ओबीसींसमोर दोनच पर्याय- हाके+वाघमारे+ससाणे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारक तामीळ ओबीसी पॅटर्न की भुजबळांच्या नेतृत्वाखालील मध्यममार्ग?

ओबीसींसमोर दोनच पर्याय-
हाके+वाघमारे+ससाणे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारक तामीळ ओबीसी पॅटर्न की भुजबळांच्या नेतृत्वाखालील मध्यममार्ग?
ओबीसी-मराठा संघर्षाचे नववे पर्वः लेखांक-13
ओबीसीनामा-34. लेखकः-प्रा.श्रावण देवरे
(प्रकरण-1) प्रस्थापित पक्षांचे ‘‘ओबीसी चेहरे’’ बाजूला सारा!
ओबीसींच्या आठव्या राजकीय पर्यायाची चर्चा अंतिम टप्प्यात असतांना आम्ही जरी 2018 पासून तामीळनाडू-ओबीसी राजकीय पॅटर्नचा मुद्दा वारंवार मांडत असलो तरी त्याला छेद देण्यासाठी प्रस्थापित मराठा-ब्राह्मणांच्या पक्षांकडून व त्यांच्या बी टीम-सी टीम कडून अनेक कारस्थाने यशस्वी केली जात आहेत. ती सर्व षडयंत्रे मी विस्ताराने आठव्या राजकीय पर्वाच्या दोन्ही प्रकरणात सांगितलेली आहेत. या षडयंत्रांमध्ये रोज नव्या नव्या कारस्थानाची भर पडते आहे.
रोज तुमच्यासमोर नवनवे मुद्दे व नव्या नव्या घोषणा टाकून तुम्हाला भटकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रस्थापित ब्राह्मणांच्या पक्षासाठी काम करणारी बी-टीम म्हणते की, ‘ओबीसींचे 100 खासदार निवडून आले पाहिजेत.’ जो बी टीम पक्ष आजच्या घडीला आपला स्वतःचा एक आमदार निवडून आणू शकत नाही, तो पक्ष 100 ओबीसी आमदार निवडून आणण्याच्या बाता मारीत आहे. दुसर्या दिवशी हा बी-टिम पक्ष सांगतो की ‘सगळ्या पक्षांनी 100 ओबीसी उमेदवारांना तिकीटे दिली पाहीजेत.’ इतर पक्षांनी काय करावे हे सांगण्यापेक्षा तुमच्या पक्षाने 2019 साली काय केले ते सांगा! या बी-टीम पक्षाने हमखास निवडून येणार्या ओबीसी आमदाराचे तिकीट कापून ते तिकीट मराठा उमेदवाराला दिले. आमदारकीची हमखास हॅटट्रिक करू शकणार्या ओबीसी उमेदवाराला नाकारायचे आणी हमखास डिपॉझिट जप्त होणार्या मराठा उमेदवाराला तिकीट द्यायचे, हा कोणता नवा राजकीय उद्योग म्हणायचा? असा पक्षप्रमूख उमेदवाराचे कोणते मेरीट बघून तिकीटे वाटप करीत असेल?
एक महत्वाचा मुद्दा आपण येथे लक्षात घेतला पाहिजे की, ब्राह्मण-मराठा मालक असलेल्या पक्षातर्फे कितीही ओबीसी आमदार निवडून आणलेत, तरी हे ओबीसी आमदार ओबीसी आरक्षणासाठी लढू शकत नाहीत, हा अनुभव आपण नुकताच घेतलेला आहे. भुजबळांच्या एकाही महासभेला पंकजा मुंडे का उपस्थित राहील्या नाहीत? कारण त्यांचे फडणवीस मालक नाराज होतील! ज्या ओबीसी आमदारांचा बंगला जाळण्यात आला व ज्याच्या बायका-पोरांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न मराठा गुंडांनी केला त्या बीडच्या क्षिरसागर ओबीसी आमदाराने भुजबळांच्या एकाही महासभेला उपस्थित राहण्याची हिम्मत दाखवीली नाही. का? कारण त्यांचे मराठा मालक शरद पवार नाराज होतील. शिक्षक आमदार कपिल पाटील हे स्वतः ओबीसी नेते कर्मवीर जनार्दन पाटलांना गुरू मानतात. परंतू त्यांनी 9 जुलैच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जरांगेला पाठींबा दिला व त्याच्या ‘‘सगे-सोयरे’’ शब्दालाही पाठींबा दिला. का? कारण कॉंग्रेसमधील त्यांचे मराठा मालक नाराज झालेत तर त्यांची आमदारकीच खतम होईल! एकमेव भुजबळसाहेबांचा अपवाद सोडला तर, प्रस्थापित पक्षातील सर्व ओबीसी नेते हे कुचकामी असून ते ओबीसी आरक्षण वाचवू शकत नाहीत. त्यामुळे ‘‘100 ओबीसी आमदार निवडून आणा’’ किंवा ‘‘प्रस्थापित पक्षांनी 100 ओबीसींना तिकीटे दिली पाहिजेत’’ वगैरे घोषणा केवळ ओबीसींना खूष करण्यासाठी दिलेल्या असतात. अर्थात ओबीसी अशा भूलथापांना बळी पडणारा नाही. ओबीसींनी स्वतःचा ओबीसी पक्ष उभा करू नये व त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या दावणीलाच बांधलेले राहावे, म्हणून या अशा षडयंत्रकारी घोषणा दिल्या जातात.
17 नोव्हेंबर 2023 पासून भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लाखोंच्या महासभांना कोणताही राजकीय रंग नव्हता. कारण त्यावेळी कोणत्याही निवडणूकांचे वातावरण नव्हते. लाखोंच्या संख्येने सभांना येणारे ओबीसी हे केवळ जरांगेच्या मराठा झुंडशाहीला सडेतोड उत्तर देण्यासाठी व आपले ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी या दोनच उद्देशांसाठी महासभांना येत होते. त्यामुळे या महासभांच्या स्टेजवर कोणत्या राजकीय पक्षांचे ओबीसी नेते उपस्थित आहेत, हे सर्वसामान्य ओबीसींच्या दृष्टिने महत्वाचे नव्हते. परंतू आज होऊन गेलेल्या लोकसभा व येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या काळात आता ज्या ओबीसी सभा होत आहेत, त्या सभांच्या स्टेजवर प्रस्थापित पक्षांचे ओबीसी नेते उपस्थित राहणे घातक ठरते. कारण त्यातून ओबीसी मतदारांना स्पष्ट दिशा मिळतच नाही.
निवडणूक तोंडावर असतांना कोणत्याही सभा अथवा मेळाव्यांमध्ये मतदारांना कोणत्या पक्षाला मते द्यावीत व कोणत्या पक्षाला मते देऊ नयेत, हे स्पष्टपणे सांगीतले गेलेच पाहिजे. केवळ भाषणबाजी करून चमकोगिरी करणारे वक्ते व नेते हे कोणत्यातरी प्रस्थापित पक्षाला मॅनेज झालेले असतात. अशा सभांना उपस्थित असलेले ब्राह्मण-मराठ्यांच्या पक्षांचे ओबीसी नेते हे आपल्या प्रस्थापित पक्षाचा ‘‘ओबीसी चेहरा’’ म्हणून आलेले असतात. ‘‘सर्व प्रस्थापित पक्षांनी ओबीसी आरक्षण नष्ट केले आहे व निवडणूकीत या पक्षांना मते देऊ नका’’ असे सांगण्याचे धाडस हे ओबीसी चेहरे करूच शकत नाहीत. तामीळनाडू ओबीसी पॅटर्नचा स्वतंत्र व स्वाभीमानी ओबीसी पक्ष निर्माण करण्यात सर्वात मोठा अडथळा अशा प्रकारचे ओबीसी मेळावे ठरतात. कारण अशा सभा-मेळाव्यातून ओबीसी मतदार पुन्हा प्रस्थापित पक्षांच्या दावणीला अधिक घट्टपणे बांधला जातो. ज्या ब्राह्मण-मराठ्यांच्या पक्षांनी ओबीसी आरक्षण नष्ट केले आहे, त्याच प्रस्थापित पक्षांना 52 टक्के ओबीसींनी मते द्यावीत व त्यांनाच पुन्हा सत्तेवर बसवावे का?
ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष उभा करून विधानसभेत शूद्ध फुलेशाहूआंबेडकरवादी अभ्यासू व आक्रमक आमदार निवडून आणल्याशिवाय आपले गेलेले ओबीसी आरक्षण कणभरही परत मिळणार नाही. असा राजकीय पक्ष उभा करण्यासाठी नेतृत्वही तसेच आक्रमक व अभ्यासू असले पाहिजे. आज आपल्यासमोर हाके+वाघमारे+ससाणे या तीन तरूण नेत्यांचा पहिला पर्याय उभा आहे. या तीन्ही तरूणांनी एकत्र येऊन ओबीसी पक्षाची स्थापना करावी व ओबीसीमधील इतर जुन्या नेत्यांनी मार्गदर्शकच्या भुमिकेत या तरूणांच्या पाठीशी उभे राहावे. पाठीशी उभे राहता येत नसेल तर किमान विरोधात तरी उभे राहू नये! तसेच मदत करण्याच्या नावाखाली गॉडफादरच्या भुमिकेत कुणीही नेत्याने काम करू नये!
ओबीसी जनतेने लाखोंच्या संख्येने उपोषणाला पाठींबा देऊन जो विश्वास या तीन तरूणांवर दाखविला आहे, त्याचे योग्य चीज व्हायचे असेल तर स्वतंत्र राजकीय पक्षाची उभारणी केलीच पाहिजे. जर या तीन तरूणांनी ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून 2024च्या विधानसभा निवडणूका लढविण्याचा ठाम निर्णय घेतला तर मी प्रा. श्रावण देवरे या लेखाच्या माध्यमातून असे लिहून देत आहे की, आमची ओबीसी राजकीय आघाडी आम्ही विसर्जित करू व आमचे सर्व नेते-कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न करता या तीन तरूणांच्या नेतृत्वाखाली निःस्वार्थपणे काम करू!
पक्ष स्थापनेचे आवाहन पेलतांना त्यांचेसमोर कोणते प्रश्न उभे राहनार आहेत व त्यावर मात करून पुढे कसे जायचे ते आपण नवव्या राजकीय पर्वाच्या दुसर्या प्रकरणात पाहू या!
तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
-प्रा. श्रावण देवरे,
संस्थापक-अध्यक्ष
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
शिवक्रांती टीवी दिनबंधूंवर संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 0


