संडे स्पेशल प्रशांत वाघमारे मुलांना शिकू द्या हो…!

संडे स्पेशल प्रशांत वाघमारे
मुलांना शिकू द्या हो…!
: शाळाबाह्य कामांचा शिक्षकांवर वाढता बोजा !
शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना शाळा गुणवत्तापूर्ण व भौतिक दृष्ट्या संपन्न होत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्यासाठी आता शिक्षणातील विविध प्रवाहा बरोबरच, नवनवीन शैक्षणिक प्रयोगांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे सारे होत असतानाच काही अनावश्यक बाबींमुळे शिक्षक व विद्यार्थी यांची प्रत्यक्ष अंतरक्रिया घडण्याला अडकाठी निर्माण होत असल्याची शंका शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळेच शिक्षकांमध्ये संभ्रम वाढून आता आम्हाला मुलांना शिकवू द्या हो… असे म्हणण्याची वेळ येते की काय असे वाटत! याबाबत आता सकस चर्चा, विचार मंथन झालेच पाहिजे असेही शिक्षण प्रेमींना वाटते.
शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही आहे त्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर केल्याने शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा आलेख उंचावतच आहे. विविध शिष्यवृत्ती परीक्षा व एन एम एस सारख्या परीक्षेमध्ये आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करीत आहेत. शाळांना आता भौतिक सुविधाही मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक आत्मीयतेने व स्वतःला झोकून देऊन विद्यार्थ्यांचा विकास घडवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच प्रत्यक्ष शैक्षणिक कार्यापासून आपण वंचित राहतो की काय, अशी भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
शालेय पोषण आहार
या योजनेमुळे तर शिक्षक पूर्ण वैतागून गेला आहे. आलेल्या धान्याची निगा ठेवणे, त्याच्या नोंदी ठेवणे व रोज ॲप वर माहिती भरणे, धान्याची काळजी घेणे, ते योग्य प्रकारे शिजवले आहे का ते पाहणे, मुलांना ते व्यवस्थित खाऊ घालने ही कामे शिक्षकांना करावीच लागतात. हे सर्व करत असतानाच त्यामध्ये काही घडल्यास पूर्ण जबाबदारी घेणे या गोष्टीमुळे शिक्षकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. आता तर परसबाग व सुंदर स्वयंपाक घरासाठीच शिक्षकाला झगडावे लागत आहे. बऱ्याच वेळा तांदूळ व धान्यादी माल शाळेवर न पोचल्याने विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहतात. त्यावर कोणीच बोलत नाही, परंतु अगदी किरकोळ कारणावरून कार्यवाही व्हायची भीती शिक्षकांना सतत असते. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून शिक्षकांना आता मुक्तच करायला हवे.
ऑनलाइन कामांचा भडीमार
जिल्हा परिषदेच्या शाळांना क्लार्कचे पद नसते.शिक्षकांना आता बऱ्यापैकी कामे ही ऑफलाइन व ऑनलाईन करावीच लागतात. विविध ॲप डाऊनलोड करणे, त्यानुसार माहिती भरणे. त्यावरती विविध उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ हव्या त्या साईज मध्ये डाऊनलोड करणे. विविध ऑनलाईन माहिती तर वारंवार मागवली जाते. तातडीने ती शिक्षकांना द्यावीच लागते. काही शाळांवर तर रेंजचा बराच प्रॉब्लेम असतो. रात्री, अपरात्री किंवा कधी कधी पहाटे ही माहिती शिक्षकांना भरावीच लागते. सतत नवनवीन उपक्रम येत जातात त्याबाबतीत अपडेट माहिती भरावीच लागते. काही अनावश्यक कामे शिक्षकांना आता डोईजड झालेले आहेत.
द्वि शिक्षकी शाळांवरील शिक्षकांची तारेवरील कसरत
ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरील शाळेत सरासरी दोन शिक्षक काम करतात. बहुतेक वर्ग पहिली ते चौथीपर्यंत असल्याने प्रत्येक शिक्षकाला दोन वर्गाचे अध्यापन करावे लागते. त्यातील ज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा चार्ज असतो.पात्र शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापक असतो. तेवढेच काम द्वीशिक्षिकी शाळेतील मुख्याध्यापकालाही करावेच लागते तेही दोन वर्गाचे अध्यापन करूनच. सहकारी शिक्षक त्यांना मदत करतात त्यामुळे त्यांच्याही अध्यापनावर परिणाम होतो. त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार शिक्षकांना मदत मिळते किंवा काही समाजकंटकामुळे मोठ्या प्रमाणात त्रासही होत असल्याच्या अनेक बाबी समोर येत आहेत. शाळेचा सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणे व त्याचे ऑडिट ठेवणे, मीटिंग; प्रशिक्षणाला उपस्थित राहणे, त्याबाबतची अद्यावत माहिती देणे हे काम त्यांना करावीच लागते.
शिक्षणाशी संबंधित नसणारे उपक्रम राबवणे
शासनाने परिपत्रक काढून जनगणना, प्रत्यक्ष निवडणूक व राष्ट्रीय आपत्ती विषयक कामे शिक्षकांनी करावी असे सांगितले आहे. शिक्षणाशी संबंधित उपक्रम तर सर्व शाळेत राबवले जातात. परंतु काही शिक्षण विभागाशी संबंधित नसणारे हे उपक्रम कंपल्सरी शाळाना राबवावेच लागतात. मतदार नोंदणीचे (BLO) तर काम शिक्षकांना वर्षभर करावेच लागते. याबाबत थोडी जरी सतत सतर्कता न दाखवल्यास नोटीसही येते. कार्यवाहीची भीती असते. त्यामध्ये विविध पंधरावडे राबवून शिक्षक फार त्रस्त झाला आहे.
सजग पालकत्व हवे
नवीन शैक्षणिक धोरणानुसार रट्टा मार शिक्षण पद्धती न अवलंबता,विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर म्हणजेच शिक्षणाचा, मिळालेल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थी कशाप्रकारे करतो यावर भर दिलेला आहे. या बाबी आता पालकांनी समजून घ्यायलाच हव्यात. अलीकडे शिकलेला पण सुशिक्षित नसलेला पालकांची मुलांकडून अवाजवी अपेक्षा असते. स्वतः पूर्ण न करू शकलेल्या अपेक्षा ओझे ते सतत मुलांवर लादत असतात. शिक्षकांशी सतत सकस संवाद ठेवून त्यांनीही आता अभ्यासक्रम पूर्ण समजून घ्यायलाच हवा. त्यासाठी आता पालक प्रशिक्षणाची ही गरज निर्माण झालेली आहे.
गुणवंत म्हणजे फक्त मार्क नसून मुलांचा शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक, व्यक्तिमत्त्व विकास आहे. मुलांनी राष्ट्रीय मूल्ये बाळगून त्यातून पुढे आदर्श नागरिक व चांगला माणूस निर्माण झाला पाहिजे याविषयी आता विचार मंथन व्हायला हवं.
स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली शाळाबाह्य परीक्षांना नको तेवढे महत्त्व
शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी, प्रचंड काम केलेल्या अनुभवी व्यक्तींनी अभ्यासक्रम तयार केलेला असतो. त्या बाबतीत होणाऱ्या परीक्षांचाही त्यांनीच विचार केलेला असतो. त्यामुळे त्या परिपूर्णच असतात. परंतु आर्थिक फायद्यासाठी भारंभार शाळाबाह्य परीक्षेचे अवडंबर माजवले जात आहे. स्पर्धात्मक युगातील विद्यार्थी अशा गोंडस नावाखाली पालकांनाही आपला विद्यार्थी त्या चक्कीत पिसायचा असतो. स्वतः मुलांसाठी वेळ न देऊ शकणाऱ्या पालकांना शिक्षकांकडून ही अपेक्षाही पूर्ण करून घ्यायच्या असतात.
शिक्षकांच्या वैयक्तिक कामाचा निपटारा
शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच विविध खात्याचे उपक्रम शिक्षक राबवत असतो, म्हणून शिक्षकाच्या कामांना त्या खात्याकडून प्राधान्य दिलेच जाते असे काही नाही. त्याच्या वैयक्तिक प्रशासकीय कामासाठीही त्याला झगडावेच लागत असते. त्याबाबतीत कितीही सांगितले तरी कोणतेही सोपस्कर पाळले जात नाही. शिक्षकांच्या वैयक्तिक प्रशासकीय कामाच्या बाबतीत सहजता व सुलभत यायलाच हवी, असे शिक्षकांना वाटते.
योग्य वेळी योग्य प्रशिक्षण
सत सतत नव-नवीन प्रशिक्षण शिक्षकांना मिळणे आवश्यकच आहे. परंतु त्याचा कालावधी हा योग्य त्या वेळेनुसारच असायला हवा. निधीच्या उपलब्धतेनुसार प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित केला जात असल्याने त्या प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग शिक्षकांना, पर्यायाने विद्यार्थ्यांना हवा तेवढा होत नाही. बऱ्याच वेळा शैक्षणिक वेळेचा अपव्यय केल्याची जाणीव शिक्षकांमध्ये यामुळे निर्माण होत आहे.
प्रसार माध्यमांमध्ये सकारात्मक बाबी
शिक्षण क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती होत असतानाच प्रसार माध्यमांमध्ये ही आता सकारात्मक बाबी येत आहेत. याबाबतही प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे शिक्षकांना वाटते. शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रोत्साहनात्मक गोष्टी समोर आल्यास शिक्षकांनाही काम करताना आधीक उत्साह येईल. अधिक वेगाने क्षेत्राची प्रगती यामुळे होईल.
शहरातील बऱ्याच शाळांमध्ये एका एका वर्गामध्ये विद्यार्थी संख्या फारच असते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे हवे तेवढे लक्ष शिक्षकांना देता येत नाही. वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा ही असायलाच हवी. काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थी हुडकून आणावे लागतात. ते आपल्या शाळेतून दुसरीकडे जाऊ नये यासाठी त्यांना फार सांभाळावे लागते. संस्थेची संबंधित व संस्थापकाशी संबंधित अनेक कामे मन मारून करावे लागतात, नाहीतर शिक्षकांवर अनेक कारणाने कार्यवाही होण्याची शक्यता असते. प्रचंड मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो.
शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमांची अंमलबजावणी राज्य पातळीवरील एस सी ई आर टी हा विभाग करतो व प्रयत्नशील असतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही फक्त या सर्व उपक्रमांचा फॉलोअप घेत असते. याबाबतीत शिक्षकांना मदत करणे, सल्ला देणे, माहिती एकत्रित करणे व राज्य पातळीवर पाठवणे हे काम या विभागाकडून होत असते. या संस्थेबाबत मात्र शिक्षकांच्या मनामध्ये काही गैरसमज निर्माण झालेले आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित बराच डेटा राष्ट्रीय पातळीवर सादर करावयाचा असतो. त्यामध्ये माहिती व पुराव्यांसाठी फोटो, व्हिडिओ सादर करावेच लागतात. शिक्षणासाठी जागतिक बँकेचा निधी मिळवण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे सांगितले जाते.
शैक्षणिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात प्रगती होत असतानाच विविध परिपत्रकांचा भडीमार न करता, राज्य पातळीवर काही उपक्रम चालू किंवा बंद ठेवायचे या बाबत सकारात्मक चर्चा व्हायलाच हवी. शिक्षक व विद्यार्थी यांच्या अंतरक्रियेस पुरेसा वाव व कालावधी पुरेपूर मिळावा. अनावश्यक कामे व उपक्रमांचा निपटारा झाल्यास, विद्यार्थ्यांना शिकवण्यास पुरेसा वेळ मिळेल व शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने प्रगती होईल असे शिक्षकांना वाटते. याबाबतीत प्रशासन ही सकारात्मक असल्याचे जाणवत आहे. श्री. प्रशांत वाघमारे 9860786735
कृपया सर्वांना पुढे पाठवा व प्रतिक्रिया कळवा.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


