सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.107

डिसेंबर १९१५ च्या नवव्या अधिवेशनाला ते आवर्जून उपस्थित होते. या नंतरचे दहावे अधिवेशन दिनांक २७, २८ व २९ डिसेंबर रोजी सातारा येथे पार पडले. या अधिवेशनात मराठ्यांचे शिक्षण व त्यांचा पूर्वेतिहास या विषयावर त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. यानंतरच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सतराव्या (दि. ११ व १२ एप्रिल १९२५) आणि देवास येथील १९ व्या (२५, २६ व २७ डिसेंबर १९२६, अध्यक्ष पां. चि. पाटील) अधिवेशनाला मुद्दामहून जाधव उपस्थित होते.
अ. भा. मराठा शिक्षण परिषदेची विसावी परिषद दिनांक ७ व ८ एप्रिल १९२८ रोजी सोलापूर येथे नामदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेचे स्वागताध्यक्ष भगवानराव पिलीवकर हे होते. जरा उशिराने का होईना या सन्माननीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान भास्करराव जाधवांकडे चालून आला. मराठा शिक्षण परिषदेच्या इतिहासातील भास्करराव जाधवांचे अध्यक्षीय भाषण निराळी वाट जोखणारे होते. या भाषणात जाधवांचे चिंतन हे सत्यशोधकीय विचारांनी परिपूर्ण होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांची पायाभूत भूमिका हे भाषण विशद करत राहते. या भाषणात सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक कार्यावर नावानिशी भाष्य करण्यात आले आहे. राजर्षी शाहू यांच्या सत्यशोधकी आणि शैक्षणिक कार्याचा मोठेपणा हे भाषण सांगत राहते. थोडक्यात, मराठा शिक्षण परिषदेच्या विचारपीठावरही सत्यशोधक भास्करराव जाधवांचे विचार सत्यशोधकी विचारांपासून तसूभरही ढळलेले नाहीत.
मराठा शिक्षण परिषदेच्या इतिहासात भास्करराव जाधवांना तिहेरी मान बहाल झाला. मराठा शिक्षण परिषदेच्या प्रदीर्घ वाटचालीत आरंभी ते स्वागताध्यक्ष आहेत, नंतर परिषदेचे सचिव, तर फार पुढे सोलापूरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. थोडक्यात परिषदेच्या विचारपीठावर तिहेरी पद भूषविणारे ते एकमेव विचारवंत असावेत.
ना. भास्करराव जाधव हे महात्मा फुले यांचे हाडाचे शागीर्द होते. सत्यशोधक समाजाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. इ. स. १८९७ नंतर सत्यशोधक संघटन प्रचंड मंदावले होते. महात्मा फुले यांचे ग्रंथ दुर्मिळ झाले होते. प्लेगच्या साथीने भयंकर हाहाकार निर्माण केला होता. अशा भयावह वातावरणात सत्यशोधक कार्यकर्ता सैरभैर झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत भास्कररावांनी एक लेख लिहिला. हा लेख मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या दीनबंधु पत्रातून डिसेंबर १९१०ला
सत्यशोधकांचे अंतरंग /107


