाच आहे. ( आमची स्वतःची वर्गणी वेळ पैसा परिश्रम आणि लोकांच्या टीका हा आहेर वेगळाच!)
अजूनही मागील मोर्च्याची तूट भरून निघालेली नाही. ही किळस वाणी गोष्ट आहे. बांधवांनो इतिहास या प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो आणि ज्याला त्याला त्याने केलेल्या कार्याचे गुण सुद्धा देतो. कोणतेही सामाजिक काम करताना अनावधानाने काही चुका सुद्धा होतात परंतु त्यामध्ये आयोजक आणि संयोजकांचा काही दोष नसतो परंतु फक्त चर्चा होते चुकांची व उणीवांची! एवढे करूनही सामाजिक कार्यकर्ता हा सदोदित एनकेन प्रकारे आर्थिक आणि अनुषंगिक अडचणीत असतो.त्याच्या अडचणीचा पाढा फार मोठा असतो. सामाजिक कार्यकर्ता त्याच्या अडीअडचणींचा पाढा समाजासमोर कधी वाचतही नाही आणि समाजही सामाजिक कार्यकर्त्याच्या अडचणी सुद्धा समजून घेत नाही.सामाजिक नेतृत्व तर कदापिही नाही.निश्चितच याला काही अपवाद आहेत . अशा परिस्थितीत आपल्याला आपला समाज उन्नत व्हावा अशी अपेक्षा असते आणि ही अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि समाजातील नेतृत्व करणाऱ्यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा शून्य योगदान असणाऱ्या,घरात बसणाऱ्या आणि कधीच कोणत्या सामाजिक उपक्रमात किंवा कार्यात सहभागी न होणाऱ्या समाज बांधव तथा ओबीसी बांधवांना असते याची खंत वाटते…
आज भटके विमुक्त तथा ओबीसींचा लढा ऐरणीवर आहे.परंतु सामाजिक कार्यकर्ते सदोदित सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक धार्मिक,अध्यात्मिक,कृषी,
योग-आरोग्य,पर्यावरण,व्यसनमुक्ती,बेरोजगारी या आणि अनुषंगिक विषयांच्या संदर्भात निस्वार्थ भावनेने कार्य करत असतात.
सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थ भावनेतून जेव्हा एखादा कार्यक्रम आयोजित करतात किंवा एखादा उपक्रम हाती घेतात तेव्हा त्या उपक्रमात किंवा कार्यक्रमात समाजातील राजकीय पुढार्यांना मानसन्मान हवा असतो. परंतु राजकीय पुढारी जेव्हा अनेक कार्यक्रम घेतात अनेक उपक्रम राबवतात किंवा त्यांच्याकडे वरिष्ठ राजकीय मंडळी किंवा नेतृत्व येतात किंवा इतर अनुरूप प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांचा किती सन्मान होतो याचाही विचार व्हावा.
एकंदरीत सामाजिक कार्यकर्ता त्याच्याकडे असलेला वेळ स्वतःच्या उन्नतीसाठी व कुटुंबासाठी न देता समाजासाठी देतो. त्यामुळे तो कुटुंबाच्या टीकेचा धनी तर होतोच शिवाय त्याने राबविलेल्या उपक्रमातून अनावधानाने त्याच्याकडून झालेल्या
चुकांमुळे समाज तथा राजकीय पुढार्यांच्या सुद्धा टीकेचा धनी ! कधी कधी राजकीय पुढार्यांना असे वाटते सामाजिक कार्यकर्ते जर राजकारणात आले तर आपले काय ? त्यामुळे ते सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पश्चात(माघारी )सामाजिक कार्यकर्त्याला नको त्या शब्दात बोलत असतात ते सुद्धा कानावर येतं. एकंदरीत सामाजिक कार्यकर्ता सदोदित आर्थिक मानसिक आणि अनुषंगिक संकटातच !!!!!!
विचार व्हावा…
यावर एक प्रतिक्रिया येऊ शकते ती म्हणजे एवढा त्रास सहन करून सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्य का करावे ? त्याने त्याच्याकडे असलेला वेळ पैसा बुद्धी आणि कौशल्य स्वतःच्या उन्नतीसाठी वापरावे आणि यापासून दूर व्हावे.परंतु हे त्याच्या नीतिमत्तेत बसत नाही. कारण त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी आणि गुरुजनांनी कृतज्ञतेचे संस्कार केलेले असतात आणि म्हणूनच तो स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगतो.
समाजाचे जास्तीत जास्त नुकसान समाजातील स्वार्थी,बेइमान व वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे तर होतेच शिवाय जास्तीत जास्त नुकसान समाजातील सुज्ञ,हुशार,बुद्धिवान आणि कौशल्य युक्त,त्यागी आणि नेतृत्व गुण असणारे लोक अलिप्त राहिल्यामुळे समाजाचे सर्वात मोठे नुकसान होते.ही जाणीव सामाजिक कार्यकर्त्याला असते.म्हणून तो सदैव झटत असतो.
*वनश्री श्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे….*
*सामाजिक कार्यकर्ता मातृतीर्थ सिंदखेराजा….*
*संपर्क :-*
*8275233377* दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 7801


